विधानसभेत गॅस टंचाईचा मुद्दा गाजला; मध्यरात्रीपर्यंत कामकाज, कँटीन बंद

The-issue-of-gas-scarcity : विधानसभेत गॅस टंचाईचा मुद्दा गाजला; मध्यरात्रीपर्यंत कामकाज, कँटीन बंद

मुंबई :महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज काल उशिरापर्यंत सुरू राहिले असून रात्री साधारण १.१५ ते १.२० वाजेपर्यंत सभागृहात चर्चा सुरू होती. मात्र इतक्या उशिरापर्यंत कामकाज सुरू असताना विधानभवनातील कँटीन बंद असल्याने उपस्थित आमदार आणि कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कँटीन सेवा बंद ठेवावी लागल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. राज्यात घरगुती गॅसचा (Domestic-gas)तुटवडा वाढत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. (The-issue-of-gas-scarcity)

वडेट्टीवार म्हणाले की, काल विधानसभेचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू असताना कँटीन बंद होते आणि परिसरातील अनेक हॉटेल्सही गॅसअभावी बंद होती. त्यामुळे आमदार, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना अडचणींचा सामना करावा लागला. मुंबई आणि नागपूरमध्ये जवळपास ३० टक्के हॉटेल्स गॅस टंचाईमुळे बंद असल्याची माहिती त्यांनी दिली.

गॅसच्या तुटवड्यामुळे काळाबाजार वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच काल एचपीसी कंपनीच्या सुमारे १८ लाख रुपयांच्या सिलिंडरने भरलेल्या ट्रकची चोरी झाल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

Social Media