दीपज्योतीतील आठवणी : भावना, परंपरा आणि आजीच्या शिकवणीचं दर्शन

Deep-Amavasya-blog : दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरी केली जाणारी एक पवित्र आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची अमावस्या आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेष उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते.

“माझं बालपण आजी आणि आजोबा यांच्यासोबत गावातच गेलं. अगदी पहिल्या वर्गापासून ते दहावीपर्यंतचा संपूर्ण काळ मी त्यांच्या सान्निध्यातच होते. त्यामुळे गावात साजरे होणारे सण असोत किंवा कोणताही कार्यक्रम असो, मी ते अगदी जवळून अनुभवले आहेत.

आठवणीतील दीपपूजा(Deep-Amavasya-blog)

असो… आज हे लिखाण करण्याचं कारण म्हणजे आमच्या घरात दीप अमावस्येनिमित्त आजीने घडवून घेतलेली पूजा, त्या दिवशी घरातल्या दिव्यांचं पूजन आणि मी केलेली त्या पूजाविधीची कामं—या सगळ्या आठवणी आज मनात पुन्हा उजळून निघाल्या.”
जिवंतिका पूजनाचा दिवस उजाडला की नेहमीप्रमाणे सडा-सारवण करणं आलंच. मातीचं घर असल्यामुळे खडीच्या किनारीने आणि शेण-मातीच्या कालवणाने अख्खं घर सारवायचं… आणि अगदी नक्षीकाम वाटावं अशा चौघड्या काटेकोरपणे माझी आजी सारवायची. तीच शिकवण मीही अंगीकारली.
घरातली कामं आवरली की दारात सोनार उभा असायचा. मुख्य दरवाज्याला जिवती चिकटवायचा—ज्याचा आकार साधारण घरासारखा आणि विविध रंगाच्या म्हणजे लाल,पिवळा,निळा,सिल्व्हर रंगाच्या असायच्या… नंतर काही जिवत्या आणि मेण पूजेसाठी आमच्याकडे द्यायचा. तेव्हा आजी त्या सोनाराला शिधा द्यायची. गावाकडे शिधा देण्याची परंपरा होती. त्यामुळे आजी मला म्हणायची, “शिधा काढून ठेव.” तिच्या सांगण्याप्रमाणे मी घरातील थोडं-थोडं धान्य वेगवेगळ्या वाट्यांमध्ये ठेऊन ते ताट सजवायचे आणि ते दक्षिणास्वरूप शिधा त्या सोनाराला द्यायचे. आजी त्याला नमस्कार करायला सांगायची… ते अजूनही मनात आहे. ही झाली दिवसाची सुरुवात.

माझ्या आजीच्या घरची दीपपूजा(Deep-Amavasya-blog)

संध्याकाळ झाली की आजी मला एका वाटीत तांदूळ भिजत घालायला सांगायची. मी भिजवायचे. त्यानंतर आजी स्वयंपाकाला सुरुवात करायची—वरण-भात, भाजी, पोळी, आणि मग लाखोरीच्या डाळीचे वडे, पुऱ्या आणि गोड शिरा. असा भरगच्च नैवेद्य!
यानंतर वेळ व्हायची पूजेची. आमच्याकडे नाग-नागिणचं ठाणं आणि बोवाफरिद यांचं ठाणं असायचं—सकाळीच सारवून तयार केलं जायचं. देवखोली वेगळीच असायची.

आजीने मला जिवतीची पूजा कशी करायची ते शिकवलं होतं. मधल्या घरातील भिंतीवर चौकोनी आकाराचं शेणाचं सारवण करून ती जागा सजवायची. जे तांदूळ भिजवले होते ते पाटा-वरवंट्यावर वाटून एक वाटीत ठेवायचे. मग आगपेटीतील काडी घेऊन त्यावर कापूस गुंडाळायचा आणि त्या कुंचळीने तांदळाच्या पिठात बुडवून भिंतीवर घराची आकृती काढायची—समोर वऱ्हांड्यासाठी दोन पायऱ्या काढायची , आत शेतकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य जसे नांगर, फावडा,कुऱ्हाड,  शेतकरी…
एका बाजूला अंध आईवडिलांना कावडीने घेऊन जाणारा श्रावण बाळ, त्याच्या बाजूला पाच पांडव, आणि खालच्या बाजूस सात पुतांची माय—(स्त्री आणि तिची सात मुलं अंगाखांद्यावर खेळताना). एका कोपऱ्यात तुळशीचं छोटं वृंदावन. आणि किनाऱ्याला रेखीव सुशोभित काम!
ही सगळी चित्रं माझ्याकडून अगदी बारकाईनं करवून घेतली जायची. नंतर आजी आरतीची थाळ सजवून आणायची. नैवेद्याचं ताट तयार करायची त्यात पाच वडे, पाच पुऱ्या, गोड शिरा आणि वडा पुरीवर कणकीचे पाच दिवे अशी ठेवण असायची..
मग मी रेखाटलेल्या जिवतीवर वरच्या भागाला पाच जिवत्या आजी चिटकवायची आणि त्यांची पूजा करायची. सगळ्या देवांची पूजा झाली की आरती व्हायची.
आरती झाल्यावर खरी गंमत! आजी माझ्या हातात वडा-पुरी देवून टिका लावायची आणि माझ्या पाया पडायची. मी नाही म्हणायचे, तरी आजच्या दिवशी मुलांच्या पाया पडण्याची परंपरा आहे म्हणून पाया पडायची!
नंतर माझं डोकं त्या रंगीबेरंगी जिवतीवर पाच-सहा वेळा टेकवायची आणि काही गाणी म्हणायची. त्यातल्या दोन ओळी अजूनही मला आठवतात—
‘‘माझे खेल धुऱ्यावरी
तुझे खेल गलोगली…’’
मी अर्थ विचारल्यावर आजी म्हणायची, “माझं आयुष्य या खेड्यात आणि शेतात गेलं, तू मात्र जग पाहा… तू मोठी हो, साऱ्या दुनियेला जाण!”
नंतर मी आजी आणि आजोबा असे तिघेही मिळून जेवण करायचो…तर अशी साजरी व्हायची दीप अमावस्या माझ्या लहानपणी…तुमच्याकडे दीप अमावस्या कशी साजरी होते किंवा व्हायची काही आठवणी असतील तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा…धन्यवाद.. ही पूजा दोन तीन दिवस तशीच असते..मात्र नागपंचमीला जिवती पूजन दिसू द्यायची नसते त्यामुळे नागपंचमीच्या आधी ही पूजा पुसून टाकली जायची…

हर्षा रोटकर

Harsha-Rotkar

Social Media