Maharashtra-Boxing-Association-Election : रणजित सावरकर यांच्याविरुद्ध उभे रहाणार आमदार प्रवीण दरेकर

Maharashtra-Boxing-Association-Election : जय कवळी गटाचे प्रवीण दरेकरांना समर्थन

मुंबई : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रणजीत सावरकर यांच्या विरोधात आमदार प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित आपली उमेदवारी घोषित केली आहे. २४ ऑक्टोबरला प्रसारित केलेल्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी जय कवळी यांच्या आग्रहाखातर मी उभा असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची मला पूर्ण पाठिंबा दिला असल्याचा दावा प्रवीण दरेकर (Praveen Darekar)यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून प्रवीण दरेकर मतदारांची दिशाभूल करत त्यांच्यावर दबाव निर्माण करत आहेत, अशी चर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे.

उल्लेखनीय म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक निष्पक्षपाती होण्यासाठी उपधर्मादाय आयुक्तांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ९ नोव्हेंबर या दिवशी ही निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांचे जाहीरपणे नाव घेत प्रवीण दरेकर हे सगळ्यांवर दबाव आणण्याचे राजकारण करत असल्यामुळे निवडणूक निष्पक्षपाती कशी होणार, ही चर्चा सर्वत्र होत आहे.

कोण आहेत जय कवळी ?

जय कवळी हे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी सचिव असून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना २० जानेवारी २०२२ बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) च्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले होते. त्याच वेळी ते महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने निलंबनानंतर त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले. यामुळे १९ जून २०२२ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रणजित सावरकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. आजही ते विद्यमान अध्यक्ष म्हणून कारभार करत आहेत.

बीएफआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जय कवळी यांना निलंबित केल्यानंतर महाराष्ट्र बॉक्सिंग आसोसिएशनमध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार रणजित सावरकर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. त्याची चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्रकरणी अन्य भ्रष्टाचाराच्या आरोपांबरोबरच त्यांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या खात्यातून स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यावर अडीच लाख रुपये हस्तांतरित केले होते आणि सुमारे ९.५० लाख रुपये त्यांनी रोख बँकेतून काढले होते. अजूनपर्यंत त्यांनी या रकमेचा कोणताही हिशोब दिलेला नाही. त्याच बरोबर धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये जय कवळी यांनी आमच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत, असे शपथपत्र रणजित सावरकर आणि अन्य ६ पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे सादर केले आहे. याचीही चौकशी सुरु आहे.

जय कवळी यांची मतदार चोरी(Maharashtra-Boxing-Association-Election)

२ नोव्हेंबरला महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक होत असून त्यात विद्यमान अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठे आव्हान निर्माण केले असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत केवळ ६० मतदार असल्याने प्रत्येक मताला प्रचंड महत्त्व आले आहे.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनमध्ये जय कवळी हे गेली बारा वर्षे उपाध्यक्षपदी विराजमान असून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष असल्याचा खोटा दावा करत जय कवळी यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन निवडणुकीसाठी दोन सदस्यांचे नामांकन मतदार म्हणून केले होते. विशेष म्हणजे या मतदार चोरीसाठी त्यांनी रणजित सावरकर यांचेच लेटरहेड वापरले आहे.

त्यामुळे रणजित सावरकर यांनी जय कवळी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेखाली फसवणूक, खोटी कागदपत्रे वापरणे आणि अन्य कलमांखाली समर्थ पोलीस ठाणे पुणे येथे एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

मुरलीधर मोहोळ विरोधकांना दरेकरांचा पाठिंबा का ?

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनमध्ये अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन निवडणुकीत प्रवीण दरेकरांनी अजित पवार समर्थक जय कवळी यांच्या पाठीमागे उभे रहाण्यामागे काय राजकारण आहे, असा प्रश्न क्रीडा क्षेत्रात उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात खेळाचा विचार कमी आणि राजकारणाचा भाग जास्त दिसत आहे, ही शोकांतिका !

Social Media