अंधारातून आत्मप्रकाशाकडे नेणारी शिवरात्र…(Om-Namah-Shivaya)
Om-Namah-Shivaya:ओम नम: शिवाय! हा मंत्र जेव्हा आपण धीर गंभीर स्वरात म्हणतो तेव्हा एक वेगळीच अनुभूती आपल्याला येत असते. शिव एक परम तत्त्व. शांत, नितळ, निर्लेप, आणि निर्विकार.
हे निराकार असल्याने अदृश्य आहे. तरीही सर्वव्यापी आहे. शिव शब्दाचा अर्थ मंगल, शुभ, कल्याण असा आहे. या भोळ्या , सांब सदाशिवाची उपासना त्यांच्याच विविध रुपात केली जाते.
“शिवोऽहं” हा भक्तीचा परमोच्च टप्पा आहे. भक्तीच्या प्रारंभी आपण म्हणतो, “तुजवीण शंभो मज कोण तारी” पण साधना परिपक्व झाली की म्हणतो, “शिवोऽहं”. म्हणजेच, आधी शरणागती
नंतर एकरूपता. हा प्रवास आहे, भक्ती, ज्ञान आणि अनुभूती असा.
महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक रात्र नाही; ती अंतर्मुख होण्याची, आत्मपरीक्षणाची आणि जीवनातील अज्ञानरूपी अंधारावर विवेकाचा दीप प्रज्वलित करण्याची रात्र आहे. वर्षातील सर्वांत पवित्र मानल्या जाणाऱ्या या रात्री शिवोपासना म्हणजे बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतःकरणातील परिवर्तनाचा संकल्प होय.
शिव म्हणजे केवळ देवता नव्हे—शिव म्हणजे तत्त्व. जो कल्याणकारी आहे, जो अज्ञानाचा नाश करतो आणि जो शांततेचा अधिष्ठाता आहे.
म्हणूनच शिव ‘संहारक’ नसून अविद्येचा संहार करणारा आहे. महाशिवरात्री ही त्याच तत्त्वाशी एकरूप होण्याची संधी आहे.
महाशिवरात्री ‘रात्र’ म्हणून ओळखली जाते, कारण ती आपल्याला सांगते,
जीवनात अंधार अपरिहार्य आहे; पण त्यातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शोधणे हीच साधना आहे.(Om-Namah-Shivaya)
जागरण म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवणे नव्हे, तर चित्त जागृत ठेवणे होय. मनातील विकार, अहंकार, लोभ, द्वेष यांच्यावर विजय मिळवण्याचा तो प्रतीकात्मक प्रयत्न आहे.
शिवोपासना म्हणजे अंतर्बाह्य शुद्धीचा मार्ग आहे. महाशिवरात्रीला होणारा शिवलिंगाभिषेक हा देहशुद्धीचा नव्हे, तर मनशुद्धीचा विधी आहे.
अंतःस्थ शिवतत्त्वच खरे
पाणी, दूध, बेलपत्र अर्पण करताना भक्त नकळत म्हणतात, “माझ्यातील अशुद्धता दूर होवो; माझा अहंकार गळून पडो.” याच भावनेचा परिपाक श्री शिस्तुती तील त्या आर्त हाकेत दिसतो, “तुजवीण शंभो मज कोण तारी”.ही ओळ भक्ताची असहाय्यता नव्हे, तर पूर्ण शरणागतीची घोषणा आहे.बाह्य आधार गळून पडल्यावर,
अंतःस्थ शिवतत्त्वच खरे तारक आहे, ही जाणीव या रात्री अधिक तीव्र होते. आजचा समाज वेगवान आहे, स्पर्धात्मक आहे; पण त्याचबरोबर अस्वस्थही आहे.
अशा काळात महाशिवरात्री उत्सव आपल्याला शिकवतो, वैराग्य म्हणजे पळ काढणे नव्हे, तर आसक्तीशिवाय जगणे, शांतता म्हणजे निष्क्रियता नव्हे,
तर संतुलित कृती, संयम म्हणजे दडपण नव्हे, तर स्वाधीनता. शिव जसा स्मशानवासी असूनही निर्विकार आहे, तसाच माणसानेही दुःख-सुखाच्या द्वंद्वात समत्व राखावे—हा संदेश महाशिवरात्री देते.
महाशिवरात्री म्हणजे एक दिवसाचा उत्सव नसून, जीवनदृष्टी बदलण्याचा क्षण आहे.(Om-Namah-Shivaya)
त्या रात्री केलेली उपासना, जागरण आणि ध्यान जर आपल्या दैनंदिन आचरणात उतरले, तरच शिवोपासना फलदायी ठरते. शिव बाहेर नाही—तो आपल्याच अंतरंगात आहे.
अहंकार वितळला, विवेक जागृत झाला, आणि करुणा विस्तारली की तिथेच शिव प्रकटतो.
महाशिवरात्री म्हणजे देवाला जागवण्याची रात्र नव्हे, तर स्वतःमधील शिव जागा करण्याची रात्र आहे.
विरक्त चिता भस्म अंगाला लावणारे भगवान शंकर प्रतीकात्मक स्वरुपात हेच सांगतात की, नश्वर आयुष्याचे ध्येय हे आत्मबोध होणे, शिवाशी एकरूप होणे हेच आहे.
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय | भस्माङ्गरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय |
तस्मै नकाराय नमः शिवाय ॥
नागभूषित, त्रिनेत्री, भस्मविभूषित, नित्य, शुद्ध, दिगंबर महेश्वरास विनय पूर्वक नमन असो.
श्रीकांत भास्कर तिजारे.
भंडारा. ९४२३३८३९६६