Result-of-Prayer : प्रार्थना म्हणजे केवळ शब्दोच्चार नाही. ती माणसाच्या अंत:करणाला आकार देणारी, जीवनाला दिशा देणारी आणि समाजजीवनाला उन्नत करणारी एक साधना आहे.
भारतीय संस्कृतीत प्रार्थनेला विशेष स्थान आहे. सकाळची शाळेतील प्रार्थना असो, मंदिरातील आरती असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(RSS) प्रार्थना असो ही सर्व प्रार्थना मनुष्याला “मी कोणासाठी जगतो, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे?” या प्रश्नाचे उत्तर शिकवतात.
प्रार्थनेमुळे मन स्थिर होते, विचार शुद्ध होतात आणि उद्दिष्ट स्पष्ट होते. प्रार्थना माणसात आत्मविश्वास जागवते. ती त्याच्या कृतींना पवित्र ध्येयाशी जोडते. वैयक्तिक आयुष्यात संयम, शिस्त, नि:स्वार्थपणा हे गुण रुजतात. जेव्हा अनेक लोक एकत्रितपणे प्रार्थना करतात तेव्हा त्यांची हृदये, विचार, भावनांचा सूर एकसंध होतो. समाजात एकात्मता निर्माण होते. संघटितपणाची ताकद अनुभवास येते. जात, धर्म, प्रांत यांचे भेद वितळतात आणि एक “राष्ट्रभक्तीचा” भाव प्रबळ होतो.
राष्ट्र हे केवळ भूमीचे तुकडे नाही, तर ते एक सजीव चेतना आहे. प्रार्थना त्या राष्ट्रचेतनेला वंदन करते. त्यामुळे समाजात देशभक्तीचा जाज्वल्य संस्कार होतो. सेवा, त्याग, बलिदान यांची प्रेरणा मिळते. संकटकाळात अशा प्रार्थनेचे संस्कार लाभलेली पिढी निःस्वार्थपणे पुढे येते. कोरोंना काळात आपण सर्वांनी याचा अनुभव घेतला आहे.
प्रार्थना ही माणसाला स्वार्थापासून परमार्थाकडे नेणारी शक्ती आहे. ती माणसाच्या अंतरात्म्यातील सर्वोत्तम गुणांना जागृत करते. त्यामुळे व्यक्ती-समाज-राष्ट्र अशा तिन्ही स्तरांवर कल्याणकारी परिवर्तन घडते. “प्रार्थना” हा शब्द साधा असला तरी तिचा परिणाम अत्यंत गहन असतो. ती व्यक्तीला सज्जन बनवते, समाजाला एकत्र आणते आणि राष्ट्राला बलशाली करते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना ही केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कृती नसून संघटन, राष्ट्रनिष्ठा आणि आत्मसंस्कार यांचा एकत्रित आविष्कार आहे.
“नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…” या ओळीपासून सुरू होणारी ही प्रार्थना मातृभूमीला वंदन करणारी आहे. तिच्यात देशभक्ती, आत्मबल, समर्पण, वीरत्व, संघटनशक्ती आणि मातृभूमीच्या मंगलकामनेची भावना व्यक्त होते. दररोज अथवा प्रत्येक शाखेत प्रार्थना म्हणण्याने स्वयंसेवकाच्या जीवनात शिस्त आणि सातत्याची सवय लागते. शब्द उच्चारताना मनामध्ये देशसेवेचे संकल्प बिंबले जातात. प्रार्थनेतील शब्द स्वयंसेवकांना सतत आदर्शांची जाणीव करून देतात. चरित्र निर्माणाची प्रक्रिया इथूनच सुरू होते, हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
संघाची प्रार्थना ही एक विचारप्रवाह, एक जीवनदृष्टी आणि एक राष्ट्रभक्तीची प्रेरणा आहे. “परम् वैभवं नेतुम् एतत् स्वराष्ट्रम्” हे वाक्य संघाच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या जीवनात उच्चतम मूल्ये रुजवण्याची आणि राष्ट्रासाठी समर्पित राहण्याची प्रेरणा देते. सर्व स्वयंसेवक एकसुरात, एकभावाने प्रार्थना म्हणतात. त्यामुळे जात, भाषा, प्रांत या भेदांपलीकडे एकात्मतेची अनुभूती होते.
राष्ट्रीयत्वाची चेतना निर्माण करण्याचे सामर्थ्य या प्रार्थनेत आहे. मातृभूमीला ‘माता’ मानून वंदन केल्याने राष्ट्र ही फक्त भूमी न राहता एक जिवंत, चेतन, पवित्र अस्तित्व म्हणून अनुभवली जाते.
प्रार्थनेत “तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्राsनिशम्।” या संकल्पामुळे स्वयंसेवक समाजहितासाठी कटीबद्ध राहतात. ‘त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्’ या भावनेतून कार्यकर्ते व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य देतात. निःस्वार्थी वृत्ती निर्माण होते. प्रत्येकाला समाजहितासाठी समर्पित राहण्यास हे वचन प्रवृत्त करते. प्रार्थनेतूनच जन्म घेतो संघाचा प्रचारक! जो स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी पर्यायाने देशासाठी जगतो. घर, कुटुंब, सुख या सर्वावर तुळशीपत्र ठेवून स्वत:ला तो राष्ट्रकार्याला वाहून घेतो. श्री दीनदयालजी उपाध्य यांचा अंत्योदय, श्री नानाजी देशमुखांचा ग्रामविकास, श्री द्त्तोपंत ठेंगडी यांचे मजदूर आंदोलन, श्री एकनाथ राणड्यांचे विवेकानंद केंद्र हे सर्व त्या प्रार्थनेच्या “अवघ्या श्वासाचे” फळ आहेत.
प्रार्थनेने प्रेरित झालेली पिढी शिक्षण, आरोग्य, सेवा, संस्कृती, पर्यावरण इत्यादी क्षेत्रांत कार्यरत आहे. प्रार्थना एकात्मतेने सुरू होते आणि संपते. त्याचा थेट परिणाम संघाच्या कार्यात दिसून येतो. या एकात्मतेमुळेच संघटनेला बळ प्राप्त होते. प्रार्थनेच्या प्रभावामुळे स्वयंसेवक देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्याचे कार्य करीत आहेत. विविध आपत्ती, दुष्काळ, पूर, भूकंप, युद्ध अशा प्रसंगी स्वयंसेवकांनी तत्परतेने सेवा दिली आहे. प्रार्थनेने दिलेली राष्ट्रनिष्ठा आणि निःस्वार्थी वृत्ती ही संघाच्या अखंड कार्याची मूळ प्रेरणा आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, भोगवाद आणि व्यक्तिवाद वाढत असताना ही प्रार्थना अजूनही तितकीच आवश्यक आहे. ती व्यक्तीला “स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ” ही जाणीव करून देते.
प्रार्थनेच्या ओळी जणू आत्म्याला स्पर्श करतात. त्या स्वयंसेवकाला “मी” पासून “आपण” या प्रवासाकडे नेतात. हा संघाचा खरा संस्कार आहे. विचारांतून कृतीकडे, आणि कृतीतून राष्ट्रनिर्मितीकडे!
प्रार्थना स्वयंसेवकांना समाजाला “संघटित बळानेच राष्ट्र उभे राहते” हे स्मरण करून देते. आणि ती राष्ट्राला सांस्कृतिक आत्मविश्वासाची दिशा दाखवते. संघाची प्रार्थना कोणत्याही एका देवतेला केंद्रस्थानी न ठेवता सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि धार्मिक सहिष्णुता यांचा संदेश देते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना ही स्वयंसेवकाच्या जीवनाचा ध्यास, राष्ट्रसेवेची प्रेरणा आणि समाजपरिवर्तनाचे बीज आहे. तिचा परिणाम म्हणजे, शिस्तबद्ध, संघटित, समर्पित आणि देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणारी व्यक्तिमत्त्वे घडवणे. प्रार्थनेचा खरा परिणाम म्हणजे मानवतेचे, राष्ट्राचे आणि संपूर्ण सृष्टीचे मंगल साधणे हेच होय.
“नमस्ते सदा वत्सले मातृभूमे” ही प्रार्थना म्हणतांना मला प.पू. भय्याजी महाराज बुधोलीया, सावंगी, यांच्या प्रार्थनास्तोत्रातील ही ओवी आवर्जून आठवली. “प्रार्थनेचा हा परिणाम| सतीस द्रवला यमधर्म| नि मुमुक्षूस मुक्तिधाम, लाभ तया||. प्रार्थनेचं आध्यात्मिक सामर्थ्य यातून स्पष्ट होतं.Result-of-Prayer
शब्दांकन:
श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा- ७०३८८३९७६२