Amritakumbh: मानवी जीवनाचा प्रवास हा आनंदाच्या शोधाचा प्रवास आहे. या प्रवासात ‘भक्ती’ आणि ‘प्रेम‘ हे दोन शब्द सातत्याने आपल्या कानावर पडतात.
वरवर पाहता हे दोन्ही एकच वाटत असले, तरी अध्यात्माच्या खोल डोहात शिरल्यावर लक्षात येते की, भक्ती ही एक ‘साधना’ आहे, तर प्रेम हे त्या साधनेचे ‘सिद्ध’ स्वरूप आहे. भक्तीमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा असते, पण प्रेमात मात्र अस्तित्वाचा सहज आविष्कार असतो. ‘भक्ती करावी लागते, पण प्रेम स्वयंभू असते’ हे सूत्रच मानवी चेतनेला ईश्वरी चैतन्याशी जोडणारा खरा दुवा आहे.
भक्ती म्हणजे…(Amritakumbh)
भक्ती म्हणजे ‘विभक्त’ नसणे. पण ही अवस्था प्राप्त करण्यासाठी साधकाला अनेक टप्प्यांतून जावे लागते. भक्ती कोणाची तरी असते—मग ते सगुण रूप असो,
मूर्ती असो वा निर्गुण तत्व असो. भक्तीमध्ये नियमांचे पालन, उपासनेचे सातत्य आणि फळाची अपेक्षा (सुरुवातीच्या काळात) असते. भक्ती म्हणजे शिस्तबद्ध साधना आणि कर्तव्य.भक्तीला ‘कृती’चा आधार लागतो. नामस्मरण करणे, तीर्थयात्रा करणे, सेवा करणे या गोष्टी ‘कराव्या’ लागतात.
या कृतींमागे एक प्रकारचे द्वैत असते—एक भक्त आणि दुसरा भगवंत.भक्तीचा हा मार्ग कष्टाचा असला तरी तो अंतःकरण शुद्ध करण्याचे सामर्थ्य ठेवतो.भक्ती ही त्या शेतीसारखी आहे जिथे मशागत करावी लागते,बी पेरावे लागते आणि खतपाणी घालावे लागते, तरच त्यातून प्रेमाचे पीक डोलू लागते.’स्वयंभू’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘स्वतःहून प्रकट होणारे’ असा आहे. ज्याप्रमाणे डोंगरातून झरा आपोआप उफाळून येतो, त्याला कोणाच्याही आदेशाची गरज नसते,
तद्वतच प्रेम हे मानवी हृदयाचा नैसर्गिक धर्म आहे. प्रेम हे ‘केले’ जात नाही, तर ते ‘घडते’. जेव्हा भक्ताच्या मनातील अहंकार, अधिकारआणि कर्माचा गर्व पूर्णपणे विरघळून जातो, तेव्हा उरते ते केवळ प्रेम.
स्वयंभू प्रेमात कोणताही व्यापार नसतो. तिथे ‘मी तुला इतकी भक्ती दिली, तर तू मला इतके सुख दे’ हा हिशेब संपलेला असतो.तिथे प्रेम हेच साधन असते आणि प्रेम हेच साध्य असते. हे प्रेम व्यक्तीकडून समष्टीकडे आणि समष्टीकडून ईश्वराकडे वाहू लागते.
मानवी जीवनात आपण भक्ती-प्रेमाचे विविध पदर अनुभवतो.आपल्या संस्कृतीत आई-वडिलांना ‘देव’ मानले आहे. त्यांच्याबद्दलची ओढ ही कृतज्ञतेतून आणि आदरातून जन्माला येते.
ही एक प्रकारची ‘पूजा’ आहे, म्हणून त्याला आपण भक्ती म्हणतो.
आध्यात्मिक विकास (Amritakumbh)
पत्नी, मुले, मित्र, समाज, राष्ट्र यांच्यावर प्रेम असते. हे सहवासातून आणि आपलेपणातून निर्माण होते.
जरी यात सुरुवातीला ‘आसक्ती’ असली, तरी जसजसा मनुष्याचा आध्यात्मिक विकास होतो, तसतसे या नात्यांमधील स्वार्थ संपून तिथे एक निरपेक्ष ओढ निर्माण होते.
जेव्हा हे प्रेम ‘माझे आणि तुझे’ या परिघाच्या बाहेर पडते, तेव्हा ते ‘स्वयंभू’ होते. मग मनुष्याला केवळ आपल्या मुलांतच नव्हे,तर शेजाऱ्याच्या मुलात आणि शत्रूमध्येही ईश्वराचा अंश दिसू लागतो.
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूमीला संतांनी प्रेमाच्या रसाने भिजवून चिंब केले आहे. त्यांनी भक्तीला ‘शुष्क’ राहू दिले नाही, तर तिला ‘प्रेमाची’ जोड दिली.
जेव्हा भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा इतका वाढतो की भक्त आणि भगवान यांच्यात कोणतेही अंतर उरत नाही, तेव्हा त्यातून ‘मधुरा भक्ती’चा उदय होतो.
या मार्गावर चालणारा भक्त ईश्वराला आपला ‘प्राणप्रिय’ मानतो.मधुरा भक्तीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे वृंदावनातील गोपिकांचे आणि राधा राणीचे श्रीकृष्णावर असलेले प्रेम.
संतांनी यालाच भावप्रधान स्वरुपाची कांतासक्ती असेही म्हटले आहे.ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत प्रेमाचे वर्णन करताना म्हटले आहे की, ईश्वराची भक्ती ही ‘अद्वैत’ असावी. प्रेमात भक्त इतका विरघळतो की तो स्वतःच देव होतो.
“भक्तु देवचि झाला” ही अवस्था म्हणजे स्वयंभू प्रेमाचा कळस आहे.जगद्गुरू तुकोबांच्या लेखणीतून जेव्हा “प्रेम नसे ज्याचे ओठा, तो तरि संसाराचा खोटा” असे शब्द उमटतात, तेव्हा ते प्रेमाची अनिवार्यता अधोरेखित करतात.
विठ्ठलाशी असलेले त्यांचे नाते हे मालक-नोकराचे नसून ते एका जिवाभावाच्या सख्याचे होते.संत नामदेव यांचे ‘वेडे प्रेम’ आणि एकनाथांची ‘भूतदया’ हे स्वयंभू प्रेमाचेच अविष्कार आहेत.
प्राणिमात्रांवर प्रेम करणे हीच खरी भक्ती आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.या संतांच्या अभंगातही जेव्हा विठ्ठलाला ‘सखा’ किंवा ‘माहेरची माय’ मानून आळवणी केली जाते, तेव्हा तिथे मधुरा भक्तीचाच सूक्ष्म ओलावा जाणवतो.
स्वयंभू प्रेम हे जेव्हा ईश्वराभिमुख होते, तेव्हा त्याचे पर्यवसान ‘मधुरा भक्ती’ मध्ये होते.ही भक्ती नियमांच्या कचाट्यात सापडलेली नसते, तर ती प्रेमाच्या रसात न्हाऊन निघालेली असते.
मानवाला मुक्तीकडे नेणारे
स्वयंभू प्रेम हे मानवाला मुक्तीकडे नेणारे सर्वात सोपे साधन आहे. ज्ञान मार्गावर चालताना बुद्धीचा कस लागतो, योग मार्गात शरीराचा कस लागतो,
पण प्रेम मार्गात फक्त ‘हृदय’ लागते. हे प्रेम एकदा जागृत झाले की विश्वातील प्रत्येक वस्तू सुंदर वाटू लागते. तिथे द्वेष संपतो, मत्सर संपतो आणि फक्त करुणेचा झरा वाहू लागतो.(Amritakumbh)
भक्ती ही त्या स्वयंभू प्रेमापर्यंत पोहोचण्याची पायरी आहे. आपण सुरुवातीला प्रयत्नपूर्वक देवाची भक्ती करतो, स्वतःच्या मनाला शिस्त लावतो.पण ही भक्ती जेव्हा परिपक्व होते, तेव्हा त्याचे रूपांतर प्रेमात होते. एकदा का ते प्रेम ‘स्वयंभू’ झाले की, मग भक्ती करण्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज उरत नाही.
मग आपले प्रत्येक कर्म, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक शब्द हीच एक अखंड भक्ती होऊन जाते. मग चालणे हीच प्रदक्षिणा होते, बोलणे हेच स्तोत्र होते आणि प्रत्येक श्वास हेच नामस्मरण होते.
“स्वयंभू प्रेम” हे केवळ मानवी भावनांचे नव्हे, तर आध्यात्मिक उत्क्रांतीचे मूळ तत्त्व आहे. भक्ती जर वाट असेल, तर प्रेम हे ध्येय आहे.आणि जेव्हा प्रेम भक्तीत विलीन होते, तेव्हा साधकासाठी मोक्षही सहज, स्वाभाविक आणि स्वयंभू ठरतो.
श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा. ९४२३३८३९६६