गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण!

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व  : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाची मंगलमय नांदी; वैदिक मंत्रांचा घोष, शंखनादाचा निनाद अन् गोदावरीच्या साक्षीने अवतरले श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे वैभव!

नाशिक (जिमाका वृत्तसेवा) : गोदावरीचा पावन तीर… वैदिक मंत्रांचा मंगलघोष… शंखनादाने दुमदुमलेला आसमंत… भगव्या धर्मध्वजेच्या

स्वागतासाठी एकवटलेला संतसमुदाय अन् श्रद्धेच्या अपार भावनेने भारावलेले वातावरण! जणू हजारो वर्षांच्या भारतीय आध्यात्मिक

परंपरेने आज नाशिक येथील रामतीर्थावर पुन्हा एकदा सजीव रूप धारण केले. गोदामाईच्या साक्षीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते

भगवी धर्मध्वजा आकाशात फडकली आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रारंभाचा ऐतिहासिक शंखनाद झाला.

वैदिक ऋचांच्या पवित्र स्वरांत, साधू-संतांच्या सान्निध्यात आणि गोदावरीच्या अखंड प्रवाहाच्या साक्षीने साकारलेल्या या अलौकिक क्षणाने

अवघी नाशिकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणाऱ्या श्रद्धेच्या महापर्वाची चाहूल देणारा हा सोहळा नाशिकच्या

धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदावरीच्या लाटालाटांत जणू मंगलस्वर उमटत होते… मंदिरांच्या पावन परिसरात भक्तीचा सुगंध दरवळत होता… अन् रामतीर्थावर

उपस्थित प्रत्येकाच्या अंतःकरणात सिंहस्थाच्या स्वागताची अनामिक ओढ दाटून आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेले

धर्मध्वजारोहण हे केवळ एका धार्मिक विधीचे आयोजन नव्हते; तो भारतीय संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचा, संतपरंपरेच्या चिरंतन वारशाचा

आणि कोट्यवधी भाविकांच्या अढळ श्रद्धेचा मंगलमय आविष्कार होता. धर्मध्वजा आकाशात डौलाने फडकताच शंखनादाचा निनाद

दशदिशांत घुमला. त्या क्षणी जणू गोदातीरावरील प्राचीन श्रद्धेला नव्या युगातील सिंहस्थाच्या स्वागताचे पवित्र अधिष्ठान लाभले.

या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण

राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता

मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,

अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर हिमगौरी आडके-आहेर,

खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे खासदार डाॅ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व : राष्ट्रपतींनी केले जीवनदायिनी गोदावरीचे विधिवत पूजन

भारतीय धार्मिक परंपरेचे पावित्र्य आणि वैदिक संस्कृतीचे मांगल्य जपत या सोहळ्यातील प्रत्येक विधी अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथम यज्ञकुंडात आहुती अर्पण केली. यज्ञकुंडातील पवित्र अग्निज्वाला आणि वैदिक मंत्रोच्चारांनी वातावरणात

मंगलमय चेतना निर्माण झाली. त्यानंतर राष्ट्रपतींनी जीवनदायिनी गोदावरीचे विधिवत पूजन करून धर्मध्वजेला वंदन केले. पुरोहितांच्या

मंत्रघोषात त्यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाचा परममंगल क्षण साकारला. धर्मध्वजा आकाशात फडकताच शंखनादाने रामतीर्थाचा आसमंत

दुमदुमला. मंगलवाद्यांच्या निनादात मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. यज्ञाहुती, गोदापूजन, ध्वजपूजन आणि धर्मध्वजारोहणाच्या पवित्र

विधींनी सिंहस्थाच्या आगमनाला धार्मिक परंपरेचे अधिष्ठान लाभले. गोदावरीच्या तीरावर फडकलेली धर्मध्वजा जणू देश-विदेशातील

भाविकांना या श्रद्धामहोत्सवाचे मंगलमय निमंत्रण देत होती.

या पवित्र सोहळ्याला विविध आखाड्यांचे महंत, धर्माचार्य आणि साधू-संतांच्या उपस्थितीने विलक्षण आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, श्रीमहंत ज्ञानदास महाराज, मंगलपीठाधीश्वर श्री १००८ माधवाचार्य महाराज,

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज, श्री पंच निर्मोही अग्नी आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्रदास महाराज,

महंत संजयदास महाराज, श्रीमहंत मुरलीदास महाराज, श्रीमहंत वैष्णवदास महाराज, पंच दिगंबर अग्नी आखाड्याचे श्रीमहंत माधवदास

महाराज, श्रीमहंत मोहनदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज आणि महंत रामस्नेही महाराज यांच्यासह साधू-संत व भाविक या

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. विविध आखाड्यांच्या संतपरंपरेचा संगम घडविणाऱ्या या उपस्थितीने रामतीर्थावर भक्ती, ज्ञान, तपश्चर्या

आणि अध्यात्माचे अनोखे विश्व साकारले. धार्मिक विधींचे पौरोहित्य पुरोहित संघाचे सतीश शुक्ल आणि अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी केले.

पूर्वजांनी जपलेली सिंहस्थाची परंपरा

सिंहस्थ कुंभपर्व म्हणजे केवळ बारा वर्षांनी भरणारा धार्मिक मेळा नव्हे; तो भारतीय संस्कृतीच्या आत्म्याला स्पर्श करणारा श्रद्धेचा

महासंगम आहे. येथे भाषा वेगवेगळ्या असतात, प्रांत वेगवेगळे असतात, संप्रदाय आणि उपासनेच्या परंपराही भिन्न असतात; मात्र सर्वांना

जोडणारा भक्तिभाव एकच असतो. काळाच्या प्रवाहात अनेक पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, आधुनिकतेची नवी क्षितिजे खुली झाली;

मात्र गोदावरीच्या तीरावर उमटणाऱ्या भक्तीच्या पाऊलखुणा कधी पुसल्या गेल्या नाहीत. पूर्वजांनी जपलेली सिंहस्थाची परंपरा आजही

तितक्याच श्रद्धेने पुढील पिढ्यांकडे प्रवाहित होत आहे. त्या परंपरेचा धागा अधिक दृढ करणारा आजचा धर्मध्वजारोहण सोहळा ठरला.

गोदामाईच्या साक्षीने फडकलेली धर्मध्वजा ही केवळ धार्मिक अस्मितेची खूण नसून, हजारो वर्षांच्या सांस्कृतिक स्मृतींना वर्तमानाशी

जोडणारे पवित्र प्रतीक ठरली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या या धर्मध्वजारोहणाने आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीलाही मंगलमय

प्रारंभाचे विशेष अधिष्ठान लाभले आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज होत आहे.

लाखो-कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेला साजेशी व्यवस्था उभारण्यासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि

आवश्यक नागरी सुविधांच्या दृष्टीने विविध यंत्रणांकडून नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. प्राचीन धार्मिक परंपरेचे पावित्र्य अबाधित राखत

आधुनिक व्यवस्थापनाची सांगड घालण्याचा प्रयत्न या महापर्वाच्या निमित्ताने होत आहे. गोदावरीच्या दर्शनासाठी, पवित्र स्नानासाठी आणि

संतसंगतीच्या अनुभूतीसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि संस्मरणीय व्हावा, या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहेत.

या सोहळ्यास आमदार सुहास कांदे, गोकुळ गिते, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, दिलीप बनकर विभागीय

आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त

मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक

बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे

आणि प्रमोद पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

भविष्यकाळातील सिंहस्थाचे भव्य स्वप्न

रामतीर्थावर साकारलेल्या या सोहळ्याने भूतकाळाचा समृद्ध वारसा, वर्तमानातील श्रद्धा आणि भविष्यकाळातील सिंहस्थाचे भव्य स्वप्न यांना

एका मंगलसूत्रात गुंफले. एका बाजूला संतांच्या तपश्चर्येने पावन झालेली गोदातीराची भूमी, दुसऱ्या बाजूला आगामी महापर्वासाठी आकार

घेत असलेली आधुनिक व्यवस्था आणि या दोहोंना जोडणारा कोट्यवधी भाविकांच्या मनातील भक्तीचा अदृश्य धागा, असे अपूर्व चित्र

पंचवटीत साकारले. राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या धर्मध्वजारोहणाने नाशिकच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी

एक मानाचा तुरा खोवला.

गोदावरीचा पवित्र प्रवाह उद्याही असाच अखंड वाहत राहील. तिच्या तीरावर पुन्हा मंत्रघोष घुमतील, शंखनाद होतील, संतांची पावले

उमटतील आणि असंख्य भाविक श्रद्धेची ओंजळ घेऊन या पवित्र भूमीत दाखल होतील. मात्र आजचा हा मंगलक्षण आपल्या वेगळेपणाने

स्मरणात राहील. कारण गोदामाईच्या साक्षीने आज केवळ धर्मध्वजा फडकली नाही; तर बारा वर्षांपासून अंतःकरणात जपलेल्या सिंहस्थाच्या

प्रतीक्षेला भक्तीचे नवे चैतन्य लाभले, श्रद्धेच्या भावनांना मंगलमय पंख फुटले आणि अवघ्या आध्यात्मिक विश्वाला एका नव्या महापर्वाची

पवित्र चाहूल लागली!

गोदातीरावर आज फडकलेली धर्मध्वजा ही केवळ सिंहस्थाच्या आगमनाची नांदी नव्हे; ती भारतीय संस्कृतीच्या चिरंतन श्रद्धेची,

संतपरंपरेच्या अखंड तेजाची आणि कोट्यवधी भाविकांच्या भक्तिभावाची सुवर्णपताका ठरली!

असा आहे सिंहस्थ कुंभ धर्मध्वज

सिंहस्थ धर्मध्वजावर श्री गंगा-गोदावरी धर्मध्वज शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ देण्यात आला आहे. त्यावरील अमृतकुंभ अमरत्व, मुक्ती आणि

देवी शक्ती यांचे प्रतीक आहे. ओमकार सकारात्मकता, संपूर्ण विश्वाचे आणि सर्वव्यापकतेचे प्रतीक आहे. श्री हे अक्षर विजयाचे आणि

मांगल्याचे प्रतीक म्हणून देण्यात आले आहे. ध्वजावरील १२ रेशमी गोंडे सामाजिक एकतेचे आणि संघशक्तीचे तर १ घंटा व ३ घुंगरू

नादाचे आणि ब्रह्मनादाचे प्रतीक मानले आहे. ध्वजाच्या दुसऱ्या बाजूस गोदवारीचे वाहन असलेले मगर आणि सुर्य-चंद्राची शुभचिन्हे अंकित

करण्यात आली आहेत.

 

Published by – SanvadMedia

Social Media