विधानसभा समालोचन दि ६ मार्च

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहातील चौथ्या दिवशी विधानसभेत दि ६ मार्च २०२५ च्या कामकाज पत्रिकेत प्रश्नोत्तरे लक्षवेधी इत्यादी महत्वाचे कामकाज होते. या शिवाय सन २०२४-२५ या वर्षाच्या सुमारे सहा हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्यांवरील सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालविकास या महत्वाच्या विभागांच्या मागण्यांवर च्रर्चा आणि मतदानाचा पहिला दिवस होता. या शिवाय विधानसभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लयभारी यूट्यूब वाहिनी तसेच दै सामना चे कार्यकारी संपादक खा संजय राऊत आणि विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगांची सूचना मांडली.हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल.

सकाळी अकरा वाजता प्रश्नोत्तरांच्या तासाने कामकाजाची सुरूवात झाली. रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षापासून पुनर्वसन झाले नसल्याबाबत रविशेठ पाटील आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मकरंद जाधव पाटील यांनीपुनर्वसन करण्याबाबत अंतिम कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्याशिवाय बाळगंगा प्रकल्पातील आंदोलकांवरील गंभीर गुन्ह्याव्यतिरिक्त अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत बाबासाहेब देशमुख यांचा तारांकीत प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यानी या योजनेचा लाभ नगरपंचायत तसेच महापालिका क्षेत्रातील शेतक-यांना देण्यात येत नसल्याचे सांगितले. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रात योजनेचा लाभ दिला जातो. त्या अंतर्गत आतापर्यंत ३२ ८३२ शेतक-यांना ४२४.८२ कोटी रूपयाचे अनुदान देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात धान व कापूस पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे नुकसान झाल्याचे मान्य केले. याबाबत पाहणी करण्यात आली असून ५० टक्के अनुदानीत किटनाशके पुरविण्यात आली असून किड नियंत्रण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात आदिवासी वाड्यांतील नागरीकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याबाबत मंगेश कुडाळकर, अनंत (बाळा) नर आदी सदस्यांचा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी सहा तालुक्यातील १३४ गावांमध्ये आदिवासी उपयोजना राबविली जात असल्याचे सांगितले. सन २०-२१ ते २४-२५ या कालावधीमध्ये २२२ गावांमध्ये २५७ कामे मंजूर करण्यात आली असून त्यासाठी ९१४.५१लाख रूपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील मच्छिमार बांधवाच्या सोसायट्याना डिझेल परताव्याची रक्कम मिळाली नसल्याबाबत प्रशांत ठाकूर, महेश बालदी, यांच्या प्रश्नाला बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की डिझेलच्या मुल्यवर्धित कराची १२६ कोटी रूपयाचा निधी वितरीत करण्यात आली. ३१ डिसें २४ रोजी पर्यंत मुल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती होत असल्याचे ते म्हणाले.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे कामकाज पुकारण्यात आले त्यात राज्य बियाणे महामंडळाचा सन २३-२४ या वर्षाचा वार्षिक अहवाल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडला. त्यानंतर शुक्रवार दि ७ मार्च रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा करण्यात आली.

त्यानंतर लयभारी यूट्यूब वाहिनी तसेच दै सामना चे कार्यकारी संपादक खा संजय राऊत आणि विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगांची सूचना मांडली. ते म्हणाले की. ज्या प्रकरणात माझी दोन वर्षापूर्वी निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याचा संदर्भ देवून माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने हक्कभंग दाखल करून घेण्यात यावा अशी सूचना केली. त्यानंतर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ही हक्कभंग सूचना स्विकारण्यात आली असल्याचे सांगत प्रकरण समितीकडे चौकशी आणि कार्यवाहीसाठी पाठविण्याची घोषणा केली.

त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रा स्व संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथे एका कार्यक्रमा दरम्यान मुंबईत मराठी भाषा आलीच पाहिजे असे नाही असे वक्तव्य केल्याबाबत आक्षेप घेतला. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यानी सरकारची भुमिका स्पष्ट करायला हवी असे ते म्हणाले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भय्याजी जोशी यांनी नेमके काय वक्तव्य केले त्याबद्दल आपण माहिती घेवू मात्र राज्य सरकारची महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषा अनिवार्य असल्याची पूर्वी पासून भुमिका आहे आणि तीच कायम राहणार असल्याचा निर्वाळा दिला.

यावेळी विरोधीबाकावरील सदस्यांनी आग्रही भुमिका घेत मराठी भाषेच्या समर्थनार्थ प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मंत्री नितेश राणे यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी दोन्ही बाजुच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभागृहात गदारोळ झाला. तेंव्हा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब कैले.

सभागृहाच्या कामकाज पत्रिकेतील क्रमानुसार त्यानंतर लक्षवेधी सूचनांचे कामकाज पुकारण्यात आले.  ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा या भागातील पिण्याच्या अपु-या आणि अशुध्द पाणीपुरवठ्याबाबत जितेंद्र आव्हाड आणि अन्य सदस्यंच्या प्रश्नावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यानी या भागात ६३ एम एलडी पाण्याचा पुरवठा केला जात असून अजून दहा एम एलडी पाण्याची गरज असल्याचे सांगितले. या करीता महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात समन्वय साधला जात असून नविन जलकुंभाचे काम सुरू करण्यात येत आहे त्यानंतर याभागाचा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी ठाणे शहाराच्या पाणी पुरवठ्या बाबत ही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा मांडला त्यावर शिंदे यानी काळू नदीवर नवे धरण बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून भविष्यात शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी शंभर एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी योजना असल्याचे सांगितले.

मुंबईच्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत अमीन पटेल आणि अन्य सदस्यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत६७ पैकी ३० प्रस्तावाना  नाहरकत देण्यात आल्याची माहिती दिली. मात्र जयंत पाटील यांनी यावेळी खात्याच्या मूळ मंत्र्याकडून याबाबतच्या प्रश्नाला न्याय दिला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की या विभागाचा अतिरिक्त भार आपण किती दिवस सांभाळणार आणि त्यातून न्याय कसा मिळणार? त्यावर देसाई यांनी याबाबत आपल्या उत्तराने समाधान झाले नाही तर अध्यक्ष निदेश देतील त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत तयारी असल्याचे सांगितले. या इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी महिन्याभरात प्रधान सचिवांच्या स्तरावर बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे ते म्हणाले. सुनील शेळके यानी पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे इंद्रायणी विद्यामंदीर संस्थेबाबतचा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात तपासून कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक असल्याचे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेशखर बावनकुळे यानी दिले.

स सून रुग्णालयातील सेवा सुविधाबाबत सुनिल कांबळे आणि अन्य सदस्यांच्या लक्षवेधीवर आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यानी उत्तर दिले. या रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यानी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दुष्काळी चारा छावण्याचे अनुदान गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रलंबित अल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यानी तातडीने अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेवून प्रलंबित अनुदानाची रक्कम देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मुख्यसचिवांच्या मार्फत या प्रकरणातील विलंबाची देखील चौकशी करण्याचे आश्वासन त्यानी सदस्यांच्या उप प्रश्नाला उत्तर देताना दिले.

ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या राज्यभरातील खातेधारकांच्या ठेवींचे रक्षन करण्याबाबत ब बनराव लोणीकर आणि अन्य सदस्याच्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यानी या प्रकरणाबाबत बैठक घेवून ठेवीदाराना त्यांच्या ठेवी सुरक्षीतपणे परत देण्याबाबत उपाय योजना केली जाईल.

लक्षवेधी नंतर सभागृहाच्या कामकाजातील सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पुकारण्यात आली. श्रीमती सुलभा खोडके, दिलीप लांडे, संजना जाधव आदी सदस्यानी यावेळी चर्चेत आपल्या मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नावर भाष्य केले. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सभागृहात पुरवणी मागण्यांवरील चर्चा सुरू होती.

किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
https://www.sanvadmedia.com/assembly-commentary/
Social Media