Pitru-Paksha : श्रद्धया क्रियते इति श्राद्धम|
श्रद्धा युक्त अंतकरणाने पितरांना समर्पण केलेले कर्म म्हणजे श्राद्ध.
भारतीय संस्कृतीत पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांमागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून सामाजिक शिस्त, पर्यावरणाची जपणूक व जीवनमूल्यांची जोपासना आढळते. पितृपंधरवाडा हा त्यापैकी एक महत्त्वाचा काळ आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होऊन अमावस्येपर्यंत चालणारे हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणासाठी राखीव असले तरी त्यांचा व्यापक अर्थ विज्ञान आणि समाजजीवनाशी घट्ट जोडलेला आहे.
नागरी कर्तव्य आणि पितृपंधरवाडा-(Pitru-Paksha)
पूर्वजांचे स्मरण करणे हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून नागरी कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे. पूर्वजांनी समाजरचना, संस्कृती व मूल्य व्यवस्था घडवली; आज आपण त्या वारशाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पितृपंधरवाड्यातील सामूहिक श्राद्ध किंवा तर्पण यामध्ये सामुदायिक शिस्त, जबाबदारीची भावना आणि सामाजिक समन्वयाचा धडा मिळतो.
कल्याणकारी कुटुंब पद्धती-
पितृपंधरवाड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन विधी करते. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना समान सहभागाची संधी मिळते. पूर्वजांच्या आठवणी कथांच्या रूपाने लहान पिढ्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे “आपण एक कुटुंब आहोत, आपल्या मुळाशी पूर्वजांची परंपरा आहे” ही भावना दृढ होते. हेच कल्याणकारी कुटुंब पद्धतीचे मूळ आहे — जिथे फक्त वर्तमानाची नव्हे तर पुढच्या पिढ्यांच्या कल्याणाची जबाबदारी मान्य केली जाते.
स्व-आधारित जीवन पद्धती-(Pitru-Paksha)
श्राद्धकर्मातील धान्य, तूप, तीळ यांसारखी सामग्री घरच्या घरी तयार केली जात असे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा स्व-आधारित जीवनशैलीचा आदर्श ठरते. बाह्यस्रोतांवर अवलंबून न राहता, स्थानिक शेती व साधनसंपत्तीचा वापर करून विधी पार पाडणे म्हणजेच “आत्मनिर्भरता”. आजच्या काळात हेच तत्व “स्वदेशी व स्वावलंबन” या संकल्पनांशी जोडले जाऊ शकते.
समरसता व सामाजिक समभाव-
पितृपंधरवाड्यातील दानधर्माला मोठे महत्त्व आहे. गरीब, ब्राह्मण, समाजातील दुर्बल घटकांना अन्न-वस्त्रदान करून सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न परंपरेत दिसतो. आधुनिक समाजशास्त्राच्या भाषेत हे समरसतेचे व समानतेचे मूल्य आहे. पूर्वजांच्या आशीर्वादाच्या निमित्ताने प्रत्यक्ष समाजातील दुर्बल घटकांना मदत केली जाते, त्यामुळे ही परंपरा सामाजिक न्यायाच्या दिशेने एक टप्पा ठरते. नुकतेच 12, 13 व 14 सप्टेंबरला नागपुरात ग्रामायण प्रतिष्ठाण द्वारा आयोजित “अभ्युदय सेवाकार्य प्रदशनी” त्याचे उत्तम उदाहरण ठरलं. आहे.
पर्यावरणाची जपणूक-
श्राद्धकर्मात वापरले जाणारे धान्य, तीळ, पाणी ही सर्व नैसर्गिक साधने आहेत. प्राचीन काळात नद्यांमध्ये तर्पण केल्यामुळे पाण्यात सेंद्रिय खत मिसळून परिसंस्थेला पोषण मिळत असे. तसेच साधेपणा, मितव्यय आणि निसर्गाशी सुसंवाद या परंपरेच्या मूळ कल्पना आहेत. आज मात्र प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा पर्यावरणपूरक पद्धतीने जपण्याची गरज आहे. त्यामुळे पितृपंधरवाडा हा “मानव-निसर्ग समन्वय” शिकवणारा काळ आहे.
पितृपंधरवाड्याचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावास्या किंवा महालय पर्व. या दिवशी ज्यांना पितरांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नाही त्यांनी श्राद्ध करावे अशी परंपरा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, हा दिवस म्हणजे “सार्वजनिक स्मरणदिन” आहे — ज्या दिवशी संपूर्ण समाज एकत्र येऊन आपल्या पूर्वजांना आठवतो. त्यामुळे महालय पर्व हे पितृस्मरणाबरोबरच सामूहिक कृतज्ञतेचे प्रतीक ठरते.
पितृपंधरवाडा(Pitru-Paksha) हा फक्त धार्मिक विधींचा काळ नाही; तर तो नागरी जबाबदारी, कुटुंबीयांचे ऐक्य, आत्मनिर्भरता, सामाजिक समता, पर्यावरणसंवर्धन आणि सामूहिक स्मरण या सर्व मूल्यांचा संगम आहे. महालय पर्वाद्वारे या परंपरेला पूर्णत्व मिळते. पूर्वजांना स्मरण करून आपण प्रत्यक्षात वर्तमानाची जबाबदारी स्वीकारतो आणि भविष्य पिढ्यांसाठी आरोग्यदायी, समतामूलक व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा वारसा देतो.
आपले पूर्वज, आपले पितर हे आपले मार्गदर्शक, सहाय्यक आणि उपकारकर्ते आहेत. त्या सर्वांना शत शत नमन आणि श्रद्धांजली.
श्रीकांत तिजारे
भंडारा. 7038839762