Marathi-Bhasha : मराठी भाषेचा जागर..

Marathi-Bhasha : २७ फेब्रुवारी, हा कवी कुसुमाग्रजांचा म्हणजेच श्री विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो.

‘अ’ या आद्य स्वरापासून सुरू होणाऱ्या आणि ‘ज्ञ’ या ज्ञानवृक्षापाशी विसावणाऱ्या आपल्या समृद्ध भाषिक वारशाचा कृतज्ञतापूर्वक जागर करण्याची ही वेळ आहे. मराठीला मिळालेला ‘अभिजात’ दर्जा हा तिच्या सहस्रावधी वर्षांच्या अस्तित्वाचा आणि संघर्षाचा गौरव आहे.

मराठीची वर्णमाला केवळ अक्षरांचा संच नाही, तर ते एक परिपूर्ण ध्वनीशास्त्र आहे. ‘अ’ हा आद्य स्वर असून तो प्रत्येक व्यंजनाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो.

‘अ’ पासून ‘औ’ पर्यंतचे स्वर आणि ‘क’ पासून ‘ज्ञ’ पर्यंतची व्यंजने ही मानवी उच्चारशास्त्राचा अजोड नमुना आहेत. प्रत्येक शब्दामागे एक इतिहास दडला आहे.

रायगड जिल्ह्यातील आक्षी येथील १०१२ चा शिलालेख असो किंवा श्रवणबेळगोळा येथील “श्रीचावुण्डराये करवियले” ही ओळ असो; मराठीने स्वतःचे अस्तित्व काळाच्या पटावर कोरले आहे.

ज्ञानेश्वरांनी जिला अमृतापेक्षाही पैज जिंकणारी म्हटले, ती मराठी आज खऱ्या अर्थाने जागतिक पटलावर ‘अभिजात’ ठरली आहे.

मराठी भाषेचा गौरव(Marathi-Bhasha)

मराठी भाषेचा गौरव करताना आधुनिक काळातील ज्या साहित्यकृतींनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले, त्यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या कलाकृतींनी जसा मराठीचा स्वाभिमान जागवला, तसेच त्यांचे समकालीन ‘आधुनिक वाल्मिकी’ ग.दि. माडगुळकर यांनी रचलेले ‘गीत रामायण’ हे मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग बनले आहे. कुसुमाग्रज, गदिमा आणि पु.ल. देशपांडे यांसारख्या दिग्गजांनी मराठी भाषेला जो साहित्याचा आणि संगीताचा साज चढवला, त्यामुळेच ‘अ ते ज्ञ’ हा प्रवास रसाळ आणि समृद्ध झाला आहे.

मराठीचे खरे सौंदर्य तिच्या प्रादेशिक वैविध्यात आहे. “दर बारा कोसावर भाषा बदलते” या उक्तीनुसार, खानदेशची रसाळ ‘अहिराणी’, कोकणच्या मातीतील नादमयी ‘मालवणी’, विदर्भातील रांगडी ‘वऱ्हाडी’ आणि पूर्व विदर्भातील वनसंस्कृतीची ‘झाडीबोली’ हे सर्व मराठीचेच विविध रंग आहेत. या बोलींनीच मराठीला जिवंतपणा दिला आहे. जर आपण या बोली जपल्या नाहीत, तर भाषेचा मूळ गाभाच हरवून जाईल.

भाषेचा विकास हे एक न संपणारे चक्र आहे. ‘ज्ञ’ म्हणजे ‘ज्ञान’ आणि ‘परिपक्वता’. पण एकदा आपण ज्ञानाचे शिखर गाठले की तिथून पुन्हा नव्या ‘अ’ कडे वळणे म्हणजे भाषेचे ‘आधुनिकीकरण’ करणे होय. हा नवा ‘अ’ म्हणजे डिजिटल युगातील मराठी, कृत्रिम बुद्धिमत्तेतील (AI) मराठी आणि नव्या पिढीच्या ओठांवरील आत्मविश्वासाची मराठी होय.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे केवळ गायनापुरते मर्यादित न ठेवता, ते आपल्या कृतीत उतरायला हवे. मराठी ही केवळ भावनांचीच नव्हे, तर ती ज्ञानाची आणि रोजगाराची भाषा व्हायला हवी. जोपर्यंत आपण घरात मराठी बोलतो, मराठी पुस्तके वाचतो आणि आपल्या भाषेचा न्यूनगंड न बाळगता अभिमान बाळगतो, तोपर्यंत ‘ज्ञ’ कडून पुन्हा एका नव्या ‘अ’ कडे जाणारा हा प्रवास असाच तेजोमय राहील.

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी भाषिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

 

श्रीकांत भा. तिजारे 

९४२३३८३९६६

Social Media