3-days-residential-camp : काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी उद्यापासून चिपळूणमध्ये ३ दिवसीय निवासी शिबिर.
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आहे. (3-days-residential-camp)
चिपळूणमधील या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harshvardhan sapakal) यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकास कामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतील उमेदवारांसाठीही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील (Adv. Ganesh Patil) यांनी दिली आहे.