विजयादशमी – प्रेरणादायी जीवनदृष्टी देणारे पर्व

Vijayadashami : भारतीय संस्कृतीत सण हे केवळ आनंदाचे क्षण नसून, ते जीवनाच्या मूलभूत मूल्यांची आठवण करून देणारे प्रेरणास्रोत असतात. अशाच सणांमध्ये विजयादशमी ज्याला दसरा म्हणतात हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण सण आहे. पारंपरिक दृष्टिकोनातून हा दिवस रामाने रावणाचा वध करून सत्याचा विजय साजरा केल्याचा आहे. परंतु आजच्या काळात विजयादशमी ही केवळ पौराणिक विजयाची आठवण नसून, एक मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी ठरते जी व्यक्तीच्या आत्मविकासापासून समाजाच्या समरसतेपर्यंत आणि पर्यावरणाच्या जतनापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत पोहोचते.

विजयादशमीचा खरा अर्थ आहे अंतर्मनातील दुर्गुणांवर विजय मिळवणे. रावण(Ravana) हा केवळ एक राक्षस नव्हता, तर अहंकार, लोभ, मोह, क्रोध यांचे प्रतीक होता. रामाचा विजय म्हणजे या दुर्गुणांवर आत्मशक्तीने मिळवलेला विजय. आजच्या काळातही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे अंतर्गत रावण असतात जे त्याच्या प्रगतीला अडथळा ठरतात. विजयादशमीच्या दिवशी आपण शस्त्रपूजा करतो, पण ही पूजा केवळ हत्यारांची नव्हे, तर आपल्या बुद्धी, कौशल्य, आणि श्रमाची असते. हेच खरे ‘शस्त्र’ आहे जे आत्मनिर्भरतेकडे नेते. “स्व” म्हणजे स्वतःची ओळख, मूल्ये, आणि ध्येय. या दिवशी आपण आत्मशोध करून आत्मविकासाचा संकल्प करतो.

दसरा (Dussehra)हा सर्वांचा सण आहे. जाती, धर्म, वर्ग, लिंग यापलीकडे जाऊन समाज एकत्र येतो. आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून वाटली जातात ही परंपरा प्रेम, विश्वास आणि ऐक्याचे प्रतीक आहे. सुवर्णपानाची देवाणघेवाण करताना आपण प्रत्येकाला आदराने स्वीकारतो. समरसतेचा संदेश म्हणजे विविधतेतून एकता साधणे आणि मानवतेचा उत्सव साजरा करणे. आजच्या विभाजित समाजात विजयादशमीचा हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन सत्य, धर्म आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणे हेच खरे सामाजिक सीमोल्लंघन आहे. सामाजिक ऐक्य आणि समभाव म्हणजेच समरसता होय.

विजयादशमीच्या दिवशी आपटा आणि शमी वृक्षांची पूजा केली जाते. ही पूजा निसर्गाप्रती कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. पावसाळा संपल्यावर नवे पीक घरात येते, त्यामुळे शेतकरीवर्गही हा सण उत्साहाने साजरा करतो. आजच्या काळात पर्यावरण रक्षण ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रदूषणमुक्त उत्सव साजरे करणे, वृक्षसंवर्धनाचे संकल्प करणे, आणि निसर्गाशी सुसंवाद साधणे हे विजयादशमीचे आधुनिक रूप आहे. निसर्गाशी समतोल राखल्याशिवाय विजयाचा खरा अर्थ साकार होत नाही. पर्यावरणपूरक जीवनशैली हीच आजच्या युगातील विजयाची खरी दिशा आहे. निसर्गाशी सुसंवाद साधून आपण पर्यावरण रक्षण करू शकतो.

रामराज्य हे न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदार नागरिकत्वावर आधारलेले होते. रामाने रावणाचा वध केवळ वैयक्तिक सूडासाठी नव्हता, तर समाजहितासाठी होता. आजच्या काळात सीमोल्लंघन म्हणजे वैयक्तिक मर्यादा ओलांडून समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी कार्यरत होणे. भ्रष्टाचार, अन्याय, हिंसा या सामाजिक ‘रावणा’चा नाश करणे, स्वच्छता, कायद्याचे पालन, मतदान यासारख्या कर्तव्यांची जाणीव ठेवणे हेच खरे नागरी धर्म आहे. विजयादशमीच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने सत्य आणि न्यायासाठी उभे राहण्याचा संकल्प करावा हीच आधुनिक काळातील शस्त्रपूजा आहे. आपल्या जबाबदारीची जाणीव होणे हे आपले नागरी कर्तव्य पार पडणे होय.

रामायणातील राम, लक्ष्मण, सीता, भरत यांचे संबंध आदर्श कुटुंबसंस्कृतीचे प्रतीक आहेत. विजयादशमीच्या दिवशी कुटुंब एकत्र येते, वडीलधाऱ्यांना वंदन केले जाते, आणि मुलांना संस्कार दिले जातात. ही संस्कृती समाजाच्या पायाभूत रचनेला बळकट करते आणि राष्ट्रनिर्मितीचा पाया घालते. कुटुंबातील प्रेम, आदर, आणि नैतिक मूल्यांची जपणूक हीच कल्याणकारी संस्कृती आहे. आजच्या काळात विभक्त कुटुंबपद्धती, ताणतणाव आणि नैतिक मूल्यांचा अभाव यामुळे समाजात अस्थिरता निर्माण होते. विजयादशमीच्या निमित्ताने आपण कुटुंबसंस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प करावा. प्रेम, आदर आणि मूल्यांची जपणूक हेच कल्याणकारी कुटुंब संस्कृतीचे प्रतिक आहे.

विजयादशमी हा केवळ रावणाच्या पुतळ्याचे दहन नव्हे, तर आपल्या अंतर्मनातील दुर्गुणांचा नाश करून नवचेतना प्रज्वलित करणारा दीप आहे. विजयादशमी म्हणजे एक मूल्यप्रवाहित चळवळ जी “स्व” पासून समाजापर्यंत, निसर्गापासून राष्ट्रापर्यंत पोहोचते. विजयादशमी उत्सव एक प्रेरणादायी जीवनदृष्टी आहे जी प्रत्येकाला आत्मविकास, सामाजिक ऐक्य, पर्यावरण रक्षण, जबाबदार नागरिकत्व आणि कुटुंबातील प्रेम यासाठी प्रेरित करते.

या दिवशी आपण केवळ विजय साजरा करत नाही, तर नव्या संकल्पांची सुरुवात करतो. हे संकल्प म्हणजे स्वाभिमानाने जगणे, समाजात समरसता निर्माण करणे, निसर्गाशी सुसंवाद साधणे, जबाबदार नागरिक होणे आणि कुटुंबातील मूल्यांची जपणूक करणे. विजयादशमीचा दीप हा केवळ रावणाच्या अंताचा नव्हे, तर नवजीवनाच्या आरंभाचा दीप आहे जो प्रत्येकाच्या अंतःकरणात उजळून निघावा.
सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्या.

श्रीकांत तिजारे
९४२३३८३९६६

Social Media