Republic-Day-2026 : आपण सर्वांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजचा दिवस केवळ ध्वजारोहणाचा नाही,
तर संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस आहे.
आपल्या देशाने आता प्रगतीचा वेग पकडला आहे.
नुकतेच महाराष्ट्र शासनाने “दाओस” येथे केलेले सामंजस्य करार म्हणजे नवीन बदलत्या भारताच्या प्रगतीचा एक बिंदू आहे.
“आता देश मागे वळून बघणार नाही…”
कारण आजचा भारत हा केवळ आशा बाळगणारा भारत नाही,
तर ध्येय ठरवून काम करणारा भारत आहे.
आजचा भारत हा केवळ ऐकणारा नाही,
तर जगाला दिशा देणारा भारत आहे.
“आधी भारत ही बाजारपेठ होती… आता भारत निर्मिती केंद्र तयार होत आहे!”
कधीकाळी आपल्या देशाकडे जग फक्त बाजारपेठ म्हणून पाहत होतं.
इथले हात मेहनतीचे होते,
पण संधी दुसऱ्यांच्या ताब्यात होत्या.
आज मात्र परिस्थिती बदलली आहे!
“आम्ही केवळ ग्राहक नाही, आम्ही निर्माते आहोत!”
“आम्ही केवळ आयात करणारे नाही, आम्ही निर्यात करणारे आहोत!”
“आम्ही केवळ वापरणारे नाही, आम्ही नवकल्पना करणारे आहोत!”
आज भारत स्टार्टअप्स(Startups), संशोधन, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ(Space), डिजिटल सेवा(Digital service) या सर्व क्षेत्रांत झेप घेत आहे.
परिवर्तन म्हणजे…(Republic-Day-2026)
हे परिवर्तन म्हणजे विकसीत भारताच्या निर्माणाची सुरूवात आहे आणि ती आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
नागरिक कर्तव्यांची जाणीव हीच खरी देशभक्ती आहे.
देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणे नाही, तर देशभक्ती म्हणजे कर्तव्य निभावणे आहे.
आपल्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेत,
पण सोबतच नागरी कर्तव्येही दिली.
आज आपण स्वतःला सहज विचारू शकतो की,
मी नियम पाळतो का?
मी सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतो का?
मी स्वच्छता ठेवतो का?
मी मतदान करतो का?
मी पर्यावरण जपतो का?
मी समाजात सद्भावना राखतो का?
कारण एक जबाबदार नागरिक घडला, तरच सक्षम राष्ट्र उभं राहतं.
यात आपणही सहभागी होऊ शकतो!
काही जण म्हणतात, “मी एकटा काय करू शकतो?”
पण हे लक्षात ठेवुयात की
मोठे परिवर्तन हे लहान संकल्पांनीच सुरू होते.
या आपल्या भारताच्या नवनिर्माणात आपणही सहभागी होऊ शकतो ते, स्वच्छता आणि शिस्त पाळून, पाणी वाचवून, वीज वाचवून, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन, एक तास समाजासाठी देऊन, कौशल्य वाढवून, सतत शिकत राहून, सोशल मीडियावर जबाबदारीने वागून, जात-पात-भेद विसरून, एकतेचा संदेश देऊन.
देशाच्या प्रगतीत “सरकार” हा एक घटक आहे,
पण राष्ट्रनिर्माणाचे खरे आधारस्तंभ आपण नागरिक आहोत!
आज प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी एक संकल्प करू शकतो.
“मी भारतावर केवळ प्रेम करणार नाही,
मी भारतासाठी काम करीन.”
“मी केवळ अधिकार मागणार नाही,
मी माझे कर्तव्य आधी पार पाडीन.”
“मी तक्रार करणार नाही,
मी परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करीन.”
आपला देश महान आहे,
पण तो अधिक महान होईल—
जेव्हा प्रत्येक नागरिक ‘मी’ नव्हे, ‘आपण’ असा विचार करेल.
“आता देश मागे वळून बघणार नाही…कारण भारत आता निर्माता आहे!”**
जय हिंद.
श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा – ९४२३३८३९६६
हेही वाचा- Amritakumbh : स्वयंभू प्रेम: भक्तीच्या पूर्णत्वाचा अमृतकुंभ