सावित्रींच्या देशात महायुतीचा प्रवास ‘लाडक्या बहिणी’पासून, आता ‘वहिनींच्या हाती सूत्र’ देण्यापर्यंत !
कुणी काहीही म्हणो मात्र ज्या राजकीय लांडग्यांनी अजीतदादांचा घात केला त्यांच्यापासून आता स्वत:चा पक्ष आणि कुटूंबाला सावरायचे आहे याचे भान नक्कीच असल्याचे त्यांच्या गेल्या पंधरा दिवसातील कृतीमध्ये दिसले आहे. कारण या महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, येसुबाई, ताराराणी, अहिल्यादेवी, झाशीची राणी, अश्या असंख्य कर्तबगार, धैर्यशिल महिलांची समृध्द परंपरा लाभली आहे. पतीनिधनानंतरही वैधव्य प्राप्त झाले तरी खचून न जाता आपल्या पतीला साजेशी दैदिप्यमान कामगिरी करत कर्तव्यभान आणि पराक्रम गाजविणाऱ्या या महिलांच्या यादीतल्याच म्हणून सुनेत्राताई पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. सत्यवानाचे प्राण साक्षात यमराजाकडून सोडवून आणायची जिद्द आणि प्रसंगावधान असलेल्या सावित्रींच्या देशात लाडक्या बहिणीपासून सुरू झालेला महायुतीचा प्रवास आता ‘वहिनींच्या हाती सूत्र’ देण्यापर्यंत आला आहे!

ही ‘सावित्रीची लेक’ डगमगली नाही(Sunetra-Ajitdada-Pawar)
Sunetra-Ajitdada-Pawar :महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शहरी आणि ग्रामिण भागातील निवडणूका पार पडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताईंनी उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या अपूर्ण कार्याची धुरा आपल्याकडे नेटाने घेतली आहे. राष्ट्रवादीच्या विधीमंडळातील गटनेतेपदी त्यांची निवड अजीत पवार यांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी झाली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारण्याची इतकी घाई का केली? म्हणून ‘मोठ्या’ वर्तमानपत्रातून अग्रलेखही प्रकाशित झाले. विलीनीकरणाचे राजकारण, अजित पवार(Ajit Pawar) यांच्या अकाली निधनाच्या घटनेत घातपाताची शक्यता अश्या असंख्य विषयांची राळ उठवली जात असतानाच सुनेत्रावहिनी मात्र धिरोदात्तपणे आपल्यावरील राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा निर्वाह करताना दिसत आहेत. त्यांनी नवीदिल्लीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सहकुटूंब भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या दिल्लीच्या दौऱ्यात हे देखील स्पष्ट झाले की, सध्याच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा त्यांनी दिलेला नाही. आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही त्याच विराजमान होणार आहेत. त्यामुळे काळाचा अचानक घाला आला तरी ही ‘सावित्रीची लेक’ डगमगली नाही हेच अधोरेखीत झाले आहे.

बीड(Beed) आणि पुण्याच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली, भल्या सकाळी दादांप्रमाणेच बारामती येथे जनता दरबारही घेतला. दादांच्या निधनामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर देताना ‘मी तुमच्या पाठिशी आहे’ असे सांगत आपले ‘डोंगरा एवढे दु:ख’ बाजुला ठेवल्याचे दिसले. कुणी काहीही म्हणो मात्र ज्या राजकीय लांडग्यांनी अजीतदादांचा घात केला त्यांच्यापासून आता त्यांना स्वत:ला आणि पक्ष आणि कुटूंबाला सावरायचे आहे याचे भान नक्कीच असल्याचे त्यांच्या गेल्या पंधरा दिवसातील कृतीमध्ये दिसले आहे. कारण या महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, येसुबाई, ताराराणी अहिल्यादेवी, झाशीची राणी अश्या असंख्य कर्तबगार, धैर्यशिल महिलांची समृध्द परंपरा लाभली आहे. पतीनिधनानंतरही वैधव्य प्राप्त झाले तरी खचून न जाता आपल्या पतीला साजेशी दैदिप्यमान कामगिरी करत कर्तव्यभान आणि पराक्रम गाजविणाऱ्या या महिलांच्या यादीतल्याच म्हणून सुनेत्राताई पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. माजी मंत्री पदमसिंह पाटलांच्या घरात जन्मलेल्या या लेकीला राजकारणाचे बाळकडू बालपणापासून मिळाले आहे. शिवाय पवार घराण्याची सून म्हणून मागील चाळीस वर्ष त्यांनी अनेक व्यावसायिक, कौटूंबिक जबाबदाऱ्यांचा निर्वाह केला आहे. बारामती टेक्नो पार्क पासून विद्याप्रतिष्ठान पर्यंत अनेक व्यावसायिक कार्यात त्या पहिल्यापासून सक्रिय आहेतच. शिवाय मागील दोन वर्षापासून त्या राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. बारामतीच्या लोकसभा निवडणूकीत नणंदबाई सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याकडून पराजीत झाल्यानंतरही अजीत पवार यांच्याकडून त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. तो निर्णय किती अचूक होता हेच आताच्या राजकीय स्थितीमध्ये प्रकर्षाने जाणवले आहे. त्यानंतर त्या सक्रिय राजकारणात कार्यरत राहिल्याच आहेत. अचानक अनपेक्षीतपणे त्यांच्या या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली असली तरी अजीतदादासोबत त्यांची ‘सावली’ म्हणून चालणार्या या माऊलीकडे आता लोकांकडून अजीतदादांचे ‘प्रतिबिंब’ म्हणून पाहिले जावू लागले आहे. याची जाणीव त्यांना आहे.

राज्य शासन-प्रशासनात फेरबदल?(Sunetra-Ajitdada-Pawar)
असे असलेतरी अजितपवार(Ajit Pawar) यांच्याकडे आग्रहपूर्वक असलेल्या वित्तविभागाला वगळून भाजपने सुनेत्रावहिनींकडे सध्या ती जबाबदारी दिली नाही. याचे कारण लवकरच राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्याची अणि सहा मार्चला तो सादर करण्याची घाई असल्याने हे पद तुर्तास मुख्यमंत्र्याकडे ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र लवकरच राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून सुनेत्रा पवार(Sunetra-Ajitdada-Pawar) यांनी त्यासाठी आग्रह धरावा आणि दिलीप वळसे पाटील किंवा जयंत पाटील(Jayant Patil) यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवावी असे बोलले जात आहे. सध्या धनंजय मुंडे(Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) या दोन मंत्र्याच्या जागा मंत्रिमंडळात खाली आहेतच. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या रिक्त मंत्र्याच्या जागा भरताना काही खाती बदलून घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडील खाते राष्ट्रवादीला दिले जाण्याची शक्यता असून भोसले यांच्याकडे महसूल विभागाचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता आहे. या शिवाय सध्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे वित्तखात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या शिवाय शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाच्या तीन चार मंत्र्याच्या खात्यांमध्येही बदल अपेक्षीत असून शिक्षण, उद्योग, सामाजिक न्याय अश्या खात्यांना नवे मंत्री दिले जाण्याची शक्यता आहे असे या सूत्रांनी सांगितले. भाजपच्याही काही मंत्र्यांना घरचा रस्ता पहावा लागण्याची शक्यता असून काही नव्या मंत्र्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे फेरबदल अपेक्षीत असून त्याबाबत दिल्लीश्वरांच्या पातळीवर चाचपणी सुरू झाली आहे, असे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या प्रशासकीय भाकरीला देखील फिरवले जाण्याची शक्यता असून अनेक महत्वाच्या खात्याच्या सचिवांच्या तसेच महापालिका आयुक्त्यांच्या बदल्या येत्या दोन महिन्यात अपेक्षीत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारमध्ये प्रशासनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर वचक असलेल्या अजीत पवार यांच्या एक्झीटनंतर नवा डाव मांडला जात असून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना त्यात कश्या प्रकारचे स्थान मिळणार आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहेच.

पुन्हा एकदा फाटाफुटीचे राजकारण?
खरेतर आता नव्या सरकारचा दोन वर्षाचा कार्यकाळ येत्या नोव्हे. महिन्यात पूर्ण होणार असून त्यापूर्वी राज्य महामंडळाचे वाटप करण्याचे वेध लागले आहेत. त्यात मागील काळात सत्तापदे मिळू न शकलेल्या दिग्गजांना सामावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असून राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) किंवा ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेते गळाला लावण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता कॉंग्रेस पक्षाच्या काही दिग्गज नेत्यांबाबत देखील सांगण्यात येत असून शतप्रतिशत भाजपच्या २०२९च्या तयारीचा भाग म्हणून अनेक राजकीय उलथापालथी केल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटाचे विलीनीकरण झाल्यास त्यातून काही आमदारांचा गट वेगळा होण्याची किंवा भाजपसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तसे झाल्यास शिवसेनेतही पुन्हा एकदा फाटाफुटीचे राजकारण केले जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.(Sunetra-Ajitdada-Pawar)

‘कुछ भी हो सकता है’
अजीत पवारांच्या अकाली एक्झीट नंतर राजकारणात काहिशी भिती आणि हतबलतेची भावना असून ‘कुछ भी हो सकता है’ यावर सर्वांचा विश्वास दृढ झाला आहे. मात्र रोहित पवार(Rohit Pawar) यांच्याकडून अजित पवार(Ajit Pawar) यांच्या मृत्य़ूप्रकरणाची चौकशी करण्याबाबत ठामपणे मागणी होत असताना दोन्ही बाजूच्या बड्या नेत्यांकडून मात्र याबाबत सावध भूमिका त्यामुळेच व्यक्त केली जात आहे. अनेकांना आपल्या राजकीय अस्तित्वाची चिंता असल्याने आपल्यामागे आपल्या कुटूंबियांच्या चिंतेमुळे अनेकजण मूकबधीर झाल्यासारखे झाले आहेत, असे जाणकार सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी ज्या हिमतीने रोहित पवारांकडून दादांचा घात झाल्याचे सूचित केले जात आहे ते पाहता फार दिवस याबाबत चुप्पी साधणे सरकार आणि यंत्रणेलाही शक्य होणार नाही. गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांच्या निधनानंतरही अशीच स्थिती असल्याने यावेळी देखील लोकांकडून ही गोष्ट काही दिवसांनी विसरली जावी यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे, तपास यंत्रणांवर अविश्वास नको हे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य त्यातूनच आले आहे. मात्र ‘एका मंत्र्याच्या जिवीताची हमी’ सरकार घेवू शकत नसेलतर मुख्यमंत्र्यानाही असे बोलताना ‘नैतिक अधिष्ठान’ राहते का? याचा विचार केला पाहिजे. असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सीआयडी तपास केला जाण्याची घोषणा झाली तरी उच्चस्तरीय चौकशीची मागणी आता जोर धरत आहे, त्यात मंत्रीपदावर असलेल्या झिरवाळ सारख्या मंत्र्याना कसे रोखायचे? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे असल्याचे दिसत आहे. त्यातूनच झिरवाळ यांच्या कार्यालयात ३५ हजार (की ५०?) लाच प्रकरणाचा गाजावाजा होताना दिसत आहे. मात्र मुळात मंत्रालयात दहा हजारापेक्षा जास्त रक्कम आणायला मज्जाव असताना संबंधितानी त्यापेक्षा जास्त पैसे मंत्री कार्यालयात दुसऱ्या मजल्यावर आणलेच कसे? मंत्रालयाची डिजीटल सुरक्षा यंत्रणा काय करते? असा वेगळाच सवाल निर्माण झाला आहे. राजकीय दबावतंत्राच्या राजकारणात असे चमत्कार आता होत राहणार आहेत ते पहायचे आणि गप्प रहायचे का? असा प्रश्न सुज्ञास सतावणे स्वाभाविक आहे नाही का? तुर्तास इतकेच!
किशोर आपटे.
(लेखक व राजकीय विश्लेषक)
