Narakesari-Lokmanya: “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत…” या गीतेतील श्लोकाप्रमाणे, जेव्हा देश धर्मभ्रष्ट, अन्यायाने ग्रासलेला असतो, तेव्हा काही व्यक्तिमत्त्वं काळाच्या प्रवाहात अवतरतात. असाच एक तेजस्वी, कणखर, निर्भय योद्धा म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी चिखलगाव, रत्नागिरी येथे झाला. बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि निर्भीड वक्तृत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होते. “शेंगा मी खाल्ल्या नाहीत, तर टरफले उचलणार नाही,” असे ठाम उत्तर देणारे टिळक स्वाभाविकच नेतृत्वासाठी घडले होते. गणित-संस्कृत विषयात B.A. आणि L.L.B. करूनही त्यांनी नोकरी न करता राष्ट्रसेवेचं व्रत घेतलं.
१८८१ मध्ये गोपाळ गणेश आगरकरांसोबत “केसरी” (मराठी) आणि “मराठा” (इंग्रजी) साप्ताहिक सुरू करून त्यांनी लोकजागृतीचा विडा उचलला. हे केवळ बातमीपत्र नव्हते, तर विचारांचे शस्त्र होते. “स्वदेश”, “स्वराज्य”, “बहिष्कार” आणि “राष्ट्रीय शिक्षण” ही त्यांची चतु:सूत्री केसरीच्या अग्रलेखांतून जनतेच्या मनात खोलवर रोवली गेली. त्यांच्या लेखणीने इंग्रज सत्तेला हादरवले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा घोष, स्वातंत्र्यलढ्याला नवे बळ देणारा ठरला.
१८९७ मध्ये प्लेगच्या काळातील सरकारी अन्यायाविरुद्ध लिहिलेल्या अग्रलेखामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. शिक्षा भोगताना मंडालेच्या तुरुंगात त्यांनी “गीता रहस्य” हा ग्रंथ लिहिला. त्यांनी समाजमनात देशभक्तीची मशाल पेटवली. त्यांचे अग्रलेख हे विचार जागवणारे आणि क्रांतीची बीजे पेरणारे होते.
लोकमान्य टिळकांनी समाजात, शिक्षणात, राजकारणात आणि विचारांमध्ये स्वातंत्र्याचा श्वास दिला. आत्मनिर्भर भारताची बीजे त्यांच्या चतु:सूत्रीतच दडलेली होती. त्यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन.
“तो नर नव्हे जो नुसता जन्म घेऊन मरतो | नर तोच जो एक युग घडवतो!”
श्रीकांत तिजारे, भंडारा