Mothers-Day : आई
आईसारखी दुसरी सावली नाही…
आईसारखा दुसरा निवारा नाही…
आईसारखे दुसरे संरक्षण नाही…
आणि आईसारखे दुसरे अमृतही नाही…
Mothers-Day :आई म्हणजे अथांग प्रेम, अखंड त्याग. तिच्या कुशीत सुरक्षित आसरा, तिच्याशिवाय जीवन अपूर्ण. मायेची सावली तिचे हात, सुखाची कवली तिचे शब्द.
तिच्या डोळ्यांत जगण्याची प्रेरणा, तीच देवाची खरी ओळख.
या संपूर्ण सृष्टीत जे काही मंगल, पवित्र आणि कल्याणकारी आहे, त्यामागे मातृत्वाची अद्भुत भावना दडलेली आहे. जग आजही प्रेमाने, शांततेने आणि आपुलकीने जगत आहे, ते केवळ आईच्या ममतेमुळे. हिंसेच्या ज्वाला शांत करण्याचे सामर्थ्य जर कोणात असेल, तर ते एका आईच्या प्रेमळ हृदयातच आहे.
आईचे प्रेम हे मोजमापाच्या पलीकडचे असते. तिच्या उपकारांची परतफेड करणे अशक्य आहे. म्हणूनच आपल्या देशालाही आपण “मातृभूमी” म्हणतो.
जननी जन्मभूमिश्च
स्वर्गादपि गरीयसी ।
जननी आणि जन्मभूमी — या दोघांचे स्थान स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. कारण आई म्हणजे जीवनाचा उगम… अस्तित्वाचा आधार… आणि संस्कारांचा अखंड झरा.
भगवान श्रीराम असोत किंवा श्रीकृष्ण, परमेश्वरालाही या पृथ्वीवर येण्यासाठी आईच्या उदराचाच आधार घ्यावा लागला. इतके महान आहे मातृत्व! म्हणूनच प्रेम, वात्सल्य आणि करुणेच्या सर्वोच्च भावनेला “माऊली” हेच नाव दिले जाते.
आई म्हणजे चालते-बोलते देवत्व.
आई म्हणजे त्यागाचा महासागर.
आई म्हणजे सहनशीलतेचा सर्वोच्च कळस.
नऊ महिने आपल्या उदरात लेकराला जपताना ती प्रत्येक वेदना हसत सहन करते. प्रसूतीच्या असह्य कळांमध्येही तिचा जीव फक्त लेकराच्या श्वासासाठी तळमळत असतो. आणि ज्या क्षणी बाळाचा पहिला रडका स्वर तिच्या कानावर पडतो, त्या क्षणी ती स्वतःच्या सर्व वेदना विसरून आनंदाश्रूंनी न्हाऊन निघते. अशी निर्मितीची दिव्य शक्ती फक्त आईमध्येच असते.
पृथ्वीची उदारताही जिच्यासमोर लहान भासावी, असे विशाल अंतःकरण आईला लाभलेले असते. संकट कोणतेही असो, मनाला सर्वप्रथम आठवते ते आईचेच नाव. कारण जगाने जरी पाठ फिरवली, तरी आईचे दार आपल्या लेकरांसाठी सदैव उघडे असते.
आईच्या प्रेमात अपेक्षा नसते…
आईच्या मायेवर अट नसते…
आईच्या आशीर्वादाला सीमा नसते…
लेकरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी, त्यांच्या दुःखात स्वतःचे अश्रू वाहणारी, आणि कितीही चुका झाल्या तरी पुन्हा प्रेमाने कवेत घेणारी ती फक्त आईच असते.
या जगात सर्व काही विकत मिळू शकते, पण आईचे निर्व्याज प्रेम कधीच विकत घेता येत नाही. जन्मोजन्मी तिचे ऋण फेडणे अशक्यच आहे.
मातृत्वाचा इतिहास(Mothers-Day)
भारतातील मातृत्वाचा इतिहास तर अधिकच तेजस्वी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ(Raja Mata Jijau), रणरागिणी राणी लक्ष्मीबाई(Rani Lakshmibai), शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले, अनाथांची माय बनलेल्या सिंधुताई सपकाळ — अशा कितीतरी मातांनी आपल्या त्यागाने आणि संस्कारांनी भारतभूमी पावन केली आहे.
आई हेच जगाचे खरे दैवत आहे.
तिच्या संस्कारांवरच संस्कृती उभी आहे.
तिच्या मायेवरच संसार फुलतो आहे.
आणि तिच्या आशीर्वादावरच जीवनाचा प्रवास सुखकर होतो आहे.
आज मातृदिनाच्या निमित्ताने, या सृष्टीतील प्रत्येक मातेपुढे कृतज्ञतेने मस्तक झुकवूया. जिच्या प्रेमामुळे जीवनाला अर्थ मिळतो, जिच्या त्यागामुळे घराला घरपण येते आणि जिच्या ममतेमुळे देवही पृथ्वीवर यायला उत्सुक होतो — त्या समस्त मातांना साष्टांग दंडवत.
“आई” — हा शब्दच असा आहे,
जो उच्चारताच मनाला स्वर्गाचा स्पर्श होतो…