महाराष्ट्र राजकारण : महाराष्ट्राच्या राजकारणाचा २०१९च्या दिवाळी नंतर जो काही बट्याबोळ करण्यात आला त्याच्या दुर्दैवाचे दशावतार
काही संपता संपत नसल्याचे पहायला मिळत आहे. सामाजिक-राजकीय नितीमत्ता या काळात इतक्या वेगाने घसरली की पैसा आणि सत्तेच्या
राक्षसी भुकेसाठी विधिनिषेधशून्य राजकारणाचा कळस गाठण्यात आला आहे.असे असले तरी यासा-या घडामोडींवर सामन्य जनता माध्यमे
यांच्याकडून प्रत्य़यकारी भाष्य होवू शकले नाही,आणि जनमानसात कमालीची मरगळ आल्यासारखे मळभ दाटून आले. लोक म्हणजे या देशाचे
संविधानाचे कर्ते केवळ मूकदर्शक आहेत की काय? अशी स्थिती निर्माण झाली. मात्र काही प्रमाणात नव्या पिढीच्या जेन जी(Gen-Z) तरुणाईने त्या
विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र राजकारण : लोकशाही व्यवस्था ओलीस ठेवून राजकारण
महाराष्ट्रात २०१९मध्ये शिवसेना-भाजप युतीला मतदारांनी कौल दिला असला तरी सत्तावाटपाच्या भांडणातून उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray)
यांनी भाजपला बाजुला ठेवून महाविकास आघाडीचा प्रयोग केला. दुर्दैवाने त्याच काळात देशात आणि जगभरात कोविड सारख्या महाभयानक
संकटाने घेरले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देखील मज्जासंस्थेच्या आजाराने ग्रस्त होवून रुग्णालयात होते. त्याचवेळी भाजपच्या
वरिष्ठ नेत्यांनी संधी साधून ठाकरेंच्या सेनेतून एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह चाळीस आमदार टप्याटप्याने फोडून पंधरा दिवसांत
ठाकरे यांचे सरकार असंविधानिक पध्दतीने हटवून शिंदे यांच्याकडे सत्तेच्या चाव्या देत सत्ता काबीज केली.
या राजकीय घडामोडीत जाणिवपूर्वक पक्षांतरबंदी कायदा, घटना, राज्यपालांच्या संविधानिक अधिकारातील बाबी अक्षरश: पायदळी तुडविण्यात
आल्याचे पहायला मिळाले आहे. त्यावर मागील चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात काथ्याकुट केला जात असून लोकशाही व्यवस्थांना ओलीस
ठेवून बेमुर्वतपणे जनतेचा कोणताही धाक नसल्याने राज्याची लूट केली जात आहे.

महाराष्ट्र राजकारण : आता पुन्हा नवा व्टिस्ट
या सा-या राजकारणात आता पुन्हा नवा व्टिस्ट आल्याचे सांगण्यात येत आहे. केद्रातील नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारला सात खासदारांचा
पाठिंबा देवून आपले पाय राजकारणात घट्ट रोवून पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर काबीज होण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या
शिवसेनेला राज्याच्या राजकारणातून बाजुला करत पुन्हा ठाकरेंच्या पक्षासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)
यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे त्यावेळी जसे ठाकरेकडून चाळिस आमदार फोडण्यात आले तसेच आता शिंदे यांच्या गटाकडून
३०-३५ जणांचा गट भाजपात सामिल झाला तर किंवा पुन्हा ठाकरे यांच्या पक्षात विलीन झाला तर शिंदे यांच्या राजकारणाला शह देण्याचा भाजपचा
प्रयत्न असून त्यासाठी ठाकरेबंधूच्या समोर प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात त्यामुळे सध्या खळबळ आणि
संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
याचे कारण विधानपरिषदेच्या निवडणूकीत महायुतीचा धर्म बाजुला ठेवत शिंदे यांच्या गटाकडून भाजपच्या उमेदवारांना उघडपणे विरोध करणारे
राजकारण करण्यात आले. तसा थेट आरोप आता भाजपने केला आहे. त्यात पुणे पदवीधर नागपूर आणि संभाजीनगर येथे भाजपला पराभवाची
चव चाखावी लागली आहे. नागपूर हे तर संघ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे होमपिच असताना तेथे काँग्रेसच्या उमेदवाराला यश मिळाले आहे.
त्यामुळे शिंदे यांच्या असहकाराच्या राजकारणाला आता रामराम करण्याचे संकेत भाजपकडून दिले जात आहे.

२०२९पूर्वीच शिंदेच्या राजकीय घरोब्याचा काडिमोड?
या साऱ्या नाराजी नाट्याचा भांडाफोड झाला ते भाजपच्या आयटी वॉर रुमच्या एका झुम मिटिंगमधील संभाषणाची क्लिप मराठा आंदोलनाचे नेते
मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांच्याकडून जारी करण्यात आली. या संवादात जरांगे यांना शिंदे यांचे सुपूत्र खा. श्रीकांत यांच्याकडून
पाचशे कोटी रुपये देवून भाजपसमोर तिसरी आघाडी म्हणून उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेना यांच्या मध्ये राजकीय अंतर असल्याचे अधोरेखीत करण्यात आले.
मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील यात असल्याचा ठपका शिंदे यांच्या पक्षावर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे जरांगे यांच्याकडून
सांगण्यात आले. एकूणच या सा-या राजकीय घडामोडीमागे भाजपला आता २०२९च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे यांच्या राजकीय
घरोब्याचा काडिमोड घेण्याचा पध्दतशीर प्रयत्न केला जात असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

शिंदेना घरच्या राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न?
महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे यांच्या राजकीय आव्हानाला संपविण्यासाठी आतूर असलेल्या भाजपच्या नेत्यांना ठाणे या शिंदेच्या होमपिचवर
पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे नवा मुद्दा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या होमपिचवर या प्रकरणामुळे त्यांच्या स्थानिक राजकीय सत्तेमध्ये
मतभेद असल्याचे दिसून येवू लागले आहे. शिंदे यांच्या गटाच्या ठाण्यातील महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे(Minakshi Shinde) यांच्यासह त्यांच्या पतीचा पूर्णेकर या ठाकरे गटाच्या नेत्याच्या हत्येमध्ये थेट हात असल्याचे पुरावे त्यांच्या कुटूंबियाकडून देण्यात आले
आहेत. मात्र शिंदे यांच्या राजकीय वरदहस्तामुळे मिनाक्षी शिंदे यांच्यासह त्यांच्या पतीवर पोलीस कारवाई करत नसल्याच्या जनभावनेतून राजकीय
सामाजिक वादळ निर्माण झाले आहे. त्यात शिंदे यांना त्यांच्या घरच्या राजकारणात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात
आहे. स्थानिक भाजप नेत्यांकडूनही यावेळी महायुती वगैरे असताना ठाकरे यांच्या दिवंगत नेत्याच्या कुटूंबियाना न्याय देण्याची भुमिका देत बळ दिले
जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जसे शिंदे आणि भाजप यांच्यात तणातणी सुरू आहे तसेच स्थानिक
राजकारणातही त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुढचा अंक दिवाळी नंतर हिवाळी अधिवेशनात?
राजकारणाचा पुढचा अंक दिवाळी नंतर हिवाळी अधिवेशनात किंवा त्यापूर्वी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्या पक्षातून ३०-३५
आमदारांचा गट मूळ पक्षात किंवा भाजपमध्ये जावून फूट पडल्यास सध्याच्या राजकीय महायुतीमध्ये दरार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपिठावर आलेल्या ठाकरेबंधूना बंदव्दार चर्चा
करत प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाकरे यांच्यासाठी देखील हा राजकीय यू टर्नचा प्रस्ताव राजकीय आणि व्यक्तीगत दृष्ट्या फायद्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शिंदे
आणि ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यात ठाकरे यांच्या बाजुने निकाल येण्यासारखे वातावरण असल्याचे सांगण्यात येत
असल्याने शिंदे यांच्यासमोर राजकीय संकटाचे ढग चारही बाजुनी दाटून आल्यासारखी स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून त्यांना यापूर्वी
राजकीय बळ देणाऱ्या भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्याची साथ मिळाली नाही तर शिंदे यांच्यासमोर शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासारख्या
राजकीय नेत्यांशी जुळवून घेण्याचा पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र केंद्रात मोदी आणि शहा यांच्या सत्तेविरोधात सुरू असलेल्या लढ्यात
इंडिया आघाडीचा घटक असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाकडून आता राज्यात शिंदे यांना फारच मर्यादित सहकार्याची शक्यता आहे असे जाणकार
सांगतात.
दिवाळीनंतर काय होणार?
महाराष्ट्र राजकारण : या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये दिवाळीनंतर काय होणार याची सर्वाना उत्सुकता आहे. कारण राज्यात तीनशे पेक्षा जास्त तालुक्यात १९७२
नंतरचा सर्वात भीषण पाणीटंचाई दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. राज्यातील जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अर्थिक
मदत देण्यात सरकारची दमछाक होताना दिसत आहे. त्यातच राजकीय उलाथापालथीच्या शक्यता केंद्रात देखील होण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर राज्याचे नेतृत्व कोण करणार?
भाजप आणि महायुतीमध्ये कोणते राजकीय बदल होणार? अश्या असंख्य प्रश्नाची उत्तरे शोधावी लागणार आहेत. त्यामुळे येणा-या काळासाठी
सावध ऐका पुढल्या हाका. . . अशी स्थिती असल्याचे मानले जात आहे. राज्याच्या राजकीय क्षितीजावर त्यामुळे संघर्ष आणि संक्रमणाचे ढग दाटले आहेत!
किशोर आपटे ९८६९३९७२५५
राजकीय विश्लेषक

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, उद्धव ठाकरे सरकार, एकनाथ शिंदे बंड, शिवसेना फुटीचा इतिहास, महाविकास आघाडी सरकार, महाराष्ट्रातील पक्षांतराचे राजकारण, लोकशाहीची सद्यस्थिती, संविधानिक पेच, महाराष्ट्र राजकीय विश्लेषण.
Published by – SanvadMedia