मी-तू पणाची बोळवण..

Dutta-Jayanti : मी-तू पणाची बोळवण..’श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मन’ असे म्हटले जाते.
संत एकनाथ महाराजांच्या श्रीदत्त आरतीतील शेवटचे चरण हे भारतीय अध्यात्मिक परंपरेतील अद्वैत सिद्धीचे सार आहेत: “मी तू पणाची झाली बोळवण | एका जनार्दनी श्री दत्त जाण ||”
या ओळी ‘दत्त नामाचा छंद’ लागल्यानंतर साधकाला प्राप्त होणाऱ्या उन्मनी अवस्थेचे वर्णन करतात.

नामस्मरणाच्या अखंड ध्यानातून साधकाचा अहंकार विरघळून जातो आणि त्याला सर्व चराचरात भरलेले केवल दत्त तत्त्व/परब्रह्म जाणवते. हा अनुभव म्हणजेच भक्ती आणि ज्ञानाच्या समन्वयातून मिळणारा मोक्ष होय.

एकनाथ महाराज सांगतात: “दत्त दत्त ऐसें लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन”. नामाचा छंद लागणे म्हणजे नाम हे केवळ वाणीपुरते न राहता, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावणे.

या अवस्थेत चंचल मनाचा लय होऊन ते ‘उन्मन’ होते. ‘मी तू पणाची झाली बोळवण’ या वाक्याचा अर्थ आहे, भक्त (मी) आणि भगवंत (तू) यांच्यातील द्वैताचा, भेदाभेदाचा निरोप घेणे.

भक्तीच्या मार्गावर चालताना ‘मी उपासना करणारा आणि तू माझा उपास्य देव’ अशी वेगळी ओळख असते. परंतु, जेव्हा साधना परिपक्व होते, तेव्हा साधकाला जाणवते की,

आपले मूळ स्वरूप आणि परमात्म्याचे मूळ स्वरूप हे एकच आहे.

हा अहंकार विसर्जित झाल्यावरच ही बोळवण शक्य होते.या अद्वैत स्थितीला पाणी आणि लाटेच्या दृष्टांतातून सहज समजून घेता येतं.

जोपर्यंत लाट स्वतःला समुद्रापासून वेगळी मानते, तोपर्यंत ती ‘मी’ (लाट.) वेगळी आणि ‘तू’ (समुद्र) वेगळा असे द्वैत अनुभवते. परंतु ओहोटीच्या लाटेला तिच्या ‘पाणी’ या मूळ स्वरूपाची जाणीव होते.

तिचा वेगळा आकार समुद्राशी विरघळून जातो, एकरूप होतो. लाट शांत होऊन समुद्रात विलीन होते, तेव्हा तिचे वेगळे अस्तित्व संपते. म्हणजेच मी-तू पणाची बोळवण होते.

आता लाट आणि पाणी (समुद्र) एकरूप होतात. साधकाला ‘मीच तू आहे’ या सत्याची अनुभूती येते.(Dutta-Jayanti) संत एकनाथ महाराजांचा हा अनुभव आणि

श्री नृसिंह सरस्वतींच्या लीलांचा समावेश असलेला श्रीगुरुचरित्र ग्रंथ याच विचारांना प्रत्यक्ष उदाहरणांनी सिद्ध करतो. श्रीगुरुचरित्रातील अनेक प्रसंग ‘मी-तू पणाची’ बोळवण

आणि ‘दत्त तत्त्व सर्वत्र जाणणे’ यावर प्रकाश टाकतात:

श्री नृसिंह(Shri Narasimha) सरस्वतींनी एका साध्या ब्राह्मणाला केवळ आपल्या कृपेने तात्काळ आत्मज्ञान दिले. त्या ब्राह्मणाला वेद-शास्त्र येत नव्हते,

तरी गुरुकृपेने तो अहंकारमुक्त झाला आणि त्याला आत्मतत्त्वाची अनुभूती झाली.

यातून सिद्ध होते की, गुरुकृपेमुळे अज्ञानाचा (मी-पणाचा) पडदा दूर होऊन लगेच अद्वैत ज्ञान प्राप्त होते.

सायंदेवाच्या कथेत श्रीगुरूंनी कृमिकीटांच्या रूपात दर्शन देऊन सांगितले की, मी सर्वत्र भरलेला आहे. पुढे त्यांनी सायंदेवाला विश्वात्मक दत्त तत्त्वाचे दर्शन घडवले.

जेव्हा साधक प्रत्येक जीवात (कृमिकीट पतंगांमध्ये) दत्त तत्त्व पाहतो, तेव्हा ‘मी वेगळा आणि देव वेगळा’ हा भेद नष्ट होतो.

हीच ‘एका जनार्दनी श्री दत्त जाण’ (Dutta-Jayanti)या वचनाची अनुभूती आहे. सर्वत्र समत्व बुद्धी येणे म्हणजे ‘मी-तू’ पणाची बोळवण होणे.

गुरुचरित्रात भस्माचे महत्त्व सांगितले आहे. भस्म हे वैराग्य आणि देहाच्या नश्वरतेचे प्रतीक आहे. भस्म धारण करणे म्हणजे देहाच्या मीपणाला जाळून टाकणे होय.

तसेच, श्रीगुरूंनी भक्तांना वेळोवेळी आपले विश्वरूप दाखवले आहे. विश्वरूप दर्शनात भक्त पाहतो की, जे काही आहे, ते गुरूंचेच रूप आहे. यामुळे भक्ताचा ‘मी वेगळा’ हा भाव संपून अद्वैत भाव दृढ होतो.

संत एकनाथ(Sant Eknath) ‘एका जनार्दनी’ या नाममुद्रेतून स्पष्ट करतात की, हा अनुभव त्यांना त्यांच्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने प्राप्त झाला.
‘दत्त नामाचा छंद’ लागणे म्हणजे केवळ जप करणे नव्हे, तर गुरुकृपेवर पूर्ण निष्ठा ठेवून आणि अखंड नामस्मरणाचा अभ्यास करून चित्ताची एकाग्रता साधणे.

या एकाग्रतेतूनच अहंकार (मी-पणा) गळून पडतो आणि जीव-शिवाच्या ऐक्याची अनुभूती येते.

हीच मी-तू पणाची बोळवण आहे, जी श्री दत्त तत्त्वाच्या साक्षात्काराने समाप्त होते.

श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा ९४२३३८३९६६

हेही वाचा- प्रार्थनेचा ‘हा’ परिणाम…

Social Media