Pan-2.0-Scam : आजच्या काळात पॅन कार्ड एक आवश्यक दस्तावेज बनले आहे. आयकर भरण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत अनेक कामांसाठी तसेच सरकारी योजनांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. यामुळे अनेक कामे सोपी झाली असली, तरी ह्या सुविधेचा वापर करून घोटाळे होण्याची शक्यता वाढली आहे. बाजारात एक नवीन फिशिंग घोटाळा चालू आहे.
‘तुमचा नवीन पॅन २.० सज्ज आहे, येथे क्लिक करा आणि डाउनलोड करा,’ असा ईमेल मिळाल्यास सावध राहा. हे पॅन कार्ड फिशिंग घोटाळ्याचे संकेत आहेत. याद्वारे तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरली जाऊ शकते. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊन मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
‘पॅन २.०’ घोटाळा हा ई-पॅनच्या नावाखाली होणारी फसवणूक आहे. यात घोटाळेबाज तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर मिळवून तुम्हाला पॅन कार्डाचा ईमेल पाठवतात. हे ई-पॅन असून त्यात क्यूआर कोडसारखी वैशिष्ट्ये असल्याचा दावा करतात. दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या डिव्हाइसचे नियंत्रण घोटाळेबाजांकडे जाते आणि मोठी फसवणूक होते.
पॅन 2.0 घोटाळा एका सामान्य ईमेलसारखा दिसू शकतो, पण तो धोकादायक आहे. या घोटाळ्याद्वारे फसवणूक करणारे तुमची गोपनीय माहिती चोरून बाजारात विकतात आणि तुमच्या बँक खात्यांवर ताबा मिळवतात. यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते, तुमच्या नावावर कर्ज घेतले जाऊ शकते किंवा आर्थिक व जीएसटी घोटाळे(GST scams) होऊ शकतात. त्यामुळे, अशा घोटाळ्यांपासून सावध राहा.
अशा घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:(Pan-2.0-Scam)
- भारत सरकार ईमेलद्वारे संपर्क साधत नाही, त्यामुळे अनोळखी ईमेल उघडू नका.
- कोणत्याही ईमेलमधील संशयास्पद लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका.
- सरकारी वेबसाइट्स ‘.gov.in’ डोमेन वापरतात, त्यामुळे याच वेबसाइट्स वापरा.
- कोणत्याही अनोळखी वेबसाइट किंवा ईमेलमध्ये आपली बँक किंवा वैयक्तिक माहिती टाकू नका.
- संशयास्पद ईमेल त्वरित स्पॅम म्हणून नोंदवा.
- पॅन किंवा करासंबंधी संदेश/ईमेल केवळ NSDL किंवा आयकर विभागाच्या अधिकृत साइटवरूनच येतात.
चुकीच्या लिंकवर क्लिक झाल्यास त्वरित कार्यवाही करा:(Pan-2.0-Scam)
पॅन, आधार, बँक तपशील किंवा ओटीपी स्कॅमर(OTP scam) वेबसाइटवर भरल्यास, तातडीने बँकेत संपर्क साधा. खाते गोठवण्याची किंवा देखरेख करण्याची विनंती करा. आपले बँकिंग, नेट बँकिंग आणि UPI पिन तसेच सोशल मीडिया आणि ईमेल आयडीचे पासवर्ड बदला. www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल करा आणि स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवा.
पॅन २.० च्या नावावर बनावट ईमेल मिळाल्यास, त्याची तक्रार www.cybercrime.gov.in या भारत सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवा. येथे सायबर फसवणूक, फिशिंग ईमेल आणि ऑनलाइन फसवणुकीसारख्या प्रकरणांची नोंदणी केली जाते.