ठाण्यात पुन्हा ‘छमछम’; तलावपालीतील आम्रपाली बारवर छापा, २३ महिला वेटरसह ३२ जणांविरोधात गुन्हा

Aamrapali-Bar-and-Restaurant : ठाण्यात पुन्हा ‘छमछम’; तलावपालीतील आम्रपाली बारवर छापा, २३ महिला वेटरसह ३२ जणांविरोधात गुन्हा

ठाणे : तलावपाली परिसरातील आम्रपाली बार अँड रेस्टॉरंटमध्ये कथित अश्लील आणि विभत्स वर्तन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा (Naupada) पोलिसांनी छापा टाकून २३ महिला वेटर, बार व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहकांसह एकूण ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे आम्रपाली बार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री उशिरा बारमध्ये महिला वेटर तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांसमोर विभत्स वर्तन करत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना(Naupada-Police) मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्री सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास बारच्या दोन्ही प्रवेशद्वारांतून एकाच वेळी छापा टाकला. (Aamrapali-Bar-and-Restaurant)

छाप्यावेळी बारमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू होते. तसेच महिला वेटर ग्राहकांजवळ जाऊन कथितरित्या अश्लील हावभाव आणि विभत्स वर्तन करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हा प्रकार थांबवून संबंधितांची चौकशी केली.

या कारवाईत २३ महिला वेटरना ताब्यात घेण्यात आले. तसेच दोन व्यवस्थापक आणि नऊ कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. बारमध्ये उपस्थित असलेल्या पाच ग्राहकांविरोधातही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून ७०० रुपयांची रोकड जप्त केली असून या प्रकरणी एकूण ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २०२१ मध्येही याच आम्रपाली बार अँड रेस्टॉरंटमध्ये करोना निर्बंधांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्रा सुरू असल्याचे उघड झाले होते. त्या घटनेचे चित्रीकरण समोर आल्यानंतर राज्य शासनाने ठाणे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या बारमधील कारवाईमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

नौपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Social Media