Special-Award : ढालसिंगीचे सुपुत्र प्रा.विद्यानंद अहिरे यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘विशेष मध पुरस्कार’ जाहीर 

Special-Award : अध्यक्ष तथा राज्यमंत्री रविंद्र साठे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे होणार गौरव
जामनेर (प्रतिनिधी) : जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘विशेष पुरस्कार’ जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथील प्रगतशील मध उद्योजक प्रा. विद्यानंद सुकराम अहिरे यांना जाहीर झाला आहे. मध उद्योग क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल हा राज्यस्तरीय गौरव करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्यामार्फत सन २०२६ च्या पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये अहिरे यांनी मधमाशा पालन व्यवसायाचा विकास, शुद्ध मध उत्पादन, शास्त्रीय प्रशिक्षण, जनजागृती आणि उद्योगाचा विस्तार करण्यासाठी केलेल्या विशेष कार्याची दखल राज्यस्तरीय निवड समितीने घेतली आहे.

भव्य पुरस्कार वितरण सोहळा:(Special-Award)

हा पुरस्कार वितरण सोहळा जागतिक मधमाशी दिनानिमित्त दि. २० मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ‘संत एकनाथ रंगमंदिर’, क्रांती चौकाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री  रविंद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  लक्ष्मण राऊत, राज्यातील सर्व जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, मधु क्षेत्रिक, तज्ञ शास्त्रज्ञ आणि राज्यातील प्रगतशील मधपाळ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव:

अहिरे यांच्या या यशाबद्दल जळगावचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण,  व्ही. आर. चौधरी, रुपेश पाटील तसेच जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे, अमरावती जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी  प्रदीप चेचरे,  राजेंद्र तायडे,  वानखेडे,  पी. के. असोलकर (नि.) आणि चिखलदरा स्फूर्ती क्लस्टरचे संचालक  सुनील भालेराव यांनी प्रा.डॉ.अहिरे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. जिल्ह्यातील एका कल्पक मधपाळाचा राज्यस्तरावर सन्मान होत असल्याने संपूर्ण खान्देश आणि विदर्भातील मधुमक्षिका पालन क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
प्रा.विद्यानंद अहिरे यांनी आपल्या कौशल्याने आणि परिश्रमाने मध उद्योगात निर्माण केलेले स्थान हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून, या बहुमानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Social Media