मुंबईत पाणीटंचाईचे सावट; बीएमसीकडून पाणीपुरवठ्यावर निर्बंध, १० टक्के कपात लागू

Water-shortage : मुंबईत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) खबरदारीचा उपाय म्हणून पाणीवापरावर विविध निर्बंध लागू केले आहेत. तसेच, शहरातील पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मुंबईतील कोट्यवधी नागरिकांचा दैनंदिन पाणीपुरवठा बीएमसीच्या जलस्रोतांवर अवलंबून आहे. मात्र, पावसाळ्याला उशीर झाल्याने आणि तलावांतील पाणीसाठा घटल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे.

बीएमसीच्या नव्या आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही नव्या बांधकाम प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जाणार नाही. तसेच, स्विमिंग पूल भरण्यासाठी पाणी देण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्पोर्ट्स क्लब, (Sports-Club)व्यावसायिक आस्थापना आणि इतर बिगर-घरगुती (Non-domestic) वापरासाठीच्या पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात येणार आहे. (Water-shortage)

कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज्ड पिण्याचे पाणी तयार करणाऱ्या उद्योगांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या गरजेपुरतेच पाणी उपलब्ध करून दिले जाईल. सार्वजनिक शौचालये चालवणाऱ्या संस्थांनी पिण्याच्या पाण्याऐवजी टँकर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, वाहन धुणे, बागांना पाणी देणे आणि रस्ते स्वच्छ करणे यासाठी केवळ विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी अशा कामांसाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पिण्याचे पाणी वाया घालवणे किंवा नियमांचे पालन न करणे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढला नाही, तर मुंबईतील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Social Media