माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

My-Vasundhara : पर्यावरणविषयक मोहिमेची कृषि क्षेत्राशी सांगड घालावी
मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माझी वसुंधरा अभियानाला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त आहे. भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी जनसामान्यांच्या मदतीने हाती घेतलेले हे ईश्वरीय कार्य आहे, असे उद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले.

रासायनिक शेती, पर्यावरणीय बदल आरोग्यासाठी घातक असून या अभियानाची कृषि क्षेत्राशी सांगड घालण्याची गरज अधोरेखित करून नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करण्याचे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावेळी केले.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन (My-Vasundhara)

वरळी एनएससीआय डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,(Sunetra-Pawar) पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे,(Pankaja-Munde) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,(Rahul-Narvekar) मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माझी वसुंधरा मिशन 4.0 आणि 5.0 अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

  माझी वसुंधरा हे ईश्वरीय कार्य

पर्यावरणासाठी शासन स्तरावर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणात आणि प्रभावी पद्धतीने मोहिम राबविल्याबद्दल पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे राज्यपाल श्री. देवव्रत यांनी अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, पर्यावरण रक्षण हे संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढू लागले आहे. नैसर्गिक संकटं ओढावण्याची भिती जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहेत. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे जीवसृष्टीसाठी महत्वाचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य हे ईश्वरीय सेवा आहे असेही राज्यपाल यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षणासाठी राज्यपालांनी यावेळी पंचसूत्री मांडली. पर्यावरणाचे संवर्धन विकास धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवून, प्रत्येक विकास प्रकल्पात “ग्रीन ऑडिट” अनिवार्य करावे. स्थानिक पातळीवर हरित अर्थव्यवस्थेला चालना देऊन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी “ग्रीन बजेट” तयार करावे आणि कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नैसर्गिक शेतीला आर्थिक प्रोत्साहन द्यावे. पर्यावरण शिक्षणास प्रोत्साहन देवून, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जनसहभागाला चळवळीचे स्वरूप द्यावे आणि प्रत्येक नागरिक “क्लायमेट वॉरियर” बनावावा. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रणाची रिअल-टाइम पाहणी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित होईल. “माझी वसुंधरा” अभियान हे सर्वांनी ध्येय म्हणून स्वीकारल्यास नक्कीच अपेक्षित बदल घडेल, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

Social Media