‘मारुती कांबळेचे काय झाले?” कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? या प्रश्नासारखाच रोहित पवारांचा प्रश्न?
केंद्रीय मंत्री त्यांचे विमान कंपनीशी असणारे व्यावसाईक लागेबांधे आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांचा यामधील संशयास्पद सहभाग या साऱ्या रहस्यमय बाबी आहेत. अजित पवार यांच्यासारखा बोल-भांड नेता कुणाला नकोसा का झाला? याचे उत्तर ‘मारुती कांबळेचे काय झाले?” या सामना चित्रपटातील मास्तरांच्या प्रश्नासारखा सत्ताधा-यांचा पिच्छा पुरवू शकतो हे मात्र खरे!

दबावतंत्राच्या राजकारणाच्या नव्या तऱ्हा
Rohit-Pawar’s-questions : ‘सामना’ या चार दशकांपूर्वी डॉ श्रीराम लागू (Dr. Shriram Lagu)आणि निळू फुले(Nilu Phule) यांच्या मध्यवर्ती भुमिका असलेल्या चित्रपटात मारुती कांबळे या सैनिकाच्या गुढमृत्यू (हत्या) प्रकरणाशी संबंधीत गाजलेले कथानक होते. वेडगळ दिसणारा ध्येय्यवेडा मास्तर सत्ताधाऱ्यांना या गुढमृत्यू प्रकरणावर सळो की पळो करुन सोडतो. राज्याच्या राजकारणातही सध्या अजित पवार(Ajit Pawar) यांच्या निधनाबाबत तशीच संशयाची स्थिती सुलझण्याऐवजी गुढ होताना दिसत आहे. रोहित पवार(Rohit Pawar) हे दादांचे पुतणे यासाठी घातपात कसा झाला? असा सवाल घेवून ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ म्हणत उभे आहेत. तर दादांच्या पक्षाचे सत्तेसाठी जवळचे झालेले नेते, त्यांची दोन्ही मुले, पत्नी, घरचे नातेवाईक किंवा सासरच्या भाजपमधील नेत्यांकडून मात्र यावर सवाल केले जात नाहीत सारेच अनाकलनीय आहे.
राज्याचे राजकारण त्यामुळेच सध्या नव्याने अनिश्चितीकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. २३फेब्रुवारी पासून महिनाभर राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन(Budget session) होत आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण आणि दिवंगत नेते अजीत पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव असे कामकाज आहे. याच अधिवेशना दरम्यान राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्च रोजी सादर केला जाणार आहे. तर विधान परिषदेच्या रिक्त जागा विधानसभा सदस्यांमधून भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विधान परिषदेत रिक्त जागा आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी बाजुच्या सदस्यांच्या संख्याबळाची परिक्षा होणार आहे. वास्तविक पाहता विरोधकांचे संख्याबळ सत्ताधारी महायुतीच्या तुलनेत नगण्य असले तरी दबावतंत्राच्या राजकारणाच्या नव्या तऱ्हा आता पहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किमान १७-१९ जणांना भाजपचे वेध?
अजित पवार(Ajit Pawar) यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये होणाऱ्या या पहिल्याच अधिवेशनात त्यांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांचेही हे पहिलेच अधिवेशन असल्याने राष्ट्रवादी पक्षांच्या आमदारांसाठी ते विशेष मह्त्वाचे आहे. भारतीय जनता पक्षाकडे बहुमतासाठी संख्याबळ नसल्याने आता पवार यांच्या पक्षातील आमदारांना भाजपकडे विलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांसह सध्या मंत्री असलेल्या दहा पैकी किमान सात आठ जणांचा कल भाजपसोबत जाण्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या सारख्या पदासाठी ‘आशाळभूत’ असलेल्या किमान सात ते आठ जणांचा समावेश यामध्ये आहे. तर राजकीय कार्यकर्तृत्व सुमार असलेल्या आणि भाजपच्या मेहरबानीनेच आमदार आणि राजकीय जीवनात असलेल्या राजकुमार बडोलेंसारख्या किमान सात ते आठ जणांचा ओढा देखील भाजपसोबत जाण्याचा आहे. अश्या प्रकारे ४१ पैकी किमान १७-१९ जणांना भाजपचे वेध लागले आहेत. पक्षांतर बंदी कायद्याच्या निकषानुसार ही संख्या कमी आहे. सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या निवाड्याची जराही नकारात्मक शक्यता असल्याचे दिसले तर सध्याचे पद वाचविण्यासाठी या विद्यमान आमदारांना कुणातरी पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. त्यात भाजप आणि मूळचा पक्ष असे दोनच पर्याय असू शकतात. त्यामुळेच या कुंपणावरील सदस्यांकडून राज्यसभा-विधानपरिषदेला मतदान भाजपच्या बाजूने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे २०२२ मध्ये जसे राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर शिवसेनेत सूरत-गुवाहाटी करत ‘ऑपरेशन कमळ’ झाले तसेच नवे काही होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवनेरीवर शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी निष्ठा बाळगण्याची घोषणा करण्यात आली त्याला असा राजकीय संदर्भ असल्याचे जाणकारांचे मत आहे.Rohit-Pawar’s-questions

पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी?
राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण उणे-पुरे संख्याबळ असल्याने आणि राज्यसभेला एक सदस्य निर्वाचीत करण्यासाठीच्या ३६ मतांचा कोटा शिवसेना ठाकरे आणि कॉंग्रेस पक्षाकडे असल्याने राष्ट्रवादीच्या पवारांसाठी ते त्याग करायला तयार होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. पण शरद पवार(Sharad Pawar) पुन्हा राज्यसभा निवडणूक लढणार का? आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असेल का? या मुद्यावर आघाडीमध्ये बरीच साशंकता आहे.
कारण अजित पवारांच्या मृत्यूनंतर केवळ काही तासांतच दोन्ही पक्ष एकत्र करण्याच्या चर्चा शरद पवारांच्या गटाकडून सुरू झाल्या होत्या, मात्र राज्यसभा निवडणूक जर आघाडीकडून केवळ एक उमेदवार निवडून देण्याइतकेच संख्याबळ असेल तर पवारांच्या बाबतीत काय निर्णय घ्य़ायचा यावर कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षांत संभ्रम आहे. त्यामुळे शरद पवार नेमके निवडणूक लढवणार किंवा नाही? आणि नसले तर त्यांच्या जागी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला संधी मिळेल यावर आता महाविकास आघाडीत चर्चा सुरू झाली आहे. सहा तारखेपर्यंत त्यात सहमती होताना राज्यात नव्याने राजकीय गणिते जन्माला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण मतांच्या कोट्यासाठी आवश्यक मतांशिवाय अतिरिक्त मते युती आणि आघाडीकडे शिल्लक राहणार आहेत, त्यामुळेच घोडेबाजाराला वाव राहण्याची शक्यता असून तोडजोडच्या फोडाफोडीच्या राजकारणाला पोषक स्थिती निर्माण होणार आहे. राज्यसभे पाठोपाठ संख्याबळाच्या आधारे विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडीचा नवा प्रश्न या आघाडीला सोडवणे क्रमप्राप्त आहे.

पुन्हा ऑपरेशन लोटसच्या दिशेने?
दुसरीकडे अजीत पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय पोरकेपणाला किंवा पोकळीला राजकीय स्वार्थ आणि संधीसाधू राजकीय लागेबांधे यांच्या सोयीच्या राजकारणाची किनार असल्याने दादांच्या मृत्य़च्या चौकशीचा मुद्दा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या चौकशीला राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून फारसे कुणी नेते आग्रही नसताना किंवा पवार कुटूंबियाकडूनही त्याबाबत फारशी वाच्यता केली जात नसताना रोहित पवार ज्या पद्धतीने इरेला पडून आणि सातत्याने मांडणी करताना ‘खतरो के खिलाडी’ असल्याचे स्वत:च सांगत आहेत. त्यामागेही चौकशीच्या पेक्षा राजकीय स्पेस घेण्याच्या राजकारणाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.अजीत पवार यांच्या विमानाला अपघात झाला असे वक्तव्य स्वत: शरद पवार यांच्याकडून त्याच दिवशी आले असताना आता रोहित पवार अगदी केंद्रीय नागरी विमान सेवा मंत्र्यापर्यंत आरोपांची राळ का उडवून देत आहेत? त्यावर थोरले पवार साहेब काहीच व्यक्त का होताना दिसत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. शिवाय अजित पवार यांच्या पत्नी, त्यांच्या पक्षाचे बडे नेते त्यांची मुले यावर गप्प का आहेत/ असाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वात महत्वाचे अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आमदार कार्यकर्ते यांच्या मनात या अपघातानंतर जो आघात झाला आहे, त्याला भाजपच्या विरोधात वाट मोकळी करुन दिली तरच राष्ट्रवादीचे भाजपच्या दिशेने विलीनीकरण थांबेल याची कल्पना शरद पवार यांच्यापक्षाला असावी. रूपाली ठोंबरे,अमोल मिटकरी अश्या नेत्यांकडून याविषयावर जे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याला राजकीय फोडणी देत गंभीरपणे राजकीय आशय देण्याचा प्रयत्न रोहित पवार करताना दिसत आहेत. कारण भाजपच्या दिशेने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि सदस्य आमदार झुकले तर शरद पवार गटाच्या राजकीय अस्तित्वासाठी देखील ते संकट ठरणार आहे. त्यात भरडले जाणार आहेत ते रोहित पवार कारण सगळेजण जरी भाजपकडे गेले तरी पवारांचा वारसदार म्हणून त्यांना आजोबांच्या आणि आत्याचा पक्ष सोडणे सध्याच्या परिस्थितीत शक्य होणार नाही. आणि भाजपही त्यांना सहजासहजी आपल्या पक्षात प्रवेश देण्यास तयार होणार नाही याची त्यांना कल्पना आहे.असे याबाबत राजकीय निरिक्षक सांगतात.

तर मागे राहतील रोहित पवार, अदित्य ठाकरे?
राज्यात २०२९ला शतप्रतिशत भाजपचे राज्य आणायचे असेल तर आता शेवटचा घाव घालत पवारांच्या पक्षासोबत ठाकरे आणि कॉंग्रेसच्या चार पाच आमदारांना गळाला लावले तर राज्यात विरोधकांची संख्या ‘नही के बराबर’ होणार आहे हे भाजपला माहिती आहे. त्यासाठी या निवडणूकीत संख्याबळाची चाचपणी करताना गळाला कायमचे काही लागते का? हे पाहिले जात आहे अशी सूत्रांची माहिती आहे. वेळप्रसंगी सरकारमध्ये लाभाची पदे देवून विरोधातील जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव अश्या सात आठ नेत्यांना सोबत घेतले तर मागे राहतील रोहित पवार, अदित्य ठाकरे आणि त्यांचे संपलेले राजकीय आव्हान अशी मांडणी सध्या संघ- भाजपच्या समर्थकांकडून केली जात आहे. मात्र अजीत पवारांचा घातपात झाला की नाही? या प्रश्नाचे उत्तर नेमकेपणाने देण्याचे टाळण्यासाठी या नरेटीवचा आधार घेतला जात आहे असे अन्य काही जाणकारांचे मत आहे. कारण रोहित पवारांचे प्रश्न केंद्र सरकारला हादरवणारे आहेत असे या एकूणच मांडणीचे स्वरुप आहे. केंद्रीय मंत्री त्यांचे विमान कंपनीशी असणारे व्यावसाईक लागेबांधे आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांचा यामधील संशयास्पद सहभाग या साऱ्या रहस्यमय बाबी आहेत. अजित पवार यांच्यासारखा बोल-भांड नेता कुणाला नकोसा का झाला? याचे उत्तर ‘मारुती कांबळेचे काय झाले?” या सामना चित्रपटातील मास्तरांच्या प्रश्नासारखा सत्ताधाऱ्यांचा पिच्छा पुरवू शकतो हे मात्र खरे!
राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरणाच्या प्रक्रियेला भाजपची मान्यता हा प्रकार त्याच धाटणीचा होता, मात्र आधीच भाजपसोबत गेलेल्या काही नेत्यांना आता पवार आणि त्यांच्या कुटूंबिय आणि निष्ठावंतांचा राजकीय जाच किंवा वरचष्मा नको असल्याने त्याला विरोध केला जात आहे. मात्र मोठ्या मनाच्या भाजपकडून कॉंग्रेसच्या काही नेत्याना येत्या काळात कच्छपी लावले जाण्याची शक्यता आहे. त्यात सांगली, लातूर, कोल्हापूर, नागपूरच्या दिग्गज नेत्याचा किंवा त्यांच्याशी संबंधितांचा समावेश असू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे.dr-shriram-lagu-nilu-phule
सध्याचे राजकारण अनिश्चितीचे राजकारण आहे, सत्तेवरील नेत्यांना विरोध करण्याची क्षमता आणि किंमत फार मोठी आहे. त्यासाठी अजून तीन वर्ष वाट पाहण्याची राजकीय तयारी विरोधातील नेत्यांमध्ये आहे का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय सिकंदरपाणाच्या राजकारणात सध्या राज्यात २०२९च्या भाजपच्या संपूर्ण बहुमताच्या राजकारणासाठी विरोधकांचे अस्तित्व संपविण्यास प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात या अधिवेशनातून होण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या प्रश्नांपेक्षा सध्या याच राजकारणाला आणि सत्ताकारणाला महत्व आले आहे. भांडवलदारांच्या आणि राजकीय सत्तेसाठीच्या महत्वाकांक्षा हाच सध्या जगण्याचा मूलमंत्र झाला आहे. राज्यात शेतकरी, महिला बेरोजगार, युवक विद्यार्थी आणि सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्यकर्त्यांना वेळ आणि स्वारस्य त्यामुळेच राहिले नाही. जनतेच्या मतदानाला देखील आता किंमत उरली नसल्याने लोकलज्जा किंवा धाक सत्ताधाऱ्यांना राहिला नाही. देशात आणि राज्यात बिकट काळ येण्याची ही सुरूवात आहे! विरोधीपक्षांनी मुख्यमंत्र्याच्या चहापानावर बहिष्कार घातला त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर होते, त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही ‘कोणता झेंडा घेवू हाती?’ असा प्रश्न पडल्याचे सांगण्यात येत आहे!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
