International-Women’s-Day : भक्तीतून उमललेली स्त्रीशक्ती

International-Women’s-Day : भक्तीतून उमललेली स्त्रीशक्ती
भारतभूमी ही संतांची खाण मानली जाते. या आध्यात्मिक खजिन्यात अनेक तेजस्वी संतांनी आपली जीवनदीपिका पेटविली. त्या तेजस्वी परंपरेत स्त्री संतांचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण आहे. समाजाच्या कठोर बंधनांत अडकलेल्या काळातही या स्त्री संतांनी आत्मशोध, भक्ती आणि निर्भय अभिव्यक्तीचा मार्ग दाखविला. आजही त्यांचे विचार आणि जीवन आपल्याला प्रेरणा देतात.

भूतकाळातील सामाजिक वास्तव पाहिले, तर स्त्रीच्या आयुष्याभोवती अनेक बंधने आणि मर्यादा होत्या. घरातील दुय्यम स्थान, स्त्री जन्माला येण्याची खंत, शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक बंधने — हे त्या काळातील बहुतेक स्त्रियांचे वास्तव होते. “स्त्रीमुक्ती” (“Women’s Liberation”)हा शब्दही समाजात ऐकू येत नव्हता. अशा परिस्थितीत काही स्त्रियांची अंतःकरणे मात्र मुक्त झाली. त्यांनी स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा आणि आत्मस्वर व्यक्त करण्याचा धाडसी मार्ग निवडला.

या संत मायमाऊलींच्या स्मृती आपल्याला सांगतात —(International-Women’s-Day)

या स्त्री संतांच्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग आले. समाजाने, कुटुंबाने किंवा परिस्थितीने कधी त्यांना एकाकी केले. पण या एकाकीपणात त्यांनी संपूर्ण विश्वाला आप्त मानणाऱ्या परमेश्वराशी नाते जोडले. ईश्वर त्यांचा सखा, पिता, माता आणि आधार बनला. त्या भक्तीच्या आधारे निर्भय आणि निश्चयी झाल्या. ज्या काळात स्त्रीची मुक्त अभिव्यक्ती पाप समजली जात होती, त्या काळात त्यांनी आपल्या अंतःकरणातील भावनांना शब्द दिले.

कधी त्या कृष्णाशी बोलत, कधी विठ्ठलाशी हितगुज करत, तर कधी आपल्या गुरुमाऊलीशी संवाद साधत. या संवादातून त्यांच्या भक्तीची, प्रेमाची आणि आत्मशोधाची अभिव्यक्ती झाली. स्त्रीसुलभ कोमल हृदयात असलेली करुणा आणि माया त्यांच्या काव्यातून आणि वर्तनातून प्रकट झाली. त्यांच्या अंतःकरणातील आकाशाएवढ्या प्रेमाने अनेक दुःखी जीवांना आश्रय दिला.

भारतीय संतपरंपरेतील अनेक स्त्री संत आजही आदराने स्मरणात आहेत. संत मीराबाई, (Sant-Mirabai) जनाबाई, (Janabai) सखुबाई, (Sakhubai) कान्होपात्रा, (Kanhopatra) तसेच दक्षिणेतील अक्का महादेवी यांसारख्या संतांनी भक्तीचा अनोखा आदर्श घालून दिला. या संतांनी लौकिक सुखाचा मोह न धरता शाश्वत आनंदाचा शोध घेतला. त्यांच्या आयुष्यात सुखसोयी नव्हत्या, पण त्यांच्याकडे अखंड श्रद्धा आणि भक्ती होती.

मीराबाईने राजवाड्याच्या वैभवाला नाकारून कृष्णभक्तीचा मार्ग स्वीकारला. जनाबाईने विठ्ठलभक्तीतून श्रमाला आणि सेवेला आध्यात्मिक अर्थ दिला. सखुबाईने संसारातील क्लेशांतही अखंड भक्तीचा दीप जपला. कान्होपात्रेने समाजाच्या अवहेलनांवर मात करून विठ्ठलाशी आत्मनाते जोडले. अक्का महादेवीने जगाच्या बंधनांपासून मुक्त होऊन आत्मज्ञानाचा मार्ग धरला.

या स्त्री संतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दुःखाला पराभव मानले नाही. उलट त्या दुःखालाच साधनेचा मार्ग बनविला. त्यांनी स्वतःच्या वेदनांना भक्तीमध्ये परिवर्तित केले आणि समाजाला प्रेम, समता आणि आत्मस्वातंत्र्याचा संदेश दिला. त्यांच्या जीवनातून एक मोठा धडा मिळतो — खरी मुक्ती बाह्य परिस्थितीत नसून अंतःकरणातील जागृतीत असते.

आजच्या आधुनिक युगात स्त्री शिक्षण, अधिकार आणि समानतेबद्दल चर्चा होत आहे. हे परिवर्तन स्वागतार्ह आहे. मात्र स्त्रीशक्तीचा खरा अर्थ केवळ अधिकारांमध्ये नसून आत्मविश्वास, करुणा आणि मूल्यांमध्ये आहे, हे स्त्री संतांच्या जीवनातून स्पष्ट होते. त्यांनी समाजाला केवळ आध्यात्मिक नव्हे तर मानवी मूल्यांचा मार्ग दाखविला.

महिला दिनाच्या निमित्ताने या संत स्त्रियांचे स्मरण करणे म्हणजे केवळ इतिहासाचा गौरव नव्हे, तर आत्मबल आणि आध्यात्मिक शक्तीचा आदर्श स्वीकारणे होय. त्यांच्या जीवनकथांचे वाचन, चिंतन आणि स्मरण आपल्याला नम्रतेने नतमस्तक होण्याची प्रेरणा देते.

दुःख कितीही असो, परिस्थिती कितीही कठीण असो, पण अंतःकरणातील भक्ती, प्रेम आणि आत्मशोधाचा दीप कायम प्रज्वलित ठेवला तर जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो.
मातृशक्तीला “जागतिक महिला दिनाच्या” खूप खूप शुभेच्छा.



श्रीकांत भास्कर तिजारे
9423383966

Social Media