Spiritual : संतभेटीचे अध्यात्मिक मर्म..

Spiritual : संतपरंपरेतील काही प्रसंग केवळ चरित्रकथा म्हणून न वाचता अध्यात्मिक दर्शन म्हणून समजून घ्यावे लागतात. गजानन विजय ग्रंथातील अध्याय १९ हा असाच एक विलक्षण अध्याय आहे. संत गजानन महाराज(Saint Gajanan Maharaj) आणि प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज(Saraswati Swami Maharaj) यांची हृद्य आणि मनोहर अशी भेट म्हणजे दोन व्यक्तींची गाठभेट नव्हे, तर ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग यांचा अद्वैत संगम आहे.

समर्थ रामदासांचे वचन— “साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले…” या अध्यायाचे जणू सूत्रवाक्य ठरते.
टेंबे स्वामी महाराज १९०९ सालचा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील चातुर्मास्य आटोपून नागपूर मार्गे उत्तरेकडील भ्रमंतीत शेगाव मार्गे जाणार हे ठरलेले होते.
त्या काळी टेंबे स्वामी हे कर्ममार्गी होते. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांचे गाढे अभ्यासक, कठोर संन्यासव्रताचे पालन करणारे, ज्ञानमार्गाचे मूर्तिमंत प्रतीक होते.
दुसरीकडे शेगावात गजानन महाराज योगमार्गी. सहज वेश, कधी उग्र तर कधी वात्सल्यपूर्ण, भक्तांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरलेली करुणा, अवतारकार्य करीत होते.
बाह्य दृष्टीने पाहता, हे दोन टोकांचे ध्रुव वाटावेत अशी स्थिती; पण अध्यात्मात ध्रुव नसतात, तेथे केंद्र असते—परमात्म्याचे.
टेंबे स्वामी महाराजांच्या आगमनाची चाहूल गजानन महाराजांना लागताच ते उद्गारले, “ उद्या माझा बंधू येणार आहे. तो कर्ममार्गी आहे.मठात सर्वत्र स्वच्छता राखावी.”

आनंदाच्या लाटांनी हृदयाचा गाभारा भरून टाकणाऱ्या या दोन महान व्यक्तींचा, नव्हे-नव्हे, संतांच्या अनुपम भेटीचा हा हृद्य प्रसंग. भेटीत फारसा शब्दसंवाद नाही; झाली ती दोघांची दृष्ट्भेट. “शब्देविण संवादू”. पण त्यातही अर्थाचा महापूर आहे. कुठेही श्रेष्ठ-कनिष्ठ भाव नाही. कुठेही उपदेशक–शिष्य अशी भूमिका नाही. फक्त परस्पर सन्मान, स्वीकार आणि मौनातील संवाद. “ये हृदयीचे ते हृदयी”. भिन्न मार्गांनी जाणार्या दोन्ही संतांची श्रेष्ठता समान असल्याची अनुभूती इथे येते. ही सारी संत मंडळी वेगवेगळ्या मार्गांनी जाणारी असली तरी त्यांचे अधिष्ठान मात्र एकच असते. ही भेट म्हणजे शब्दरहित प्रवचन आहे.

टेंबे स्वामींचा संन्यासी देह आणि गजानन महाराजांचा अवतारी देह—हे वेगवेगळे जरी दिसत असले तरी आत्मतत्त्वात ते स्वरूपी मिळाले—देहातीत अवस्थेत.

खरे तर टेंबे स्वामी, विवेकप्रधान साधना, वैराग्य, संयम, शास्त्रनिष्ठा, “नेति नेति”चा मार्ग अनुसरण करणारे. आणि गजानन महाराज, प्रेमप्रधान भक्ती, करुणा, सहजता, लीला, “सर्वत्र तोच”ची अनुभूती. ज्ञान आणि भक्ती हे विरोधी नाहीत; ते एकमेकांची परिपूर्णता आहेत ही शिकवण आपल्याला या प्रसंगातून मिळते. बाह्य वेशावरून संतत्व ठरत नाही, शास्त्र व अनुभव यांची सांगड हवी, अहंकार शिल्लक असेल, तर अद्वैत उमगत नाही.

आजच्या काळात पंथ, परंपरा, साधनामार्ग यांवरून भेद वाढतात. अशावेळी गजानन महाराज व टेंबे स्वामी महाराजांची भेट आपल्याला शिकवते, भिन्नतेतून समन्वय, अहंकारातून शून्यता आणि मार्गांपलीकडील गंतव्य. अध्यात्मात दिसणे महत्त्वाचे नाही, असणे महत्त्वाचे आहे. जो स्वरूपात स्थित आहे, त्याच्यासाठी भेद आपोआप गळून पडतात.

मार्ग वेगळे असले, तरी सत्य एकच आहे; देह वेगळे असले, तरी स्वरूप एकच आहे, हीच या “कर्मयोगी आणि योगिराणा” अशा संतभेटीची खरी अध्यात्मिक फलश्रुती.

 

श्रीकांत भास्कर तिजारे.
भंडारा ९४२३३८३९६६

 

Amritakumbh : स्वयंभू प्रेम: भक्तीच्या पूर्णत्वाचा अमृतकुंभ

Social Media