मुंबई बँक मतदार यादीचे ऑडिट करा; धनंजय शिंदे यांची मागणी

मुंबई बँक मतदारयादी ऑडिट : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक मतदार यादीचे सर्वंकष ऑडिट करा: धनंजय शिंदे

मुंबई :  मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक मतदार यादीची

सर्वंकष, तांत्रिक आणि कायदेशीर छाननी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय

शिंदे यांनी केली आहे.

मुंबई बँक मतदारयादी ऑडिट : मतदाराची पात्रता तपासा; आदेशांशी संबंधित नोंदींची चौकशी करा

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय शिंदे पुढे म्हणाले की, आमची मागणी कोणत्याही एका व्यक्ती किंवा

संस्थेपुरती मर्यादित नसून सर्व वर्गांतील प्रत्येक मतदाराची पात्रता तपासण्याची आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव सादर

करण्याची प्रक्रिया सुरू असताना, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आम्ही दुबार ठराव सादर केल्याच्या मुद्द्यावर आक्षेप

नोंदविला होता. संबंधित ठरावांच्या मूळ प्रती, आवक नोंदी, सादरीकरणाची तारीख, संस्थेचे इतिवृत्त आणि अधिकृत प्रतिनिधीच्या

नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. ठरावांचे दुबार सादरीकरण झाले आहे का, त्याचा प्रतिनिधित्वाच्या

वैधतेवर किंवा मतदार पात्रतेवर काही परिणाम होतो का आणि लागू नियमांनुसार कोणती कार्यवाही आवश्यक आहे, हे स्पष्ट

करण्यात यावे. आमच्या आक्षेपावर योग्य चौकशी करून कारणांसह लेखी निर्णय देण्यात यावा.

मुंबई बँक मतदारयादी ऑडिट : सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदत्वाच्या नोंदीची पडताळणी.

एका सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित मतदार नोंदीबाबत आम्ही आक्षेप घेतला आहे. आमच्या आक्षेपानुसार, प्राथमिक मतदार

यादीत नाव समाविष्ट असलेल्या संबंधित व्यक्तीचे त्या संस्थेतील सभासदत्व अस्तित्वात असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

संबंधित संस्थेची मूळ सभासद नोंदवही, सभासदत्व मंजूर करणारा ठराव, प्रवेश अर्ज, सभासद क्रमांक आणि अन्य अधिकृत

अभिलेख तपासून संबंधित व्यक्तीचे सभासदत्व व मतदार म्हणून तिची पात्रता निश्चित करण्यात यावी.

प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेच्या नोंदीबाबत प्रवीण दरेकरांच्या प्रकरणाची चौकशी.

धनंजय शिंदे म्हणाले की, प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या संदर्भात प्रवीण यशवंत दरेकर यांच्या सभासदत्वाच्या

पात्रतेबाबत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहकार विभागाने दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार,

प्रवीण यशवंत दरेकर यांच्याकडे संबंधित मजूर सहकारी संस्थेचे सभासद म्हणून पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक पात्रता

नसल्याचा निर्णय देण्यात आला होता, असे असताना, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सध्याच्या प्राथमिक मतदार

यादीमध्ये त्यांचे नाव पुन्हा प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्था मर्यादित यांच्याशी संबंधित सभासद म्हणून कशाच्या आधारे समाविष्ट

करण्यात आले आहे, याची सखोल पडताळणी होणे आवश्यक आहे.

मुंबई बँकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर चौकटीत झाली पाहिजे. मतदार यादीतील प्रत्येक नोंद ही संबंधित

कायदे, नियम आणि अधिकृत कागदपत्रांच्या आधारे वैध ठरली पाहिजे. व्यक्ती कोणतीही असो, संस्था कोणतीही असो किंवा

मतदार कोणत्याही वर्गातील असो; सर्वांसाठी समान निकष लागू करा, प्रत्येक नोंदीची पडताळणी करा आणि कायद्यानुसारच

अंतिम मतदार यादी निश्चित करा, असेही धनंजय शिंदे म्हणाले.

 

Published by – SanvadMedia

Social Media