मंकी बात- २

लोकशाहीचा राजा ‘मतदार’ ; त्यांचे राज्य येणार आहे की नाही?

Municipal-elections

 

बंडोबांची भिती, अशी ही पळवापळवी!

political-satire : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांचा रणसंग्राम सध्या धुमसतो आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून युत्या-आघाड्या आणि जागावाटपांचे प्रश्न अंतिम टप्प्यात आले आहेत. मात्र या रमीच्या डावात पहिल्यांदा शो करायला कुणी तयार नसल्याचे दिसत आहे. काहींनी अजून चर्चा सुरू आहेत, वाटाघाटी होत आहेत असा माहोल ठेवला आहे तर काहीजणांकडून मुलं पळवणाऱ्या टोळीचे कारण सांगून गुप्तता पाळली जात आहे. या मागचे खरे कारण मात्र ‘बंडोबांची भिती’ आणि ‘अशी ही पळापळ किंवा पळवापळवी’ हेच आहे. सगळ्याच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. जागावाटपांच्या गोंधळात अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. मग बंडाची ऊर्मी, दुसरीकडे जागा शोधण्याची धावपळ केली जात आहे. काही सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांच्या अश्या इच्छुकांना गळाला लावले जात आहे!

A-cartoon-style-illu

नेत्यांच्या मुलाबाळांच्या उमेदवारीचे पेव

या साऱ्या अ,ब,क,ड महानगरांचा कारभार गेल्या पाच ते तीन वर्षापासून ‘रामभरोसे’ झाला होता. आता त्याला स्थानिक जनतेच्या सहभागाची ऊब देण्याचा लोकशाही साज चढविण्यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. स्थानिक जनतेला गेली काही वर्ष आपल्या नागरी प्रश्नांसाठी कुणाला दाद मागायची हा प्रश्न होता. तसे पाहिले तर सध्या प्रत्येक गावचा गाडा हा त्या त्या गावच्या पै पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या  गल्ली, मोहल्ला, आळी- लेन प्रभागातील भाई- भाऊ, नाना, दादा, तात्या, ताई, माई, अक्का यांच्या हाती असतो. त्यांच्यात देखील सोयीची भांडणे आणि एकोपा असतो. पण सामान्य माणसाला वेळप्रसंगी त्यांच्याच आधाराने आपल्या आडी-अडचणी घेवून जगावे लागते. यावेळच्या निवडणूकांची गंमत म्हणजे सगळ्याच पक्षांतल्या नेत्यांच्या मुलाबाळांच्या उमेदवारीचे पेव फुटले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष कार्यकर्ता राहिलेल्यांना आणि त्यांच्या नातलग मुलाबाळांना यामध्ये फारसा ‘चान्स’ राहिला नाही. त्यांनी फक्त. . .  ‘आगे बढो हम तुम्हारे पिछे (कायमचे) है’ म्हणायचे! ही लागण सगळ्याच पक्षात आहे. गेल्या चार पाच वर्षापासून सर्वात मोठ्या पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे मुळच्या पक्षाच्या निष्ठावंताचा कुणीच वाली राहिलेला नाही. राजकीय विचारसरणी? वगैरे सध्या काहीच नसल्याने (म्हणजे काय रे भाऊ?) कुणीही कुठेही उड्या मारून झेंडा बदलायला मोकळा आहे. या गडबडीत अनेकांच्या घरात बाप-आई मुलगा–मुलगी काका-मामा वेगवेगळ्या पक्षांत गेल्याचे पहायला मिळत आहे. जनसेवेची तळमळ असलेल्या या मंडळींना फक्त एक संधी,एक तिकीट  हवे आहे! ते कोणत्याही पक्षाचे का असेना?  त्यासाठी सर्वाधिक गर्दी महायुतीच्या पक्षांमध्ये आहे. काहिशी तशीच स्थिती महाआघाडीतही आहे. पण महायुतीच्या उमेदवारांकडे ‘साधनशुचिता’? (सध्या खुंटीला टांगली) असली तरी निवडणूकांची ‘साधनसामुग्री’ मुबलक प्रमाणात उपलब्ध केली जात आहे, असे काही इच्छुकांनी खाजगीत सांगितले!

Maharashtra-Politics

लोकांना मतदानाच्या दिवशी काय हवे?

महाआघाडीच्या पक्षांकडे देखील काही प्रमाणात हे सारे आहे पण तेथे गाजावाजा नाही ‘. . .  मामला हळूहळू बोंबला’ असा तिथला ‘माहौल’ आहे म्हणे! ‘निवडून येण्याची शक्यता’ हा सध्या सर्वच उमेदवार आणि पक्षांसाठी परवलीचा शब्द झाला आहे. त्यासाठी काय निकष असतात? असा सहजप्रश्न पडतो म्हणून काही इच्छुकांना विचारले तर ‘नांव सांगू नका म्हणत ते म्हणाले ‘सर्वात महत्वाचे आहे लोकप्रियता, त्यानंतर क्षमता त्यात स्थानिक राजकीय सामाजिक आणि आर्थिक वगैरे सगळे आले.’ त्यानंतर ज्या पक्षासाठी उमेदवारी हवी तेथील नेत्यांशी घसट किंवा/आणि त्याशिवाय वजन टाकण्याची तयारी हवी! खर्चासह व्हिजन आणि लोकांच्या प्रश्नांची जाण हवी! जसे की कोणत्या गल्लीतल्या लोकांना मतदानाच्या दिवशी काय हवे? किती हवे? त्यावर खर्चासाठी काय करावे?इत्यादी. काही जणांकडे तर अशी गल्लोगल्ली स्वत:ची पॉकेट तयार आहेत म्हणे! म्हणजे वरच्या आळीतले २००, खालच्या आळीत ४००, एका इमारतीत आपली शंभर हक्काची आणि ५० खर्चाची आहेत,इत्यादी हिशेब तोंडपाठ असायला हवेत!

Maharashtra-Election

मतदारांचा कुणीच विचार करायला तयार नाही?

तर अश्या या ख-या खु-या लोकोत्सवाच्या तयारीसाठी यंदा आणखी एक मजेशीर गोष्ट आहे. स्थानिकांच्या मताने म्हणे युती किंवा आघाडीचे निर्णय घेतले जात आहेत. दोन भावांची वीस वर्षांनी पुन्हा एकत्रित लढायची तयारी मुंबई(Mumbai)त झाली आहे, याचे कारण पुन्हा फडण’वीस’ आहेत म्हणे! म्हणजे चांगल्या आणि वाईट अर्थानेही! अंधभक्तांना वाटते आहे की भावांच्या एकत्रीकरणा मागे ‘देवाची लिला’ आहे! तर भाजप विरोधकांना वाटते आहे की बाळासाहेबांच्या नंतर ठाकरेब्रँण्ड(Thackeray Brand) ला जिवंत करण्यामागे ‘एका’ राजकारणाचा अंत करण्याचा प्रयत्न आहे.  त्याशिवाय अन्य अनेक शहरात ठाकरे+ठाकरे+पवार आहेत, त्यांच्याकडून ‘हम साथ साथ है’ ची ग्वाही देण्यात येत आहे. तर काही शहरात ‘पवार ऍण्ड पवार’ चा नवा राजकारणाचा अध्याय लिहिला जात आहे!  हे झाले कौंटुबिक राजघराण्याचे राजकारण याशिवाय महाआघाडीचे तीन पक्ष काही ठिकाणी एकत्र लढणार आहेतच! आणि महायुतीचे पक्ष सुध्दा काही ठिकाणी एकत्र आहेत त्यात पुन्हा ‘मोठा भाऊ छोटा भाऊ’ अश्या व्याख्या आहेत! तरीही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती आहे. कारण एकत्र आलो म्हणजे कुणाच्या चिन्हावर लढायचे? असा संभ्रम काहींना आहे. गंमत म्हणजे त्याच चिन्हाच्या लढाईत त्यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुटायचा बाकीच आहे! पण ते निवडणूकीत एकत्र आहेत?! एकंदर मतदारांच्या मेंदूचा काही कुणीच विचार करायला तयार नाही!political-satire

Raj-Uddhav-Thackeray

मतदानाचा दिवस लॉटरीचे तिकीट काढण्यासारखा?

मतदार याद्यांचा गोंधळ असाच गमतीचा विषय आहे, कुणाच्या मयत झालेल्यांना केवळ मतदानाच्या दिवशी यावे लागत आहे, कारण त्यांचे मतदान होताना दिसत आहे! तर कुणाच्या गैरहजेरीतही त्यांचे मतदानांचे कर्तव्य आपोआप पार पाडले गेल्याचे दिसत आहे! कुणाची नावे दुबार तिबार चार पाच ठिकाणच्या प्रभागात दिसत आहेत, त्यांच्यासाठी मतदानाचा दिवस लॉटरीचे तिकीट काढण्यासारखा आहे! घरोघरी मतांचा दर  ठरवला जात आहे, कोण काय देणार? यांची माहिती घेवून त्यासाठी मांडवली केली जात आहे. लोकशाहीच्या उत्सवाला लक्ष्मीच्या दर्शनाची आस आहे! सगळ्यांना माहिती आहे की, ही ‘आस नव्हे आपणच लोकशाहीच्या म्हणजे स्वत:च्या गळ्याला लावून घेतलेला फास आहे’. पण अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नसते! हे कारण देखील खास आहे! काही ठिकाणी म्हणे मतदानाच्या दिवशी बरेच पाहुणे येवू लागले आहेत. आदल्या दिवशी मुक्कामी येणारे हे पर राज्यातील, जिल्हयातील पाहुणे आल्यासारखे मतदान वगैरे नीट करून जात आहेत! याच पाहुण्यांचा ‘पाहुणचार’ आता ’वोटचोरी’ शोधणाऱ्यांकडून केला जाणार आहे म्हणे त्यासाठी त्यांच्याकडून तेल-सोटे आणि रश्शी- दोऱ्या जमवल्या जात आहेत!political-satire

Maharashtra-Election

लोकशाहीचा राजाचे राज्य येणार आहे की नाही?

गंमत म्हणजे राजकीय पक्षांकडून जागावाटप तिकीट वाटप युती-भिती-प्रिती-माती असे काही बोलले जावू लागले असले तरी या निवडणूका ज्यांच्यासाठी होणार आहेत (म्हणे?) त्यांच्या सध्याच्या स्थितीकडे कुणाचेच लक्ष नाही. शहरांना सुज आली आहे,कचऱ्याचे ढिग झाले आहेत, रस्त्यांच्या चाळणी, वाहतुकीच्या कोंडीने डोकी सुन्न झाली आहेत. पिण्याचे पाणी नाही, आरोग्य शिक्षण सुविधा नाहीत, रोजगाराच्या संधी नाहीत, लोकांना खेळायला मैदाने नाहीत, चालायला पदपथ नाहीत, भाजी मंडया, स्मशानभुमी, समाजमंदिरे, शौचालयांच्या सुविधा नाहीत. करांच्या ओझ्याने नागरिक झुकले, कर्जांच्या ओझ्याने स्थानिक स्वराज्य संस्था वाकल्या आहेत. योजनांचा बोजवारा, भ्रष्टाचाराच्या ढिगाऱ्यांच्या सोबतीला आता पर्यावरणाच्या समस्या आहेत. तरीही राजकीय पक्षांना बहुमताच्या सत्तेची ओढ आहे त्यासाठी सारी चढाओढ आहे.political-satire

२९ पैकी वीस ठिकाणी फडणवीस जिंकणार आहेत. पाच ठिकाणी ठाकरें आणि कंपनी येणार आहे अन्य ठिकाणी स्थानिक नेत्यांचा करिश्मा दिसणार आहे. पण त्यात लोकशाहीचा राजा मतदार त्यांचे राज्य येणार आहे की नाही? याचे भाकीत(Prediction) कुणालाच करता येत नाही! हीच या लोकशाहीची शोकांतिका आहे! तुर्तास इतुकेच!

 

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

 

हेही वाचा –  मतदान: आपल्याच हाती पुढील पाच वर्षांच्या जीवनाचे फर्मान!तरचं जिवाची मुंबई आणि मुंबईचा जीव वाचेल. . .?

Social Media