. . . याचा कधी विचार आपण करणार आहोत? हा खरा प्रश्न आहे.!

मुंबईसह २९ महानगरपालिकांचा रणसंग्राम आता आली घटीका समीप नवरा. . . अश्या प्रकारे सध्याच्या घडीला मंगलाष्टके सुरू झाल्यासारख्या स्थितीला पोहोचली आहे. मी मराठी,. . मी मराठी हा मुद्दा आता सगळीकडे व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक प्रचार गुद्यावरुन मुद्यावर आणायचा चांगला प्रयत्न ठाकरे बंधूच्या मॅरेथॉन मुलाखतीमधून केला जात आहे. पण देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षांमध्ये इतर पक्षांतून माणसांची आयात करायची हिंदू मुस्लिम मुद्दे काढून आगलावी वक्तव्य करायची आणि विरोधकांवर सर्व बाजूनी अतिक्रमण करुन त्यांना चिरडून ‘बिनविरोध’ सत्ता हस्तगत करण्यापलिकडे काही सुरू असेल तर त्याचा शोध घ्यावा लागेल अशी स्थिती आहे.

दार उघड, बया दार उघड. . .’
शाहिरांच्या कवनातून पूर्वी ‘दार उघड, बया दार उघड. . .’ अशी हाक घातली जात असे, या मुलाखतीमधूनही जणूकाही मराठी मनोदेवतेला अशीच साद घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मुलाखतीचा गोषवारा पहायचा प्रयत्न केला तर काही मुद्दे वेगळे आणि मराठी महाराष्ट्रांच्या नागरिकांचे डोळे उघडणारे आहेत. त्यात मुंबईचा घास घेण्याचा आणि ती गुजरातला जोडण्याचा जो मोठा डाव मांडला जात आहे त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाढवण बंदराचा विकास करण्यात येत आहे. तो पूर्वीचा ठाणे आणि आताचा पालघर जिल्ह्याचा प्रदेश गुजरात(Gujarat) लगतचा भाग अविकसित असल्याने या पूर्वी मुंबईला थेटपणे गुजरातला जोडण्यात यश आले नव्हते. पण आता या भागात केवळ बंदर नव्हे तर विमानतळ देखील केला जात आहे. त्याचवेळी नवी मुंबईत मोठा विमानतळ उभारला गेला आहे. अहमदाबादची बुलेट ट्रेन(Bullet train) रिडेवलप होत असलेल्या धारावीच्या बाजुला बिकेसी(BKC) पर्यंत येत आहे. महाराष्ट्रातून कुणाला घाईने अहमदाबादला जायचे आहे? या पायाभूत सुविधा कश्यासाठी तयार केल्या जात आहेत? असा नेमका मुद्याला हात घालणारा प्रश्न उचलण्यात आला आहे. त्याचा बिनतोड युक्तिवाद करुन ‘सामना’ करता येणे शक्य नाही. एक दिवस हा विकास पूर्ण झाला की हा विकसित भाग गुजरातला जोडला जाईल किंवा केंद्र शासित म्हणून जाहीर केला जाणार नाही कश्यावरून? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्र्याकडून ‘चंद्र सूर्य असे पर्यंत मुंबई कुणी वेगळी करु शकत नाही’ असे प्रत्युत्तर देण्यात आले. त्यावर देखील या मुलाखतीमध्ये उत्तर देण्यात आले आहे की ‘गुजरातच्या नेत्यांचा’ फोन आला तर त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागणार आहे की नाही?

प्रपोगांडा प्रचाराला छेद देण्याचा प्रयत्न!
यामध्ये पहिल्यांदाच भाजपला ठाकरेंच्या प्रचाराला उत्तर द्यावे लागले आहे. अन्यथा आतापर्यंत भाजपच्या प्रपो’गांडा’ (भाय नव्हे बरं का?!) प्रचाराला सगळे पक्ष उत्तरे देण्यात व्यस्त केले जात असत. तर ज्याला म्हणतात प्रचाराला जमिनीवर उतरवणे! ते आता पहिल्यांदा पहायला मिळत आहे. हा प्रयत्न संजय राऊत (Sanjay Raut)गेल्या चार वर्षापासून दररोज सकाळी जो ‘नऊचा भोंगा वाजवतात’ (मशिदीवरील भोंग्यासारखे) असे म्हटले जात असते त्यामध्ये देखील केला जात होता. त्या भोंग्याला मग दिवसांतून ‘चार वेळा’ वेगवेगळ्या प्रवक्त्यांच्या मार्फत ‘डिफंग’ करण्याचा प्रयत्न केला का जात असतो? असा सवाल उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. पूर्वी नितेश राणे, चित्रा वाघ, प्रविण दरेकर किंवा प्रसाद लाड, आशिष शेलार असे भाजप नेते राऊतांच्या ‘सकाळी टाकलेल्या चेंडूवर दिवसभर’ खेळताना दिसत असत! आता त्यात थोडा बदल करून नवनाथ बन यांच्याकडे यावर भाष्य करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे पहायला मिळत असते. पण या वादावादी पेक्षा ‘वादे वादे जायते तत्वबोध:; अस भाजपच्या मूळच्या प्रकृतीला साजेसे काही होताना दिसले का बरे नाही? कारण केवळ यात वाद आणि प्रतिवाद होत असतो त्यातून त्या त्या वेळच्या प्रासंगिक बाबींना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर देताना एकमेकांची उणीधुणी धुण्यापलीकडे काही अर्थ नसतो हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे वाहिन्यांच्या महाचर्चांना जसा टि आर पी(TRP) फारसा मिळेनासा झाला तसा आता या सकाळच्या वादविवाद स्पर्धा कार्यक्रमाचे झाले आहे.

थेट लोकांकडे जायचा प्रयत्न
या सर्वाच्या पलिकडे जावून सध्या निवडणूकांमध्ये जाहीर सभांचा धडाका केवळ भाजपच्या नेत्यांकडुन लावला गेल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष त्या खालोखाल एकनाथ शिंदे(Eknath Shinde) राज्यभर जाताना दिसत आहेत. मग प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) फिरताना दिसत आहेत. पण ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे त्या ठाकरेबंधूंनी सोशल मिडियावर मॅरेथॉन मुलाखत देणे आणि मुंबईत शाखा भेटींना जात प्रचारावर भर दिल्याचे दिसत आहे. थेट लोकांकडे जायचा प्रयत्न जो यात्रा काढून राहूल गांधी(Rahul Gandhi) यांनी प्रकार केला तसाच हा प्रयत्न म्हणायला हवा. फार मोठ्या सभा अजून सुरू झाल्या नाहीत त्या आता शेवटच्या चार पाच दिवसांत होणार आहेत . त्यात ११तारखेला नरेंद्र मोदी(Narendra Modi) मुंबईत आहेत त्यावेळी शिवाजी पार्क येथे ठाकरेंच्या सभेचा झंझावात दिसणार आहे. तर १२ तारखेला भाजपची सभा होणार आहे त्यात ११ तारखेच्या सभेला उत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसेल.

प्रश्न मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर. . !
हे सारे होत असताना मुंबईत भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर(Rahul Narwekar) यांच्या दादागिरीचा नमूना देखील पहायला मिळाला आहे. आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रोटेक्शन ब्रांचच्या पोलीस अधिकाऱ्याला थेट फोनवरून आदेश देवू शकतो असा भ्रम अध्यक्ष महोदयांचा होता. खरेतर हा अधिकार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा आहे, त्यात थेटपणे अध्यक्ष विधानसभेत पिठासनावर नसताना हस्तक्षेप कसा करतात? असा प्रश्न २५ वर्षापेक्षा जास्त काळ राजकीय पत्रकारिता करणाऱ्या आणि विधिमंडळ मंत्रालयाची वार्तांकने करणाऱ्या आम्हा पत्रकारांना पडला आहे. मात्र काहीजणांना हात बांधल्याने तसे व्यक्त होण्यात अडचनीचे असते पण हा प्रश्न खाजगीत भाजपच्या जुन्या जाणत्या सुज्ञ लोकप्रतिनीधींनी देखील मान्य केला. बरे कुणाला संरक्षण द्यावे किंवा नाही? हे एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती ठरवते त्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत असा जुना शिरस्ता दंडक आहे. असे असताना हरिभाऊ राठोड या माजी खासदार आमदार वरिष्ठ राजकीय नेत्याला रस्त्यावर गुंडा सारखे धमकावत संरक्षण काढण्याची कारवाई कशी केली जावू शकते? हा देखील प्रश्न मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आता विचारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची पुष्टी करता येणे शक्य नसले तरी हे वास्तव सगळ्याच जाणकारांना आश्चर्यचकित करणारे आहे.

तिसरीकडे मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम(Amit Satam) (जे पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचे स्विय सहायक राहिले आहेत) यांनी केला आहे. मुंबईच्या विशिष्ट भागात बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांची बोगस मते घेण्याचा प्रयत्न केला जात आहे असा त्यांचा आरोप आहे. तर भाजपचे एक मंत्री आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा किंवा ‘व्हिसलब्लोअर (बोअर नव्हे बरे का?) प्रवक्ता’ किरिट सोमय्या (Kirit Somaiya)सातत्याने सांगत असतात की महाराष्ट्र मुंबईत रोहिंग्या बांग्लादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचे उत्तर देखील त्यांच्या सहकारी पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष नबाब मलिक यांनीच देवून टाकले आहे. नबाब मलिक यांना याबाबत पत्रकारांकडून विचारणा झाली त्यावेळी ते म्हणाले की, मी देखील काही काळ मंत्री राहिलो आहे, घुसखोरांना पकडून मूळ देशात पाठविण्याचा कार्यक्रम गेली पन्नास वर्ष या राज्यात सुरूच आहे. त्याची जबाबदारी केंद्र आणि राज्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे असते. मग भाजपच्या या आरोप करणाऱ्या नेत्यांना २०१४ पासून मधली अडीच वर्ष वगळता गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत याचा विसर पडला आहे का? त्यांना त्यांच्याच कार्यकाळात घुसखोरीला आळा घातला गेला नाही असे म्हणायचे आहे का? असा सवाल करताना मलिक यांनी कमाल तर शेवटच्या वाक्यात केली ते म्हणाले की, बांगलादेशात जन आंदोलन झाले त्यावेळी त्या देशाच्या पंतप्रधानांना शेख हसिना(Sheikh Hasina) यांना कोणत्या देशांत सुरक्षीत आश्रय देण्यात आला हे या नेत्यांना माहिती नाही काय? त्यावेळी देखील देशात मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वातील भाजपची सत्ता आहे नाही का? मित्रपक्षांच्या या मैत्रिपूर्ण जबाबाचा काय परिणाम झाला ते माहिती नाही पण अश्या बेशुध्द करणाऱ्या मुद्यांवर स्थानिक निवडणूकांचा प्रचार करणाऱ्यांना आपलेच हसे का करून घ्यायचे आहे हे देखील कुणी त्यांना विचारू शकत नाही.
जसा प्रश्न घुसखोरीचा विचारला जात आहे तसा प्रश्न ‘मराठी अमराठी’ हा देखील आहे. नबाब मलिक यांच्याकडून त्याचा देखील प्रतिवाद करण्यात आला मलिक यांनी म्हटले आहे की, ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी पासून अधिवासाचा दाखला आहे, त्या परप्रांतिय नागरिकांना आता मराठी महाराष्ट्राचे नागरिक ही कायदेशीर ओळख मिळाली आहे तर त्यांना अमराठी कसे ठरविता येईल. ज्यांच्याकडे १५ वर्षापूर्वीचा डोमेसाईल (अधिवासाचा) दाखला आहे त्यांना त्या राज्याचे नागरिकत्व मिळते हा कायदा आहे. त्यात सरसकट साऱ्या अन्य भाषिकांना कसे गणता येईल याचा देखील विचार केला पाहीजे. गंमत म्हणजे याच मलिक यांच्यावर भाजपकडून दाऊद शी संबंध असल्याने बहिष्कार घालून त्यांच्या पक्षाला मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने दूर केले आहे. तर गुंडाना राजाश्रय देण्याचा आरोप अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पक्षावर लावला जात असतानाही १६ तारखे नंतर भाजपच्या नेत्यांकडे जावून तिळगुळ देणार असल्याचे उत्तर सुनील तटकरे यांनी दिले आहे!

‘निवडणूकांचा ‘खूनी’ ज्वर’
नगरपालिकांपासून महापालिका निवडणूकी दरम्यान सोलापूर, अकोट, खोपोली येथे राजकीय नेत्यांच्या हत्यांचे भयानक वास्तव समोर आले आहे. अजून निवडणूकांचे निकाल घोषित होईपर्यत राज्यात या ‘निवडणूकांचा ‘खूनी’ ज्वर’ वाढणार नाही याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यासाठी हेच आव्हान असेल तसेच ते नवनियुक्त पोलीस महासंचालक दाते यांच्यासाठी देखील आव्हान असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सुध्दा त्याच पक्षांचा वरचष्मा हवा? अशी हवा पसरवून लोकांच्या कार्यकर्त्याच्या रक्ताने लोकशाही रंगणार का? मरणाऱ्या या कार्यकर्ते नेत्यांच्या पोराबाळांचे टाहो आपल्याला माणूस आहात का? असा जाब विचारत राहणार का? याचा कधी विचार आपण करणार आहोत हा खरा प्रश्न आहे. तुर्तास इतकेच!
किशोर आपटे.
(लेखक व राजकीय विश्लेषक)

हेही वाचा – मंकी बात – ३ : बिनविरोध निवड : नव्हे, लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचे षडयंत्र?