सत्तेचा पिसाटलेला खेळ?, देवालाच माहिती! किती कर्तबगार नेत्यांचा बळी घेणार? दैव जाणिले कुणी?
बॉक्स : बारामतीच्या हवाईपट्टीचा विकास योग्य पध्दतीने झाला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यापासून धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही असे संशयाचे धुके आता तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत. ज्या अजीत पवार(Ajit Pawar) यांचे या भागातील विकासकामांवर डोळ्यात तेल घालून लक्ष होते त्यांनाच मरणोत्तर यासाठी जबाबदार धरण्याचा हा खुनशीपणाचा विचार देखील असू शकतो?. मात्र अजित पवार ही व्यक्ती ज्यांच्या डोळ्यात आणि डोक्यात कायम सलत आली त्यांच्यासाठी त्यांचे अपघाती निधन ही आसुरी आनंदाची पर्वणी असल्याचे समूह माध्यमातून पाहिले तेंव्हा ही माणसे आहेत की जनावरे असा प्रश्न उभा राहिला. सत्तेचा पिसाटलेला खेळ अश्या किती कर्तबगार नेत्यांचा बळी घेणार आहे? ते मात्र सध्या कुणालाच माहिती नाही दैव जाणिले कुणी? सत्तेच्या भुकेल्यांच्या राजकारणात ‘असंगाशी संगा’ची नको ती किंमत चुकविलेला रांगडा गडी : अजीत अनंतराव पवार! अजीत दादा!
नको ती किंमत चुकविलेला रांगडा गडी :
महाराष्ट्रात मोठी राजकीय उलाथापालथ होण्याची भाकीतं मागील महिनाभरापासून केली जात आहेत, सुनील तटकरे दादांऐवजी उपमुख्यमंत्री होवू शकतात असे राजकीय वर्तुळात कुजबूज देखील सुरू झाली होती. पण तीन दशके राजकीय पत्रकारिता करताना जर तरच्या शक्यतांवर बोलताना किमान लॉजीक असावे असे मनात आले, आणि मग अजित पवार(Ajit Pawar) काय करणार? असा उलट प्रश्न त्या चर्चा करणाऱ्यांना विचारला तर तो पत्रकार(?) निरुत्तर झाला. त्यानंतर आता २८ जानेवारीचा भेसूर दिवस पाहिला आणि हादरलोच! महापालिका निवडणुका आणि त्यानंतर च्या घटनाच्या मागचा नियतीचा चेहरा इतका भेसूर राक्षसी नरभक्षक असेल याची कुणी कल्पनाही केली नसेल.! महाराष्ट्राने बेभरवश्याच्या राजकीय खेळात आपला हुकूमाचा शिस्तप्रिय धडाडीचा प्रचंड अनुभवी आणि लोकांच्या हितासाठी भल्या सकाळपासून धडपडणारा अवघा ६६ वर्षाचा ऊमदा नेता गमावला आहे! हे पाहिल्यानंतर राजकीय पटलावरून पवार आणि ठाकरे ही नावे कुणालातरी पूसून टाकायची आहेत या संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या उद्गारांना बळ मिळते!

यू टर्न घेत नेहमी वादात सापडणारे राजकीय नेते
आपल्या राजकीय निर्णयांची यू टर्न घेत नेहमी वादात सापडणारे राजकीय नेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्या विमानाने बारामतीच्या विमानतळावर दोनदा यू टर्न घेतला पण दाट धुक्यामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमान उतरताना खड्ड्यात गेल्याने अपघातग्रस्त होवून त्यात अजीत पवार यांचा अकाली अंत झाला! असे सांगण्यात येत असले तरी हे जे काही झाले त्या घटनेबाबत संशयाचे ढग देखील दाटून आले आहेत. स्वत: शरद पवार(Sharad Pawar) यांनी बारामतीला घटनास्थळी जावून माहिती घेतली तेंव्हा धावपट्टीच्या बाजुला मोठ्या खड्यात विमान जावून पेटले असे सांगितल्यावर त्यांनी ‘खड्यात’ असे म्हणत आश्चर्य व्यक्त केल्याचे व्हिडीओ प्रसारित झाले आहेत. भल्या सकाळी उठून दररोज कुठल्या न कुठल्या विकासकामांना भेट देवून त्यांच्या दर्जा आणि उपयुक्ततेबाबत डोळ्यात तेल घालून लक्ष देणारे अजित दादांसारखे नेते देखील या बारामतीच्या हवाईपट्टीच्या भरावाच्या बाजुला असलेल्या खड्ड्याकडे लक्ष देवू शकले नाहीत.? आणि अखेर त्याच खड्याने त्यांचा घात केला असा काहीसा मरणोत्तर अजीत पवारांनाच दोष देण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या विरोधकांना त्यातून करायचा नाहीना अशी शंका त्यामुळे निर्माण झाली.

देशात अजितदादांसारख्याच स्पष्टवादी नेत्या ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी तर रस्त्यावर येवून दादांच्या निधनामागे राजकीय कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर मल्लिकार्जून खर्गे, अखिलेश यादव यांच्याकडूनही विरोधातील नेत्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करण्यात आली. पण दादांचे सख्खे काका आणि देशाच्या राजकारणाचे धुरंधर नेते शरद पवार यांनी मात्र अशी शंका घेवून राजकारण करू नका असे म्हणत या अपघाताची कारणे चौकशी अंती समोर येईपर्यंत काही बोलणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तरी देखील सगळीकडे हा घातपातच असल्याचा ठाम समज होण्यामागेच सारे काही सत्य दडले आहे नाही का? सारेच अविश्वसनीय! अनपेक्षीत!!
अजीत दादा चर्चेत तसे अनेक वर्ष राहिले मात्र २०१९ला नोव्हे. महिन्यात भल्या सकाळी महाविकास आघाडीचे सरकार येता येता अचानक त्यांना बाजुला टाकून ‘यू टर्न’ घेत अजीत पवार यांनी साऱ्या देशाला धक्का दिला. राजभवनावर भाजपसोबत भल्या सकाळीच कोश्यारीसमोर शपथविधी पार पाडणारे अजीत पवार यांनी त्यानंतर केवळ ८० तासांत ‘यू टर्न’ घेत भाजपला तोंडघशी पाडलं होतं. त्यानंतर पुन्हा ते केवळ आठवडाभरात चक्क उध्दव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने त्यांची उत्तम प्रशासकाची गुणवैशिष्ट्ये अनुभवली. फारसे शिक्षण नसताना वित्त आणि नियोजनमंत्री म्हणून महाराष्ट्राचे सर्वाधिक अकरा अर्थसंकल्प तयार करणारा हा नेता कपटकारस्थानाच्या राजकारणांचा बळी ठरल्याची खंत आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

खराखुरा निर्मळ मनाचा रांगडा राजकीय नेता
खराखुरा निर्मळ मनाचा रांगडा राजकीय नेता असणाऱ्या दादांना आजही शासकीय सनदी अधिकारी टरकून असायचे. मात्र हेच सनदी अधिकारी सध्या मंत्रालयात अन्य मंत्र्याच्या (अगदी भाजपच्याही) अस्तित्वाची देखील दखल घेत नसल्याचे किस्से आपण अलिकडे रोजच ऐकू लागलो आहोत. मात्र ‘असंगाशी राजकीय संग’ करण्याचा फटका दादांना बसल्याचे अलिकडेच महापलिका निवडणूकीचा निकाल आल्यानंतर राजकीय विश्लेषक म्हणू लागले होते. तर हे स्वत: दादांनीही मान्य करताना जाहीर भाषणातून ‘बाबानो हे राजकारण लय वंगाळ आहे याच्या नादी लागू नका आपला उद्योग व्यवसाय करा आणि सुखाने रहा’ असे सांगण्यास सुरुवात केली होती! त्यामुळेच त्यांनी त्यांच्या चूका सुधारण्यास सुरुवात करताना मित्रपक्षाला पुन्हा तोंडघशी पाडण्याची तयारी केली होती का? दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र करुन लढायची तयारी करत नव्याने ‘यू टर्न’ सुरू केला होता का! तोच तर त्यांच्या जिव्हारी आला नाही ना? अश्या चर्चा जनसामान्यात सुरू झाल्या आहेत.

त्याचे कारणही तसेच आहे. अजितदादा भाजप सारख्या पक्षासोबत गेले मात्र त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार करणारे तत्वाचे राजकारण सोडले नाही म्हणून ते रेशीमबागेच्या प्रांगणात अन्य सहयोगी पक्षांचे नेते गेले तरी कधी गेले नाहीत! त्यांच्या या गोष्टी तश्या खटकणाऱ्याच होत्या. त्यामुळेच अगदी बारामतीला त्यांच्या पत्नीला त्यांनी सुप्रियाताईंच्या विरोधात उभे केले तेंव्हा देखील त्यांच्या सहयोगी पक्षाच्या अनेकांचा घड्याळासोबत जाण्यास आणि मत देण्यास विरोध होता. खडकवासला, दौंड मध्ये तर अनेकजण त्यामुळे मतदानालाही फिरकले नाहीत आणि दादांचा पराभव झाला. पिंपरी पुण्याच्या महापलिका निवडणूकीतही त्यांना असेच एकाकी करण्यात आल्याचे दिसले.
भाजपसोबत असलो तरी आमची विचारधारा वेगळी आहे ते त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले होते. मग ते मुस्लिम आरक्षणाचा विषय असो किंवा नबाब मलिक यांच्या सारख्या नेत्याला भाजपने दाऊदशी संबंध असल्याचे सांगत बहिष्कृत करण्याचा भाजपचा निर्णय असो अजित पवार प्रत्येकवेळी आपल्या मूळ भुमिकांपासून दूर गेले नाहीत. कदाचित त्यांचा हा खमकेपणा स्पष्टवादीपणा त्यांच्या राजकीय अस्तिवाच्या आड आला का? अशी हळहळ आता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचा स्पष्टवादी नेता
अगदी यावेळीसुध्दा महपालिका निवडणूका जाहीर झाल्या. भाजपने जागावाटपाच्या खेळात मुंबईसह पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad) पुण्यात अजीत पवारांना खड्यासारखे बाजुला करत निवडणूका एकतर्फी लढल्या आणि जिंकल्या. त्यावेळी निवडणूक प्रचारातून अजीत पवार यांनी भाजपला ‘सत्ता संपत्तीची राक्षसी भूक’ लागल्याची टिका केली होती. इतकेच नाही तर आपल्यावर सिंचनाच्या हजारोकोटींच्या भष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवणारेच आपल्या सोबत सत्तेवर आहेत असे सांगून ऐन निवडणूकीत त्यांनी भाजपच्या काही सिंचनाच्या प्रकल्पाच्या फाईली आपल्याकडेही आल्या होत्या असे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सत्ताधारी मित्रपक्षाची त्यांनी राजकीय अडचण केली होती. त्यापूर्वी त्यांच्या मुलाच्या कथित जमीन घोटाळ्यावरून त्यांना टार्गेट करण्याचाही आणि नंतर क्लिनचीटही देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तरीही दादांचा पक्ष राष्ट्रवादी असला तरी ते स्वत: स्पष्टवादी किंवा कधीतर फटकळ वाटावे अश्या पध्दतीने वागताना बोलताना दिसत होते. त्यांचा हा स्वभावच त्यांच्या भविष्याचा अडथळा ठरला का? अशी शंका घेतली जात आहे.
राज्यात दुष्काळी स्थिती असताना धरणात पाणी नसल्याचे विचारणा केल्यानंतरच्या त्यांच्या उत्तराने तर त्यांना मनस्ताप पश्चात्ताप आणि आत्मक्लेष करत काही दिवस सत्तापदांपासून दूर जायला लावले होते. पण आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आडपडदा न ठेवता लोकांच्या कामांसाठी तळमळीने काम करणारे विरळाच नेतृत्व म्हणजे अजित पवार होते. कोयना जलाशयात लेक टँपिंग करणारे जलसंपदा मंत्री अजित पवार हे शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळेंच्या विरोधात असल्याचे चित्र रंगविण्यात येत होते. मात्र यशंवतराव चव्हाण केंद्रात ज्यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना आपल्या शैलीत ‘दादागिरी’ केली त्यावेळी देखील ते काकांपासून दूर जात असल्याचे संकेत त्यांनी दिले अश्या संकेताच्या बातम्या देण्यात आल्या होत्या. तेंव्हाही त्यांना दादा दादा म्हणत कच्छपी लागणाऱ्यांना कॅमेरासमोर फटकारत त्यांनी ‘अरे थांबा नारे दादा पादा’ असे म्हटल्याने गंभीर प्रसंगातही हास्याचा स्फोट झाल्याचे दिसले होते. शरद पवार जितके गुढ संयमी आणि आतल्या गाठीचे नेते समजले जातात त्याच्या नेमके उलट दादा मोकळे ढाकळे बेधडक आणि अलिकडे तर दिलखुलास नेते म्हणून समोर आले होते!

सत्तेच्या भुकेल्या राजकारणात सर्वसामान्यांचा ‘दादा’ नेता
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात सकाळी सात वाजता जनता दरबार घेणारे आणि वेळेत येताना लांब दूरवरून आलेल्या लोकांच्या सकाळच्या चहा-नाश्त्याची विचारपूस करणारे अजीत पवार सध्याच्या ‘सत्तेच्या भुकेल्या लोकांच्या राजकारणात’ जराही शोभून न दिसणारेच म्हणायला हवेत! महाराष्ट्रात प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे, यांच्या परंपरेत शोभतील असे गुणी नेतृत्व उद्याच्या महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याची ताकद असणारे नेते काळाने हिरावून नेले आहेत. आज ज्या पध्दतीने अजित पवार यांनी राजकीय पटलावरून क्षणार्धात एक्झीट घेतली ते मनाला चटका लावून जाणारेच म्हणावे लागणार आहे. स्वत: अजित पवार यांच्या संपर्कात येणाऱ्यांना प्रत्येकवेळी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये गोविंदाग्रजांच्या ‘राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम आमुचा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा’ या काव्यपंक्तींचा अनुभव येत होता.

महाविकास आघाडीचे ते नुकतेच उपमुख्यमंत्री झाले त्यावेळचा हा प्रसंग आम्ही समोर अनुभवला. त्यांच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे भेटीसाठी आलेल्यांची गर्दी होती. महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) तर थेट मातोश्रीतून त्या पदावर येवून बसल्याने पदसिध्द मुख्यमंत्री असले तरी प्रशासकीय बाबतीत उपमुख्यमंत्री असणारे दादांच मागच्या बाकावरचे मुख्यमंत्री समजले जात होते. (तर त्यांचे काका अदृश्य मुख्यमंत्री समजले जात!) ठाकरे मंत्रालयात येत नसत पण अजित पवार सकाळी नऊ पासून रात्री नऊ वाजेपर्यंत काम करताना दिसत. असेच एकदा त्यांना तातडीने सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीला जायचे होते म्हणून ते निघाले तर दालनाच्या बाहेर भेटणाऱ्या अभ्यागतांची प्रचंड गर्दी होती. त्यांना टाळून जाताना त्यांनी एकवार गर्दीवर नजर फिरवली. त्यात दोन म्हाताऱ्या डोईवर पदर घेवून हाती कसलेसे कागद घेवून बसलेल्या दिसल्या. त्या घाईतही दादा मागे वळले त्या म्हाताऱ्या बायांजवळ जात ‘आज्जी काय काम आणलं आहे?’ म्हणत विचारणा केली. अचानक मंत्रीच समोर आल्याने बाया भांबावल्या पण त्यांनी हातातून विजेची बिले काढून दाखवत म्हटले की, सरकारने घरकूल दिली पण त्यांच्या विजेच्या बिलाची रक्कम कशी भरायची.? आता लाइटी कापून टाकल्यात तर म्हातारपणात कसं जगायचं? दादांनी त्याचक्षणी सोबतच्या अधिकाऱ्यांकडे या प्रश्नात लक्ष घाला म्हणून आदेश दिले, दुसऱ्या स्विय सहायकाला त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊतांना फोन लावायला सांगितले. उदवाहनासमोर थांबून त्यांनी राऊत यांना हे प्रकरण पाठवतो ताबडतोब पहा म्हणून सांगितले. आणि दादांचा काफिला निघून गेला. त्यांच्या स्टाफच्या लोकांनी मग बायकांना ऊर्जामंत्र्याच्या दालनाकडे नेले. त्यांच्या लाइटचे केवळ तीन हजाराचे बील भरायचे राहून गेले जे त्यांच्या वापराच्या तुलनेत जास्त होते. उर्जामंत्रालयातून संबंधित संभाजीनगरच्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन गेले. सायंकाळी सहा पर्यंत संबंधित महिला मंत्रालयात असतानाच त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू झाले होते.
पण बाया तिथच बसून होत्या सायंकाळी सातच्या सुमारास दादांचा काफिला मंत्रालयात आला तर त्या बाया पुन्हा समोर आल्या. मग दादांचा संयम सुटला ते जवळपास चिडलेच. काय झालं? अजून काम झालं नाही का? त्यांनी विचारणा केली. एक म्हातारी पुढे येत त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणाली ‘तुला आशिर्वाद दिल्या बिगर घराकड कस जायाचा? म्हणून वाट बघत राहिलो.’ दादा असा जनसामान्यांचा कैवारी नेता होता.

त्यांना ‘पटेल’ त्यावेळी ते स्वत: लाथ मारून बाहेर काढतील!
महाविकास आघाडीमुळे ज्यांचा मनोभंग आणि सत्तेचा स्वप्नभंग झाला त्यांच्याकडून मग अजित पवार यांच्या या रांगड्या राजकारणाचा वेध घेण्यासाठी त्यांना काकांपासून दूर करून मुख्यमंत्री करण्याच्या ‘अमिशाचा खेळ’ सुरू झाला असे जाणकार सागंतात. त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या आजुबाजूच्या काही नेत्यांचा त्यासाठी नेहमी आधार घेतल्याचे सांगण्यात येते. कारण दादांना हे सांगायचे कसे? याचा मोठा पेच असल्याचे हे नेते सांगत! मात्र दादांना त्यांच्या निकटवर्तुळात असलेल्यांनी काहीही सांगितले तरी ते ‘मुंडे’ हलवतात असा अनुभव काही नेत्यांना आला होता. त्यानंतर जून २०२२मध्ये शिंदेचा सुरत व्हाया गुवाहाटी खेळ झाला आणि ते मुख्यमंत्री झाले. हीच संधी आपल्यालाही होती ती आपण गमावली असे मग दादांनी काही वेळा विरोधीपक्षात असताना सांगितले. पण नंतर त्यांनाही ते ‘पटेल’ असे प्रयत्न करण्यात आले म्हणे? मग जुलै २०२३मध्ये भाजपसोबत जात एकनाथ शिंदेप्रमाणेच पक्ष आणि चिन्ह देखील पळवायचे हे दादांच्या गळी फारसे उतरले नाही, त्यावेळी त्यांनी नाईलाजानेच हे सारे मान्य केले तरी त्यांच्या शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना वेगळ्याच राहिल्या. त्यातून मग काकांचा फोटोही वापरण्याचा आणि त्यांना दैवत म्हणायचा प्रयत्न त्यांनी केला.
मात्र त्यांना त्यांच्या कच्छपी लागलेल्या काही नेत्यांबद्दल त्यांना सावध करणारे कुणी काही सांगितले तर कधीच विश्वास बसणे शक्य नव्हते. त्यांच्यासोबतचे काही लोक चुकीच्या दिशेने घेवून जातात हे त्यांना ‘पटेल’ त्यावेळी दादा असे आहेत की ते स्वत: लाथ मारून त्यांना बाहेर काढतील किंवा स्वत: तेथून बाहेर पडतील असे त्यांच्या निकटच्या एका नेत्याने त्यावेळी खाजगीत सांगितले होते. कदाचित त्या प्रक्रियेची सुरुवात महापालिका निवडणूकांच्या पराभवाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा करण्यापर्यंत जात अजित दादांकडून झाली होती. हीच गोष्ट तर नियतीला मान्य नसावी की तिने त्यांना कायमचे दूर नेले!? अशी चर्चा लगोलग सगळीकडे सुरू झाली आहे.

त्यांच्या अकाली निधनानंतर आता त्यांच्या पक्षाच्या समर्थक चाळीस(४०) आमदारांचे मंत्र्याचे नेतृत्व कुणाकडे जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच दादा गेल्यानंतर आता आगामी अर्थसंकल्प कोण मांडणार? या प्रश्नापासून त्यांच्या पक्षाच्या विधिमंडळातील गटाचे नेते कोण होणार? या प्रश्नापर्यंत अनेक प्रश्नाची भली मोठी गर्दी तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री बदलण्याची भाकीते करणाऱ्यांच्या बातम्या कदाचित खऱ्या होतीलही मात्र तरी आता आणखी किती अक्राळविक्राळ रूप या बातम्या घेणार आहेत? देवालाच माहिती! पण हा सत्तेचा पिसाटलेला खेळ अश्या किती कर्तबगार नेत्यांचा बळी घेणार आहे ते मात्र सध्या कुणालाच माहिती नाही दैव जाणिले कुणी?
(लेखक व राजकीय विश्लेषक)

