Reveal-the-truth : ‘सरणार कधी रण प्रभो कूठवर पाहू वाट’. . . ! अजित पवारांनंतर हा खेळ सोंगट्यांचा? सत्य उघड?
राज्याचे धडाडीचे अनुभवी नेते आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त्तमंत्री म्हणून प्रदिर्घकाळ राज्याच्या विकासाची दिशा ठरवणारे नेते अजित पवार यांचा २८ जानेवारी २६ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास भिषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही गोष्ट मात्र अजूनही दादांचे चाहते आणि विरोधकांच्याही पचनी पडणे कठीण जात असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची सी आयडी चौकशी जाहीर झाली आणि सामान्यांच्या मनातएकच वाक्य तरळ ले ‘दया कुछ तो गडबड है!’

‘दया कुछ तो गडबड है!’
या अपघाताबाबत पवार कुटूंबियाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी जरी हा अपघात असल्याचे आणि यावर राजकारण न करण्याचे आवाहन त्याच दिवशी केले असले तरी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही महत्वाच्या नेत्यांसह दादांच्या कट्टर विरोधक अंजली दमानिया(Anjali Damania) देखील या अपघाताबाबत संशय व्यक्त करताना दिसत आहेत. या अपघातासोबत काही जणांनी मर्डर मिस्ट्री(Murder Mystery), तर काही जणांनी राजकीय हिस्ट्री(Political history) पर्यंत शंशय व्यक्त केला आहे. कपट कारस्थान असल्याचा तर काही जणांकडून पध्दतशीर राजकीय डावपेचाचा भाग म्हणून दादांना अपघाताचा बनाव करून परदेशी पाठवून दिल्याचा संशय देखील व्यक्त केला आहे. या साऱ्या प्रकरणात आता केंद्र सरकारच्या नागरीउड्डयन मंत्रालयासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या पोलीसांचा गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतक्या मोठ्या पदसिध्द व्यक्तीचा अपघाती संशयास्पद मृत्यू होवूनही राज्यसरकारकडून कोणत्याही उच्चस्तरीय/ दंडाधिकारी किंवा न्यायालयीन चौकशीची घोषणा करण्यात आली नाही. तर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी(CID) याचा तपास करत आहे. सीआयडी म्हटले म्हणजे याच नावाच्या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेतील एसीपी प्रद्युम्न असलेल्या कलाकार शिवाजी साटम(Shivaji Satam) यांचा प्रसिध्द संवाद मनात डोकावतो ‘दया कुछ तो गडबड है!’

जबाबदारी राज्य सरकारच्या गृहविभागाची नव्हती काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार(Ajit Pawar) खाजगी राजकीय दौऱ्यावर असल्याने शासकीय विमानाने न जाता खाजगी विमान कंपनीच्या विमानाने जात असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी महत्वाचे मंत्री म्हणून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारच्या गृहविभागाची नव्हती काय? असा प्रश्न कोणत्याही माध्यमातून का विचारला जात नाही अशी विचारणा दादांच्या काही चाहत्या नेत्यांनी आम्हा पत्रकारांकडे वारंवार केली. सध्या अजित पवार यांच्या निधनाचा शोक आणि धक्क्यातून त्यांचे कुटूंबिय आणि पक्षाचे नेते कार्यकर्ते सावरले नाहीत. पण दहा तारखेनंतर याबाबत आपण पत्रकार परिषद घेत असल्याचे अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनीच जाहीर केले आहे.

त्यापूर्वी अकोला येथील विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, शरद पवार यांच्या गटाचे प्रवक्ते विकास लवंडे. बीड चे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे, दादांच्या विरोधक अंजली दमानिया यांच्यासारख्या अनेकांनी जाहीरपणे दादांचा घात होता की अपघात याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. मिटकरी यांनी तर अजीत पवार यांचे विमान बदलण्यात आले किंवा पायलट अचानक कसे बदलण्यात आले इथपर्यंत संशय व्यक्त करताना ज्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या ओळख पटविण्याच्या प्रक्रियेपासून ते दादांचे पार्थिव होते की अन्य कुणाचे याबाबत शंका असल्याचा दावा केला आहे. या अपघाताबाबत आता विमानाच्या तांत्रिक फ्लाईट डेटाबाबत तज्ज्ञांचा अहवाल येण्याची वाट पहा असे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण या मोहोळ यांनी हे सांगायला हवे की, या अपघाताच्या आठ महिनेपूर्वी गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ड्रिमलायनर विमानात दोनशे प्रवाशांसह गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी(Vijay Rupani) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या अपघाताबाबत शंकाचे ‘मोहोळ’ अद्याप सरकारच्या कोणत्याही अहवालामुळे शमल्याचे दिसत नसताना या आपघाताबाबत नेमेके कधीपर्यंत तथ्य समोर येणार आहे? त्यामुळे आता नेमके अजीत पवार यांच्यासारखे व्हिसल ब्लोअर नेतृत्व अचानक काळाच्या पडद्यामागे जाण्यामागे केवळ ‘नियतीचा डाव होता की कुणाची राजकीय नियत’ खराब झाल्यामुळे हे घडवून आणलेले कारस्थान आहे याची चर्चा समाधानकारक तपास आणि तथ्य समोर येईपर्यत होत राहणार आहे.

शरद पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे नक्की काय?
अजित पवार(Ajit Pawar) यांच्या मृत्यूनंतर तीनच दिवसांनी त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली मात्र त्यांनी दहा तारखेपर्यत पदभार स्विकारला नाही. पण पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आला नाही. त्याबाबत भाजपच्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून वक्तव्ये येणे आणि प्रफुल्ल पटेल(Prafull Patel) यांना परस्पर या पदावर विराजमान झाल्याची घोषणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्वत: पटेल यांनी मानभावीपणे आपली निवड न झाल्याचा खुलासा करण्यामुळे अजीत पवार यांचा पक्ष शरद पवार यांच्या ताब्यात जावू नये अशी महाशक्तीची इच्छा लपून राहू शकली नाही. तीच गोष्ट दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेची झाली.
अजीत पवार(Ajit Pawar) काय किंवा एकनाथ शिंदे(Eknath Shinde) काय या दोन्ही गटांच्या राजकीय अस्तित्वाला दिल्लीतून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातून मिळालेले अभय भाजपच्या सत्तेवर असलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या वरदहस्तामुळेच शक्य झाले आहे, हे काही आता गुपीत राहिलेले नाही. त्यामुळे या पक्षांच्या राजकीय निर्णयात भाजपच्या फायद्याच्या विरोधात काही घडामोडी होत असतील तर त्या भाजपच्या सहमतीने व्हाव्या अशी अपेक्षा आहे. आणि त्याच पध्दतीने दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत एकत्रपणे लढण्यासाठी जवळ आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन्ही पक्षांनी ‘एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच’ या उध्दव ठाकरेंच्या धोरणानुसार चालायचे आता सांगितल्यानंतर आणि ते देखील अजित पवार हयात नसताना म्हणजे शरद पवार अप्रत्यक्षपणे भाजपसोबत येण्यास तयार आहेत का? की यामध्ये देखील पहाटेच्या शपथविधी सारखे काही राजकीय डावपेच आहेत याचा संशय भाजपला येणे स्वाभाविक आहे. कारण यापूर्वी भाजप पवारांच्या राजकीय स्टंटला बळी पडून तोंडघशी पडल्याची दोन तीन उदाहरणे आहेतच.
शिवाय अजीत पवार यांना पुढे करून भाजपमध्ये जाण्यास तयार झालेल्या राष्ट्रवादीच्या भजुबळ, मुंडे, मुश्रीफ, वळसे पाटील इत्यादी नामदेव घोटाळे मंत्र्याना आता पुन्हा शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली देण्यास भाजप सहजासहजी तयार होणार नाही हे देखील अध्याऋत समजले पाहिजे. छगन भुजबळ, मुश्रिफ, मुंडे यांच्यावरील डाग अजून पुरते धुतले गेले नाहीत. तर शरद पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादी जाणार म्हणजे नक्की काय? याबाबत अजीत पवार यांच्याकडून जरी संकेत देण्यात आले असले तरी थोरल्या पवारांना त्यांच्या पक्षासह सांभाळणे आणि अजित पवार आणि त्यांच्या भ्रष्ट सहकाऱ्यांना सोबत ठेवून खेळवणे यात महदंतर आहे याची जाणीव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. कालपर्यंत सोबत येण्यास विरोध असणारे शरद पवार नेमके काय खेळी करणार आहेत? याचा अंदाज कुणालाही लावता येणे कठीण आहे.(Reveal-the-truth)
याबाबत एक कारण राज्यसभेची एप्रिल महिन्यात मुदत पूर्ण होत असल्याने पवार यांना आता पुन्हा राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यसभा पक्की तर करुन घ्यायची नाही ना? अशी या शंके मागे राजकीय समिकरणे आहेतच. पवार यांना महाविकास आघाडी देखील सहमतीने एकमताने राज्यसभेत पाठवू शकते. मात्र तेथे शरद पवार यांना उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि कॉंग्रेसच्या राजकीय मेहरबानीवर जाणे प्रशस्त वाटले नसावे. त्याऐवजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर स्वबळावर पवार यांना राज्यसभा गाठणे शक्य होणार आहे. असा राजकीय कयास लावला जात आहे.(Reveal-the-truth)

अजित पवारांनंतर हा खेळ सोंगट्यांचा?(Reveal-the-truth)
मात्र अजित पवारांच्या हयातीत असे ठरल्याचेही सांगण्यात येत आहे की, फौजीया खान यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे आणि पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घ्यावी मात्र पक्षाची सूत्र संस्थापक अध्यक्ष म्हणून सांभाळावी आणि सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना लोकसभा तसेच राज्यसभेची जबाबदारी देवून कार्याध्यक्ष पदाचा भार द्यावा. तर अजित पवारांकडे महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी द्यावी असे ठरविण्यात आले होते. एकंदर राष्ट्रवादीचा ताबा पुन्हा येनकेन प्रकारेण मोठ्या साहेबांकडेच राहिला असता ही गोष्ट भाजपच्या वरिष्ठांना कदापी मान्य होणारी नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाला खोडा घालण्याचा महाशक्तीचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
पण . . अजित दादा आता नाहीत त्यांच्या पश्चात पवार कुटूंबाचा पाया शरद पवारच आहेत. नातवंडासाठी आधारवड तेच आहेत. गेल्या दहा दिवसांत जे चित्र दिसत आहे, त्यात पराकोटीच्या दु:खात देखील ते एक दादा गेला तर चार दादा घडविण्याच्या कामात लागले आहेत असेच दिसत आहे. कुटूंब या दु:खात एकत्र आले आहे, अजित पवार गेले तरी त्यांच्या जाण्यातूनही त्यांनी सगळ्याना शेवटी एकत्रच आणले आहे, याला कुणाचा आक्षेप असायचे कारण काय?(Reveal-the-truth)

मात्र राजकारण काही असो त्याच्या आडून ज्या काही भयावह घडामोडी सुरू आहेत त्या ‘सरणार कधी रण प्रभो कूठवर पाहू वाट’; या बाजी प्रभूंसाठी कुसूमाग्रजांनी लिहून ठेवलेल्या ओळी सामान्य माणसासाठी वापरूनही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती झाली आहे. केवळ धक्कातंत्राचे सत्ताकारण आणि धनाढ्यांसाठी राजकारण यात सामान्य माणसाचे त्याच्या प्रश्नाचे काय? अजित पवार या पहाडासारख्या राजकीय नेत्याची अगदी अनपेक्षित एक्झीट बऱ्याच नव्या राजकीय प्रश्नाना जन्माला घालून गेली आहे. ज्या पध्दतीने त्यांचा एकाएकी राजकीय अस्त झाला ते कुणाच्याही मनाला पटणारे नाही. त्यामुळे सत्तेच्या राजकारणाच्या पटावरील तटकरे, पटेल, भुजबळ, फडणवीस, आणि अगदी अरोरा सुध्दा केवळ प्यादी आहेत की काय? वेळ आली तर खेळ करणारे या सोंगट्या हव्या तश्या वापरतील किंवा काढून घेतील काय? हा खेळ जीवघेणा आहे. पण खेळ कुणाला दैवाचा कळला? सारेच अनाकलनीय, अनपेक्षीत! नि:शब्द! सुज्ञास जाग आली तर बरे! तूर्तास इतकेच!!
किशोर आपटे.
(लेखक व राजकीय विश्लेषक)
