भांडवलदारांच्या फायद्यासाठी मुंबईचा सौदा? आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप…

Aditya-Thackeray : भांडवलदारांच्या फायद्यासाठी मुंबईचा सौदा? आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप…

मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने आणि रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावांवरून शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार सर्वसामान्यांच्या हिताला डावलून धनाढ्यांच्या फायद्यासाठी निर्णय घेत असल्याचा आरोप केला.शिवसेनेने मुंबई जपली आणि जोपासली मात्र हे सरकार मुंबई विकण्याच्या तयारीत आहे असा घणाघात त्यांनी केला.

सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील महत्त्वाच्या जागांबाबत अनेक वादग्रस्त प्रस्ताव पुढे आणण्यात आले. बांद्रा येथील मैदान प्रदर्शन केंद्रासाठी वापरण्याचा प्रस्ताव होता तर मलबार हिल परिसरातील मैदान एका व्यावसायिकाला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ‘वर्षा’ बंगल्यालगतच्या भूखंडाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. (Aditya-Thackeray)

यामधील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे मुंबईतील रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. हे सर्व प्रस्ताव ११०० हून अधिक कोटी रुपयांच्या व्यवहारातून काही जणांच्या फायद्यासाठी पुढे आणले जात होते असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबईतील सार्वजनिक जागा आणि आरोग्यसेवा खासगीकरणाच्या माध्यमातून काही मोजक्या लोकांच्या हातात देण्याचा डाव असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर तीव्र टीका केली.

Social Media