बाळासाहेबांच्या स्वप्नांसाठी गनिमीकाव्याने धोबीपछाड? नव्या पिढीचे ठाकरेबंधू एकत्र येण्याची शक्यता? भाजप आणि अन्य राजकीय पक्षांत खळबळ?

मुंबईत सध्या निवडणूकांची धग वाढू लागली आहे. प्रमुख सत्ताधारी पक्ष भाजप-शिंदे सेना यांच्याकडून निवडणूक प्रचार आणि तयारीचा शुभारंभ झाला आहे. तर उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी देखील पक्षाच्या ५९व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून आपल्या पक्षाकडून कार्यकर्त्याना तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी देखील मुख्यमंत्र्याना बांद्रा(Bandra) येथे पंचतारांकीत हॉटेलात स्वत:च्या वाढदिवसा निमित्त भेट घेतली. ही भेट व्यावसाईक आणि राजकीय दोन्ही प्रकारची होती म्हणे! मग निवडणूकांच्या रणनितीवरही तेथे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या चर्चांचा तपशील बाहेर आला नसला तरी या भेटीनंतर ज्या घटना घडल्या त्यावरून राजकीय चाणाक्ष विश्लेषकांकडून त्यावर भाष्य केले जात आहे.

हिंदीच्या सक्तीचे भूत दाखवून लुटूपूटूचा संघर्ष?
ठाकरे-फडणवीस(Thackeray-Fadnavis) यांच्या भेटीनंतर दोनच दिवसांत राज्य सरकारकडून हिंदी भाषेला पहिलीपासून अनिवार्य करण्याबाबतच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्यात आले. म्हणजे या पूर्वी शासनाने निर्णय घेताना बहुदा ते शुदधीवर नव्हते का? अशी मिश्कील प्रतिक्रिया यावर काही मराठी पत्रकारांनी दिली. असो गंमत तर पुढेच आहे. या शुध्दीपत्रकात सरकारकडून तिसरी भाषा म्हणून मराठी इंग्रजी नंतर हिंदीला पर्यायी भाषा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र अट अशी की ज्या भाषा शाळेत पहिली ते पाचवीचे विद्यार्थी पर्यायी म्हणून घेतील त्या किमान वीस जणांच्या गटाने घ्याव्या लागतील तरच त्यांना त्या शिकण्यासाठी स्वतंत्र शिक्षक शाळा नेमू शकेल अन्यथा त्यांना दूरस्थ पध्दतीने (ऑनलाईन) शिक्षण घ्यावे लागणार आहे.

आता अजून गंमत पहा राज्यातील मध्यप्रदेशच्या सिमेजवळच्या जिल्ह्यात भाषावार प्रांतरचना झाली तरी मराठीसोबत हिंदी सहजपणे बोलण्या वागण्याची भाषा आहे. विदर्भात उत्तर महाराष्ट्रात हे जाणवते. मराठवाड्यात हैद्राबादी हिंदीचा प्रभाव इतका आहे की अगदी नाशिक, नगर पर्यत हिंदीचा वापर (कायकू?) मराठी सोबतच होताना दिसतो. मुस्लिम समाज, उत्तर भारतीय लोक जवळपास सर्वच जिल्ह्यात रोजगारासाठी आले आहेत त्यांच्यामुळे हिंदी देखील महाराष्ट्रात मराठी इतकीच प्रचलीत भाषा आहेच. मुंबई परिसरात दुधवाला, चक्कीवाला रिक्षावाला,पानवाला भैय्याच आहे. त्यामुळे हिंदीला मराठीच्या बरोबरीने स्थान आहे. (भैय्या आजकाल दूध इतना पात्तळ क्यो देता है?)
कर्नाटक(Karnataka) आंध्र-तेलंगणच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात मराठीसोबत कानडी तेलगू(Telugu) देखील प्रचलित आहे,तर गुजरात लगतच्या महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, ठाणे, मुंबई जिल्ह्यात गुजराथी, राजस्थानी, मारवाडी भाषा मराठी सोबतच प्रचलित आहेत. कुणाला त्यावरुन जीवघेणा संघर्ष करण्याची राजकारण करण्याची गरज वाटल्याचे दिसत नाही. समाज सामंजस्याने एकोप्याने राहात असताना मग हिंदीच्या सक्तीचे भूत दाखवून निवडणूकीसाठी लुटूपूटूच्या संघर्षाचा मुद्दा का पेटवायचा आहे?

जनता खोट्या, वावदूक प्रचाराला बळी पडणार नाहीच!
कारण त्यात सरकारसमोर लोकांचे मूळ प्रश्न विरोधकांनी लोकानी विचारूच नयेत? सर्वात महत्वाचा मुद्दा विधानसभा निवडणूकीच्या मतदार याद्या आणि मतदानात झालेल्या घोटाळ्याच्या मुद्यावरुन लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा हा उद्योग असल्याचे सामान्य जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे मनसे नेते भाजप सोबत न जाता त्यांची अश्या मुद्यावर दिशाभूल करण्यासाठी मदत करत असल्याचे अनुमान राजकीय विश्लेषक मांडत आहेत. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले((Nana Patole) यांनी हेच पत्रकार परिषद घेवून सांगितले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अचानक नियमावलीत बदल करण्याच्या आणि सायंकाळी पाच नंतरचे दस्तावेज नष्ट करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे देखील सांगितले आहे.हिंदी सक्तीच्या या मुद्यावर त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात आता जनता खोट्या वावदूक प्रचाराला बळी पडणार नसल्याचे दिसत आहे. मराठी भाषेच्या शाळांना खरेतर सुविधा आणि विद्यार्थी का मिळत नाहीत यावर सरकार आणि मनसे सारख्या पक्षांकडून जागृती होणे आवश्यक आहे असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. मात्र सवंग राजकीय पोळी भाजून घेण्याची सवय झालेल्या राजकीय नेत्यांना आता लोकांचे खरे प्रश्न सोडवायचे नाहीत म्हणून खोटा आवेश आणून वेळ मारुन नेणारे मुद्दे सूचत असावेत!

शिवसेना पक्ष प्रमुखांची फिल्मी डायलॉगबाजी!
दुसरीकडे शिवसेनेचे दोन वर्धापनदिन साजरे करण्यात आले एक गट २०२२मध्ये जन्माला आला मात्र त्यांनी देखील ५९वा वर्धापनदिन साजरा केला. कारण खरी शिवसेना(Shiv Sena) आपलीच आहे या मुद्यावर ते ठाम असून सध्या त्यांना निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे वरळीत या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी संबोधित केले.मात्र त्यांच्या भाषणात तोच तोचपणा साचलेपणा अडिचवर्षा पासूनचे जुनेच मुद्दे असल्याचे दिसले. मात्र नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाच्या कामगिरीवर जावून आलेल्या दोन खासदारांच्या कामगिरीवर शिंदे सेनेकडून या मेळाव्यात भर देण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जिंकण्याचे आव्हान असल्याने शिंदे यांच्याकडून कार्यकर्ते आमदार पदाधिकारी यांची बैठक देखील घेण्यात आली. थोडक्यात रणशिंग फुंकण्यात आले आहे.

तर षण्मुखानंद सभागृहात झालेल्या सभेला सभागृहात मावणार नाही अशी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी खास शैलीत शेलक्या शब्दात नेहमीप्रमाणे भाषण केले. मात्र शेवटी त्यांनी फिल्मी पध्दतीने ‘कम ऑन किल मी’ हा नाना पाटेकर(Nana Patekar) यांच्या प्रहार सिनेमातील गाजलेला डायलॉग म्हटल्याने त्याबद्दल सभा संपल्यावर अस्वस्थ चर्चा पहायला मिळाली. या सभेनंतर तासाभरातच शिंदे यांच्या सभेत ठाकरेंना पुन्हा फिल्मी पध्दतीनेच ‘मरे हुवे को क्या मारना’ असा जबाब मिळाला त्यामुळे मग पुन्हा या दोन्ही सेनाप्रमुखांच्या वक्तव्यांची चर्चा होत राहिली. मात्र दोनच दिवसांत मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा (Amit Shah)आले आणि त्यांनी राजकीय सभा नसतानाही पुन्हा उध्दव ठाकरे यांना डिवचण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेला असली सेना म्हणत मुंबईच्या निवडणूक प्रचाराचा नारळच फोडला.

नव्या पिढीचे दोन ठाकरेबंधू एकत्र येण्याची शक्यता
त्यानंतरही ठाकरे यांच्या सभेत मनसे सोबत जाण्याबाबत केलेल्या सकारात्मक वक्तव्यांवर मनसेच्या प्रवक्त्यांची टिका टिपणी होत राहिली आहे. हे दोन भाऊ एकत्र येणार किंवा नाही उध्दव ठाकरे सकारात्मक आहेत तर प्रस्ताव का देत नाहीत वगैरे आता बोलण्यात येत आहे. मात्र मागील चार वर्षापासून सत्ताधारी पक्ष केवळ मुंबईतून उध्दव ठाकरेंची सत्ता घालविण्यासाठी नको तो राजकीय प्रपंच करुन बसली असताना आता ठाकरे बंधुना एकत्र येवू देण्याची चूक भाजप होवू देणार नाही हे फडणवीस राज ठाकरे भेटीने स्पष्ट झाले आहे.

अमीत – आदित्य ठाकरेच्या खांद्यावर मुंबई निवडणूकीची जबाबदारी?
आतल्या गोटात मात्र शरद पवार(Sharad Pawar) यांनी जसे एकत्र यावे किंवा नाही याचा निर्णय तरुण पिढीकडे सोपवला तसाच प्रकार मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरेबंधूनी केला तर तो मोठा गनिमीकावाच ठरण्याची शक्यता आहे. जाणकार सूत्रांच्या मते अगदी शेवटच्या क्षणी अमीत आणि आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या खांद्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपवली जाईल आणि नव्या पिढीचे दोन ठाकरेबंधू एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी याच पध्दतीने राष्ट्रवादीने आता दादा-ताईंच्या मध्ये मनोमिलनावर जसे काही निर्णय सोपवले आहेत तसे झाले तर भाजप आणि अन्य राजकीय पक्षांना तो धोबीपछाड असेल. मुंबईचे राजकारण, मुंबई महापालिकेचे अर्थकारण मग ठाकरेंच्या घराण्याकडेच राहिल यात शंका नाही. कारण महाविकास आघाडीतील किंवा महायुतीच्या अन्य पक्षांना हा मोठा धक्का असेल शिंदे यांची उसनी शक्ती मग काम करु शकेल असे नाही आणि भाजप कॉंग्रेस वगैरे पूर्णत: अलग पडण्याची शक्यता आहे. मराठी माणसांची एकगठ्ठा ५६टक्के आणि मुस्लिम व अन्य समाजांची चार पाच टक्के मते या नव्या समिकरणाला सहज मिळू शकतात असे या सू्त्रांनी सांगितले. उध्दव ठाकरे या निमित्ताने राजकीय संन्यास घेतील की नाही? राज ठाकरे यांच्याकडून हा निर्णय़ घेताना भाजपचा दबाव तर येणारच त्यावर ते काय करतील? शिंदे, कॉंग्रेस इत्यादी पक्ष काय भुमिका घेतील? या सा-या गोष्टीना थारा नसेल कारण अगदी शेवटच्या क्षणी हा गनिमीकावा खेळला जाण्याची शक्यता आहे. उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील आत्मविश्वासाला ‘कम ऑन किल मी’ ला बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या सभेत जसे माझ्या उद्धव आदित्यला सांभाळा अशी आर्त साद होती तशीच किनार आहे. विरोधकांना आणो मनसे प्रमुखांनाही ते तुम्हाला मी नकोच आहे तर बाजुला होतो म्हणू शकतात? त्यानंतर आदित्यला धुरा सोपवून अमित सोबत मनसे त्यांच्यासोबत येवू शकते यात राजकारणासोबतच कौटुंबिक मनोमिलनाचा नवा अध्याय असेल असेही राजकीय सूत्रांचे मत आहे. याच राजकीय संदर्भाने सारी तयारी केली जात आहे असे या सूत्रांचे मत आहे! पाहूया घोडा मैदान दूर नही! तुर्तास इतकेच!!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
