उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या “नोटीसमागे नेमकं कोण”…..?

Mr.-Sunil-Tatkare : अजितदादांच्या राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरून नवा राजकीय संघर्ष……!

मुंबई – स्व.अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नोटीसमुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार(Sunetra-Pawar) यांच्या निवडीवर आक्षेप घेत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या नोटीसला मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले.

प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरेंचा ठाम दावा…. (Mr.-Sunil-Tatkare)

“ही संपूर्ण प्रक्रिया पक्षघटना, कायदा आणि नियमांनुसारच झाली असून नोटीसमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असा ठाम दावा करत त्यांनी कोअर कमिटीत या प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही संकेत यावेळी बोलताना दिले.

झारखंड येथील मूळ निवासी असलेले व स्वतःला अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणवून घेणारे एक नेते सच्चिदानंद सिंह (Satchidananda Singh) यांनी काही दिवसांपूर्वी वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress)नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र आज तटकरे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नियमानुसारच झाली आणि त्यात विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra-Pawar)यांच्या अध्यक्षपदाची निवडही पूर्णपणे वैध आहे. त्यामुळे नोटीसमधील दाव्यांना कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे त्यांचे ठाम म्हणणे आहे.

” सुनेत्रा पवारांची निवड पूर्णतः वैध’; कोअर कमिटीत कारवाईचेही संकेत

या प्रकरणावर लवकरच कोअर कमिटीची बैठक होणार असून कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील भूमिका निश्चित केली जाईल. तसेच आवश्यक वाटल्यास संबंधितां विरोधात पक्षशिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी या घटनेवरून पक्षात असंतोष असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावत, “एखाद्या व्यक्तीचे पत्र म्हणजे पक्षाची भूमिका नाही.राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असून नेतृत्वामागे पक्ष ठामपणे उभा आहे,” असेही त्यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.

मात्र ते काहीही असले तरी,या नोटीसनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही राजकीय निरीक्षकांकडून सच्चिदानंद सिंह (Satchidananda Singh)यांचे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी निकटचे संबंध असल्याच्या चर्चाही केल्या जात आहेत.मात्र, या दाव्यांना कोणताही अधिकृत किंवा स्वतंत्र पुरावा उपलब्ध नाही आणि संबंधित नेत्यांनीही अशा कोणत्याही भूमिकेला सार्वजनिक दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे अशा चर्चांकडे सावधगिरीने पाहण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.

Social Media