मंकी बात…

अबकी बार स्थानिक निवडणूकांचा बाजार सामान्य मतदार बेजार!

‘मोरूचा दसरा’ नावाचा धडा शाळेत असताना आपण सर्वांनीच अभ्यासला असेल, त्यात मोरूचा बाप त्याला दसऱ्याच्या निमित्ताने वास्तवाची जाणीव करून देताना दिसतो. पण सध्या मात्र दसरा नंतर आधी नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर  शहरी भागात अक्षरश: नंगानाच सुरु असल्याचे पहायला मिळाले आहे. राज्याच्या सुमारे तीस जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल असून राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची स्थिती असल्याचा त्यांचा आक्रोश आहे तर विरोधीपक्षांनी देखील याबाबत मागणी केली आहे याची जाणीव तरूणाईला नसल्याचे यातून दिसून आले.


केंद्राने ५० हजार कोटी रूपयांची मदत करणे अपेक्षीत

केंद्र सरकारकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेवून मोठ्या प्रमाणात मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे पहायला मिऴाले आहे. त्यापूर्वी पंजाबमध्ये देखील पूरस्थिती असल्याने केंद्राकडून अकराहजार कोटी रूपयांची मदत जाहीर झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामानाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने केंद्राने किमान ५० हजार कोटी रूपयांची मदत करणे अपेक्षीत आहे. पण एकीकडे ही स्थिती असताना दहा दिवस हैदोस घालण्याचा फुकट परवानाच तरूणवर्गाला मिळाला असल्यासारखे वातावरण सध्या शहरी भागात पहायला मिळाले आहे. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली सारेकाही असंस्कृत वर्तन केले जाते आणि युवा वर्गासमोर चुकीचे आदर्श ठेवले जात आहेत. त्यापूर्वी काहीच दिवस आधी क्रिकेट सामन्याच्या नावाखाली दुबईच्या हजारो कोटींचा क्रिकेट सट्टाबाजारी,ऑनलाईन गेमिंग अश्या तरूणवर्गाला नादी लावणाऱ्या गोष्टींचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळाले आहे.

धम्मचक्र-परिवर्तन-दिन

गांधी जयंती, दसरा संचलन आणि धम्मचक्र परिवर्तन दिन!

नवरात्रोत्सवानंतर यंदाचा दसरा देखील विशेष महत्वाचा होता, कारण दिवाळीनंतर केंव्हाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आता मतदार याद्यांच्या हरकती सूचनांसाठी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission)कार्यक्रम जाहीर केला असून सध्याच्या वोटचोरीच्या विरोधकांच्या आरोपांच्या पार्श्वभुमीवर त्याला अनन्यसाधारण महत्वाचे मानले जात आहे. निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर यंदा अनेक राजकीय पक्षांचे नेते दसरा निमित्ताने राजकीय सिमोल्लंघनासाठी बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. त्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेत दोन शिवसेनांचे मुंबईत मेळावे होते. तर पहिल्यांदाच मराठवाड्यात पूरस्थिती असताना पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या दसरामेळाव्या सोबतच नारायणगडावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटलांचा दसरा मेळावा होता. तस दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकरांचे संबोधन होते. त्यापूर्वी शंभरी पार करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS) १००वा दसरा संचलन आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रमही यंदाचे वैशिष्ट्य होते. त्यातही नियतीचा काव्यगत न्याय पहा कसा होता, राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांची जयंती, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन(Dhammachakra Pravartan Day) असा योगायोग नागपूरात होता.

Harsh-Vardhan-Sapkal

दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagwat) यांनी राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ(Harshvardhan Sakpal) म्हणाले की,   ज्यांचा सर्वात जास्त वेळ महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांना बदनाम करण्यात गेला त्यांना शंभराव्या वर्धापनदिनी गांधीजींनाच शरण जावे लागले हा संघाचा वैचारिक पराभव आहे, त्यांनी आता संविधान स्विकारावे व संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्यासाठी काम करावे. तसेच गांधी विचार स्विकारावा हे आमचे आवाहन आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत घेऊन संघाचे मुख्यालय रेशीम बागेकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली. आज अटक करण्यात आली असली तरी पुन्हा एनएसयुआयच्या हाती संविधान देऊन पाठवू आणि नाही घेतले तर ३० जानेवारीला गांधी पुण्यतिथीदिनी महिला पदाधिकारी जातील आणि तेव्हाही घेतले नाही तर १४ एप्रिलला पुन्हा त्यांना संविधान देण्याचा प्रयत्न करू. आरएसएस(RSS) विसर्जित करा ही मागणी घेऊन वर्षभर पदयात्रा काढू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बोलून दाखवला.

Amit-Shah

सत्ताधारी हतबल विरोधकांचा हल्लाबोल!

दसऱ्यानंतर दोनच दिवसांनी राज्यात पूरग्रस्त झालेल्या अहिल्यानगर मधील लोणी येथे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा(Amit Shah) यांचा दौरा होता. मात्र महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला असताना, रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री कार्यक्रमाला आले पण शेतकऱ्यांच्या  संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर हतबल झाले. राज्यातील संकटात असेलेल्या शेतकरी प्रश्नावर अमित शहा एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व करणारेही मूग गिळून गप्प बसले हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा घोर अपमान असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Congress-Rojagar-Melava

ते म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्याचे होते नव्हते, असे सर्व वाहून गेले आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप कवडीचीही मदत केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आले पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एक शब्दही काढला नाही. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून त्यांनी शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडले आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणे खते मोफत द्यावे व शेतकरी कर्जमाफी द्यावी या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण राज्याचे मुख्यंमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समोर तोंडही उघडले नाही, हा शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. शेतकरी मरत असतानाही भाजपा सरकार मदत करत नाही. हे अंत्यत दुर्दैवी आहे. तातडीने मदत जाहीर करावी याचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

Uddhav-Thackeray

ठाकरेंची सत्वपरिक्षा पून्हा होणार?

तर मुंबईतील दसरा मेळाव्यामध्ये उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचा शिवाजी पार्क(Shivaji Park) येथील मेळावा मैदानात पाऊस आणि चिखल असतानाही अभूतपूर्व गर्दीचा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मेळाव्यातूनही ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन करतानाच भाजप आणि महायुतीच्या सरकारवर टिका केली. उध्दव ठाकरे यांच्याकडून यावेळी मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्याचे पहायला मिळाले. त्यांनी मुंबईत महायुतीचा महापौर आला तर मुंबई अदानी समर्पयामी म्हणून आंदण दिली जाईल असा इशारा देतानाच मनसे सोबत एकत्र राहणार असल्याचे सूतोवाचही केले आहे. या मेळाव्याला लगेच च गोरेगाव येथे नेस्को मैदानात शिंदे सेनेच्या मेळाव्यातून उत्तर देण्यात आले. मात्र या मेळाव्यात रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या २०१२मध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणात काही वादग्रस्त विधाने करत उध्दव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक राजकीय आरोप केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले.त्यावर मग अनिल परब यांच्या प्रत्यारोपांमुळे कदम-परब यांचा पारंपरिक कलगितूरा रंगल्याचे पहायला मिऴाले आहे. परब यानी मग कदम यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणाचा उल्लेख करत राजकीय आगपाखड केली. त्याला देखील मग कदम यांनी न्यायालयात आव्हान देण्याची आणि बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीने कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकांच्या राजकारणाला ठाकरेंची सत्वपरिक्षा पून्हा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अस्मानी नंतर सुल्तानीचा फटका

थोडक्यात नवरात्रोत्सव आणि दसरा सरला, मोरूचा बाप मोरूला म्हणाला मोऱ्या राज्यात अतिवृष्टीने शेतकरी सामान्यापुढे जगण्याची चिंता लागली आहे. शहरी सामान्यांना, तरूणाईला गरबा दांडियाच्या जल्लोषात या वास्तवाची अजून जाणिवही नसल्याचे दिसत आहे. तर तिजोरी फारशी शिल्लक नसल्याने केंद्राच्या मदतीकडे राज्य सरकार डोळे लावून बसले आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री राज्यात आले तरी मदतीबाबत सहानुभूतीचा चकारशब्द बोलत नसल्याने राज्यातील जनता आता अस्मानी नंतर सुल्तानीचा फटका सहन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्धा डझन दसरा संमेलन मेळावे आणि संबोधनातून राजकीय वक्तव्यांचे अमाप पिक आले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचा धुरळा आता लवकरच गावोगाव उडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ओबीसी विरुध्द मराठा असा नवा ध्रुवीकरणाचा त्याला रंग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर निवडणूकांचा बार उडण्याची घोषणा होणार असलीतरी ‘अबकी बार निवडणूकांचा बाजार सामान्य मतदार बेजार’ अशीच स्थिती असल्याचे पहायला मिळणार आहे. नाही का?

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

Social Media