“आकाशवाणीच्या नव्वद वर्षांच्या निमित्ताने..
All-India-Radio-Center : “हे आकाशवाणी केंद्र आहे…” हे ते चार जादूई शब्द आहेत, ज्यांनी गेल्या नऊ दशकांपासून भारतीय घराघरांना एका अदृश्य, पण अत्यंत घट्ट रेशीमधाग्याने बांधून ठेवले आहे. येत्या ८ जून २०२६ रोजी भारतीय जनमानसाच्या सुख-दुःखाचा, प्रगतीचा आणि संस्कृतीचा मूक साक्षीदार असलेल्या ‘आकाशवाणी’ला (ऑल इंडिया रेडिओ) ९० वर्षे पूर्ण होत आहेत. तंत्रज्ञानाच्या महापुरात अनेक माध्यमे आली आणि गेली; पण नभोवाणीचा हा डोलारा आजही तितक्याच दिमाखात आणि विश्वासार्हतेसह उभा आहे. ९० वर्षांचा हा प्रवास केवळ एका माध्यमाचा इतिहास नाही, तर तो बदलत्या भारताचा एक चालता-बोलता दस्तावेज आहे.
ब्रिटीश काळात, ८ जून १९३६ रोजी ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’चे नामांतराकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ (AIR) मध्ये झाले आणि पुढे कविवर्य पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलेले ‘आकाशवाणी’ हे नाव या वाहिनीने सार्थ केले. सुरुवातीच्या काळात माहिती आणि मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणून रेडिओची गरज निर्माण झाली. भारतासारख्या खंडप्राय आणि अशिक्षित-अर्धशिक्षित लोकसंख्या असलेल्या देशात, तळागाळातील माणसाला साक्षर करणे, देशातील घडामोडी त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवणे यासाठी आकाशवाणी ही देशाची ‘प्राणवाहिनी’ बनली.
एक काळ असा होता जेव्हा घरात रेडिओ असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. रेडिओभोवती संपूर्ण कुटुंब गोळा व्हायचे. सकाळी साडेसहाची भूपाळी, मंगळवेढेकरांच्या बालरंजन गप्पा, ‘कामगार विश्व’, ‘वनिता मंडळ’, आणि रात्रीची ‘हवामहल’ मधील नाटकं… हे केवळ कार्यक्रम नव्हते, तर तो कौटुंबिक जीवनाचा भाग होता. जेव्हा दूरदर्शन किंवा डिजिटल पडदे नव्हते, तेव्हा माणसाच्या कल्पनाशक्तीला पंख देण्याचे काम आकाशवाणीने केले. आवाजाच्या दुनियेतील या माध्यमाशी श्रोत्यांचे जे नाते जडले, ते आजही अतूट आहे.
आकाशवाणीने शेतीपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत सर्वच क्षेत्रांना भरभरून दिले. खऱ्या अर्थाने भारतीय शास्त्रीय संगीताची जपणूक आणि संवर्धन जर कोणी केले असेल, तर ते आकाशवाणीने! दिग्गज कलाकारांना राजाश्रय संपल्यानंतर आकाशवाणीनेच ‘लोकाश्रय’ मिळवून दिला.
खरी जादू(All-India-Radio-Center)
प्रत्यक्ष मैदानावर न जाताही खेळाचा थरार अनुभवायची खरी जादू आकाशवाणीच्या समालोचनाने (कॉमेंट्री) शिकवली. क्रिकेटचे समालोचन ऐकत कान रेडिओला लावून बसलेल्या पिढ्या भारतात घडल्या. सन २०११ च्या ऐतिहासिक विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील तब्बल सहा सामन्यांच्या थेट समालोचनाची सुवर्णसंधी आकाशवाणीला मिळाली होती, हा इतिहास आजही रोमांच उभा करतो. केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर प्रादेशिक स्तरावरही नागपूर केंद्राने राम जन्मोत्सव शोभायात्रेचे केलेले थेट समालोचन असो, की एसएससी (SSC) बोर्डाच्या निकालाचे थेट परीक्षा स्थळावरून केलेले प्रसारण असो; मुलांच्या मुलाखती, पालकांचे मनोगत, विद्यापीठांचे महोत्सव आणि पुस्तक प्रदर्शनांचे थेट वृत्तांत आकाशवाणीने जनतेपर्यंत जिवंतपणे पोहोचवले आहेत.
कालौघात रेडिओचे स्वरूप बदलले. शॉर्ट वेव्ह (SW) आणि मिडियम वेव्ह (MW) कडून सुरू झालेला प्रवास आज एफएम (FM) आणि डिजिटल फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचला आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट स्थिर राहिली, ती म्हणजे ‘विश्वासार्हता’. आजच्या फेक न्यूजच्या आणि सनसनाटी बातम्यांच्या युगातही, “आकाशवाणीवर बातमी आली आहे,” म्हटल्यावर त्यावर अंतिम मोहर उमटते. आजही देश आकाशवाणीच्या अधिकृत बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो.
आजचे युग डिजिटल आहे, पण या युगात आकाशवाणी मागे पडलेली नाही, उलट ती अधिक आक्रमक आणि आधुनिक झाली आहे. आज आकाशवाणी केवळ एका ट्रान्झिस्टवर मर्यादित राहिलेली नाही, तर ती युट्युब (YouTube), फेसबुक (Facebook) आणि ‘न्यूज ऑन एअर‘ (NewsOnAir) ॲपच्या माध्यमातून जगभरात ऐकली जात आहे. ही एक फार मोठी डिजिटल क्रांती आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्यामुळे आज आकाशवाणीची ‘पब्लिसिटी’ आणि पोहोच कैक पटीने वाढली आहे.
नेटवर्कच्या या जाळ्यामुळे आता नागपूर सारख्या प्रमुख केंद्रांचे निवडक आणि दर्जेदार कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील इतर उपकेंद्रांवर प्रसारित केले जातात, तर इतर केंद्रांचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम स्थानिक श्रोत्यांना ऐकायला मिळतात. यामुळे कार्यक्रमांमध्ये कमालीची विविधता आणि समृद्धता आली आहे.
आकाशवाणी नागपूर केंद्राचे असिस्टंट स्टेशन डायरेक्टर श्री. रजपूत सर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आकाशवाणीच्या बदलत्या आणि आधुनिक रूपावर अतिशय मोलाचा प्रकाश टाकला. आज आकाशवाणीचे विषय पूर्णपणे बदलले आहेत. हे माध्यम आता केवळ मनोरंजनाचे साधन न राहता अत्यंत सामाजिक आणि ‘करिअर ओरिएंटेड’ झाले आहे.
आधी आकाशवाणीला भरभरून पत्रे यायची. आता माध्यम बदलले आहे. ‘फोन-इन’ कार्यक्रमांमुळे श्रोता आणि उद्घोषक यांच्यात थेट आणि प्रत्यक्ष संवाद होतो. माध्यम कमालीचे ‘इंटरॅक्टिव्ह’ झाले आहे.
डिजिटल क्रांती(All-India-Radio-Center)
डिजिटल क्रांतीमुळे आज आकाशवाणीला केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून थेट फोन येतात. सातासमुद्रापार बसलेला श्रोता मायबोलीतील कार्यक्रमात थेट सहभागी होतो.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकरी, आदिवासी आणि युवा वर्गाला आज आकाशवाणीवर हक्काचे स्थान दिले जाते. थेट शेतातून किंवा दुर्गम गावातून फोनद्वारे त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाते.
पारंपारिक विषयांसोबतच आज आकाशवाणी सायबर सिक्युरिटी (Cyber Security), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करत आहे. तसेच सर्वसामान्यांमध्ये आर्थिक साक्षरता यावी, म्हणून ‘गुंतवणूक’ आणि वित्तीय नियोजनावर विशेष कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली जात आहे.
आरोग्यविषयक जागरूकतेबाबत आकाशवाणीने केलेले काम अभूतपूर्व आहे आणि त्याला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. नुकत्याच नागपुरात झालेल्या ‘जी-२०’ (G20) परिषदेच्या निमित्ताने आयोजित ‘संगीताची मेजवानी” हा कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या ९० व्या वर्षानिमित्त झालेला ‘स्वरसंध्या’ हा गीतांचा बहारदार कार्यक्रम आकाशवाणीच्या सांस्कृतिक उंचीची साक्ष देतो.
एवढा मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक डोलारा सांभाळणे सोपे नाही. त्यामुळे श्रोत्यांच्या आवडीला आणि समाजमनाला अनुसरून व्यावसायिक जाहिरातींचा मेळ घालत आकाशवाणीने आपले आर्थिक गणितही तितकेच सक्षम ठेवले आहे.
श्री. रजपूत सर युवा पिढीला आवाहन करताना म्हणतात की, “व्यक्त व्हा, स्वतःचा विकास करा!”. “रेडिओचे कार्यक्रम केवळ ऐकू नका, तर या माध्यमाच्या मदतीने स्वतःला व्यक्त करा. लिहिणे, बोलणे या संधींचा पुरेपूर वापर करा. तुमचे संवाद कौशल्य (Communication Skills) अधिक प्रभावी करण्यात आकाशवाणी तुम्हाला खूप मोठी मदत करू शकते. हा प्लॅटफॉर्म तुमचाच आहे; याचा उपयोग स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी करा.”
आकाशवाणीकडे आज बालपण, तरुणाई, महिला आणि वृद्ध अशा सर्वच वयोगटांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाच्या आणि सादरीकरणाच्या अफाट संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे.
२०१४ पासून सुरू झालेला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा “मन की बात” कार्यक्रम हा देखील आकाशवाणीच्या आधुनिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या कार्यक्रमाद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम निर्माण झाले आणि आकाशवाणीची लोकसंपर्कातील भूमिका अधिक बळकट झाली.
९० वर्षांची तरुण झालेली आकाशवाणी आज नव्या दमाने, नव्या तंत्रज्ञानासह आणि जुन्याच आपुलकीने आपल्या सेवेत हजर आहे. तंत्रज्ञान बदलले तरी माणसाच्या भावना बदलत नाहीत, आणि जोपर्यंत भावना जिवंत आहेत, तोपर्यंत आवाजाची ही दुनिया आणि आकाशवाणीचे महत्त्व अढळ राहील. नऊ दशकांच्या या दैदिप्यमान प्रवासाला आणि आकाशवाणी परिवाराला ९० व्या वर्धापन दिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
भंडारा ९४२३३८३९६६