Ayodhya: आस्था, अध्यात्म आणि इतिहासाचे जीवंत प्रतीक : अयोध्याधाम

Ayodhya:भारताच्या सांस्कृतिक परंपरेत काही नगरे ही आस्था, अध्यात्म(Spirituality) आणि इतिहासाची जिवंत प्रतीके आहेत. अयोध्या(Ayodhya) ही अशीच एक नगरी—जी काल, परंपरा आणि श्रद्धा यांना जोडणारी आहे.

“अयोध्या” या शब्दाचा अर्थच तिच्या वैशिष्ट्याचे दर्शन घडवतो—
अ + युध = जिथे युद्ध नाही, जी अजेय आहे, ती अयोध्या.

अध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक(Ayodhya)

पुराणांमध्ये या शब्दाचा आणखी एक अर्थ दिला आहे. “अ” ब्रह्मा, “य” विष्णू आणि “ध” महेश. म्हणजेच अयोध्या ही त्रिदेवांचे साकार रूप मानली गेली आहे.
अयोध्या म्हटले की प्रथम स्मरण होते ते सरयू नदीचे. ही नदी केवळ जलप्रवाह नाही; ती पावित्र्य, शुद्धता आणि अध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. गीत रामायणातील,
“सरयू तीरावरी अयोध्या, मनू निर्मित नगरी…”

ही ओळ अयोध्येच्या निर्मितीचे आणि तिच्या दैवी स्वरूपाचे सुंदर चित्र उभे करते.
वैवस्वत मनूंनी वसवलेली ही नगरी प्राचीन काळापासून धर्म, संस्कार आणि समृद्धीचे केंद्र राहिली आहे.

रामायणात वर्णिलेली अयोध्या ही कोसल देशाची राजधानी, समृद्ध, सुंदर आणि सुव्यवस्थित नगरी होती. “कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपद महान्…”
विस्तीर्ण रस्ते, रम्य उद्याने, संपन्न नागरिक आणि सांस्कृतिक वैभव. अयोध्या ही नगरी स्वर्गालाही लाजवेल अशी वर्णिली गेली आहे.

इतिहासात अयोध्या(Ayodhya) विविध नावांनी ओळखली जाते. अवधपुरी, साकेत, कोशलपुरी ही संबोधने अयोध्येचीच. इतिहासकारांच्या मते, अयोध्या ही प्राचीन काळी एक महत्त्वाचे व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र होती. सरयू नदीमार्गे जलवाहतूक होत असल्याने व्यापाराची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होत असे.
अयोध्या ही विविध धार्मिक परंपरांचा संगम आहे. ही जैन धर्मातील तीर्थंकरांची जन्मभूमी आहे.

भगवान बुद्धांचे वास्तव्य तर संत तुलसीदासांचे कार्य तद्वतच गुरुनानकदेवांचा संबंधही या अयोध नगरीसोबत पुरातन काळा पासूनच आहे. यामुळे अयोध्या ही समन्वय आणि सहअस्तित्वाची भूमी म्हणूनही ओळखली जाते.

आधुनिकतेकडे वाटचाल

इतिहासाच्या प्रवाहात अनेक चढउतार पाहिल्यानंतर आज अयोध्या पुन्हा नव्या तेजाने उजळली आहे. भव्य-दिव्य राममंदिर, विकसित होत असलेली पायाभूत सुविधा आणि वाढते जागतिक आकर्षण, यामुळे अयोध्या आधुनिकतेकडे वाटचाल करत असतानाच परंपरेशी नाते जपणारी नगरी म्हणून उभी आहे.

सुमारे पाचशे वर्षांच्या कालखंडानंतर आज अयोध्येला तिचे गत वैभव पुन्हा प्राप्त होताना दिसते. मंदिरात विराजमान झालेला बालस्वरूपातील राम, “बालकराम” ही त्या पुनर्जागरणाची साक्ष आहे.

अयोध्या म्हणजे प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. चैत्र शुद्ध नवमी हा दिवस या नगरीच्या इतिहासातील सर्वात मंगल क्षण. कारण याच दिवशी धर्म, मर्यादा आणि आदर्श जीवनाचे प्रतीक असलेल्या प्रभू रामाचा जन्म येथे झाला.

त्या जन्माने अयोध्या केवळ नगरी राहिली नाही; ती धर्माचा श्वास घेणारी, संस्कारांची दिशा देणारी आणि मानवतेला मार्ग दाखवणारी भूमी बनली.
रामजन्माचा तो दिव्य क्षण आजही प्रत्येक रामनवमीला नव्याने अनुभवला जातो तोच मुळात
सरयूच्या लाटांत, मंदिरातील घंटानादात आणि भक्तांच्या “जय श्रीराम”च्या जयघोषात.

आजचे अयोध्याधाम हे केवळ एक स्थान नाही; ते श्रद्धेचे अधिष्ठान, इतिहासाची साक्ष आणि अध्यात्माची अनुभूती आहे.
जिथे रामाचा जन्म झाला, ती अयोध्या केवळ भूमी नाही—ती भारतीयांच्या हृदयातील अखंड प्रज्वलित दीप आहे.

श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६

Social Media