’कपाळी चंद्रकोर, हाती कर्तुत्वाचा झेंडा; मुंबईच्या रस्त्यांवर लाडक्या बहिणींचा ऐतिहासिक जागर!’

Strength-in-her-step : ‘तिच्या पाऊलात शक्ती’: मुंबईत रंगला भरजरी पैठणी आणि नऊवारी साड्यांचा ‘वॉकथॉन’

मुंबई : विश्वातील सर्वात वेगवान असलेल्या मुंबई शहराने जागतिक महिला दिनानिमित्त (Women’s Day) भरजरी पैठणी नऊवारी शालू परिधान करून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मराठमोळ्या स्त्री शक्तीच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा केला. रविवारी महिला दिनानिमित्त आयोजित मुंबईकरांना मुंबईच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्यात स्त्रीशक्तीचा अनोखा जागर पाहायला मिळाला.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयोजित ‘साडी वॉकथॉन २०२६’ या उपक्रमाने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘तिच्या पाऊलात शक्ती’ या संकल्पनेवर आधारित या रॅलीमध्ये शेकडो महिलांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेचा अभिमान मिरवत सहभाग नोंदवला. नगरसेविका आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. प्रिती मनोज सातम यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा सोहळा लक्षवेधी आयोजित करण्यात आला.

पारंपरिक साज आणि स्त्रीशक्तीची ऊर्जा (Strength-in-her-step)

आज सकाळी ६.०० वाजल्यापासूनच आरे चेक नाका आणि वाघदेवी मंदिर परिसर महिलांच्या उत्साहाने ओसंडून वाहत होता. आधुनिक धावपळीच्या युगात आपली संस्कृती जपण्याचा संदेश देत, महिलांनी भरजरी पैठणी, नऊवारी शालू आणि नथ परिधान करून या वॉकथॉनमध्ये धाव घेतली. केवळ साडीच नाही, तर कपाळी चंद्रकोर आणि हाती घोषणांचे फलक घेऊन या महिलांनी स्त्रीशक्तीचा बुलंद आवाज घुमवला.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन

या कार्यक्रमाला भाजपा मुंबई अध्यक्ष मा. आमदार अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी सहभागी महिलांचे कौतुक करत महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या महिलांकरिता असलेल्या योजनांचा उल्लेख करत देशाच्या आर्थिक व्यवस्थेत महिलांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले. पुढील निवडणुकीत केंद्र सरकारने 33% महिलांसाठी आरक्षण दिल्याचाही उल्लेख केला.

कार्यक्रमाचे नियोजन महिला मोर्चा उत्तर पश्चिम जिल्हा मुंबईच्या वतीने करण्यात आले होते. या अप्रतिम सोहळ्यामध्ये नगरसेविका ममता यादव, नगरसेविका अंजली सामंत आणि भाजपचे जिल्हा पदाधिकारी तसेच महिला मोर्चाच्या विविध स्तरांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
नगरसेविका आणि महिला मोर्चा उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष सौ. प्रिती मनोज सातम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितपणे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करणारा ठरला.

सांस्कृतिक दर्शनासाठी स्थिरावली मुंबई

वॉकथॉन दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर महिलांनी ठेका धरला. आज सांस्कृतिक सोहळा पाहण्यासाठी अविरतपणे वेगवान असलेली मुंबई काही क्षणांसाठी स्थिरावली. सांस्कृतिक सोहळ्याचे दर्शन घेत मुंबईने महिलांचा उत्साह द्विगुणीत केला.

धावपळीत आरोग्य सांभाळण्याचा सल्ला
वेगवान मुंबई मधील धावपळीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणे किती गरजेचे आहे, याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या ‘साडी वॉकथॉन’मुळे मुंबईच्या रस्त्यांवर एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्साही सहभागासाठी महिलांचा गौरव देखील करण्यात आला.

Social Media