मंकी बात – ७

‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. . .  असे ते वागणार नाहीत?

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या बऱ्याच वर्षानंतर झालेल्या निवडणूकांचा धुरळा आता संपल्यासारखं वाटत असतानाच १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूकांसाठी ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय जोरबैठका सुरू झाल्या आहेत. या साऱ्या निवडणूक राजकारणाच्या कोलाहलात अग्रभागी असलेल्या निवडणूक पक्ष म्हटला जाणाऱ्या ‘ट्रिपल सत्ताधारी’ भारतीय जनता पक्षामध्ये फार महत्वाची घटना घडली आहे. ती म्हणजे नागपुर पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय असणारे संदिप जोशी(Sandip Joshi) यांनी प्रकटपणे सध्याच्या राजकारणाचा वीट आल्याचे सांगत त्यापासून वेगळे होण्यासाठी सविनय निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.

Sandip-Joshi

आदर्श कार्यकर्त्याच्या मनातील तगमग नेमक्या शब्दात

हे पत्र म्हणजे काही महिन्यांपूर्वी भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी प्रवक्ता माधव भंडारी यांच्या सूपूत्राने जशी पक्षातील निष्ठावंताच्या मनातील सल जाहीरपणे व्यक्त केली होती त्याचीच पुनरावृत्ती म्हटली पाहिजे. पण यावेळी हे पत्र रा.स्व.संघाच्या कर्मभुमीतल्या आणि विद्यमान मुख्यमंत्र्याच्या वडिलांनी ज्या मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व केले त्या विधानपरिषदेच्या जागेवरील अगदी जवळचे मित्र आणि सहकारी असलेल्या व्यक्तीचे मनोगत आहे. ज्या जागेवर स्व. गंगाधरराव फडणवीस यांनी नागपूरातून जुन्या काळात पक्षाचे प्रतिनीधीत्व केले, त्यानंतर विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी सलग १८ वर्ष ज्या मतदारसंघातून राज्याचे विधीमंडळात विरोधीपक्षनेते आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महत्वाची कामगिरी केली तेच हे विधानपरिषदेचे पद आहे. या पदावर जोशी यांचा कार्यकाळ मे२०२६मध्ये पूर्ण होणार आहे, त्यानंतर पक्षांने संधी दिली तरी आपणांस ती नको असे सांगत जोशी यांनी आपल्या मनातील विचारांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या संघनिष्ठ, ध्येयवादी आणि साधनशुचित्वाच्या आदर्श कार्यकर्त्याच्या मनातील तगमग नेमक्या शब्दात मात्र काहीश्या मर्यादेत किंवा अपूर्णरित्या बाहेर पडली आहे असे स्पष्ट होते.

Sandip-Joshi

या पत्रात जोशी यांनी काय लिहिले आहे, ते जाणून घेवूया, ते लिहितात – – – …….आता मला थांबायचंय !

 

…….आता मला थांबायचंय !

 

वि. प. सदस्य संदीप जोशी यांचे भावनिक पत्र 

 

नमस्कार,

हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे.

मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व मा. ना. नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.

माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन.

राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो.

राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली. हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरू राहील.

कोरोनाच्या काळात एकल पालकत्त्व नशिबी आलेल्या बहिणींसाठीचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, मोहगाव झिल्पी येथील गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे सामाजिक प्रकल्प, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन, खासदार क्रीडा महोत्सव या क्रीडा क्षेत्रातील विविध पदांना न्याय देईन, तरुण खेळाडूंसोबत उभा राहून त्यांना प्रोत्साहन देईन.

काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच राहतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि तोच निर्णय आज मी घेतला आहे.

कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले. मला घडवले. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत राजकारणात अनेक संधी दिल्या. या सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत सन्मान दिला. याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शीर्षस्थ नेतृत्वाचा कायम ऋणी राहीन.

राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो. मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच अधिक काही न बोलता, आज मी हा निर्णय घेत आहे.

 

शेवटी एवढेच…

कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ,

शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ।

किसी और की राह रोशन हो सके,

इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।

 

आता मी थांबतोय…!

 

धन्यवाद मित्रांनो…!

 

आपलाच,

आ. संदीप जोशी

सदस्य, विधान परिषद (महाराष्ट्र)

 

Nitin-Gadkari-Fadnavis

ही असंख्य कार्यकर्त्यांची मनोवेदना

संदिप जोशी(Sandip Joshi) विधानपरिषद सदस्य यांच्या या पत्राच्या शेवटच्या काही ओळींवरून ते मनातून दुखावले असल्याचे स्पष्टपणे जाणवते. निष्ठावंत सुसंस्कारीत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या या निर्णयाकडे पाहिले जात असले तरी हा सविनय बंडाचा प्रयत्नच म्हणावा लागेल. त्यांच्या मनातील वेदना ही भाजप आणि संघविचारांच्या असंख्य कार्यकर्त्यांची मनोवेदना आहे. जी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना अनेक जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याकडे खाजगीत व्यक्त होत असते.

आ.संदिप जोशी यांच्या या पत्राचा गोषवारा पाहिला तर भाजपचे ज्येष्ठ नेते ज्या प्रकारचे राजकारण सध्या करत आहेत त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याची घुसमट होत असल्याचे स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले आहे, बाहेरून येवून कोणतेही तत्व विचारधारा नसलेल्यांना पक्षांत महत्वाची पदे संधी आणि जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत, ही अनेक जुन्या कार्यकर्त्याची खंत आहे. जोशी यांच्या या पत्रानंतर भाजप आणि सत्ताधारी बाजूच्या नेत्यांकडून नेहमीप्रमाणे सोयीस्कर मौन आणि अनुल्लेखाचे तंत्र वापरले जाणे स्वाभाविक आहे. समूह माध्यमातूनही सत्ताकांक्षी भाजपचा हजार हातांचा ऑक्टोपस किंवा सत्तेचा अश्वमेध घोडा चौखूर सुटला आहे त्यात तो आपल्याच वैचारिक वारश्याला आणि जुन्या कार्यकर्त्याना चिरडून पुढे निघाल्याचे दाखवले जात आहे. हे पत्र ही त्याचेच प्रतिक म्हणायला हवे.?

आ. जोशी यांच्या या पत्राचे टायमिंग हा देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिला आहे. निवडणूक निकाल लागले त्यानंतर १७ तारखेला मुख्यमंत्री दावोसला रवाना झाले. त्यानंतर हे पत्र जाहीर झाले, त्यावर खुद्द मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया त्यामुळे माध्यमांना घेता आली नाहीच. सगळीकडे अनेक महापालिकांच्या महापौरपदाच्या राजकारणाचा गवगवा होत असतानाच जोशी यांचे पत्र माध्यमांतून बातमीचा विषय झाले मात्र त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. आ. जोशी यांना अपेक्षीत काही निर्णय घेतले गेले नसल्याने ते नाराज झाल्याचे त्यांनंतर राजकीय वर्तुळात सांगण्यात येत होते. तर फडणवीस यांच्यासाठी व्यक्तिगत कामे पाहण्यासाठीच जोशी यांना ‘सीआरएस’ देण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा कुजबूज आघाडीवर केली जात आहे.

Sandip-Joshi

सर्वच निष्ठावंतानी सविनय बंडाचा झेंडा उभारला तर?

काही असो पण दुसरीकडे गेल्या काही वर्षांचा फडणवीस आणि त्यांच्यासोबत२०१४ पासून काम करणाऱ्या अगदी स्विय सहाय्यकांनी राजकारणात प्रगती केल्याचे पहायला मिळाले आहे. या आ. जोशी यांच्या पत्रानंतर काही जाणकार सूत्रांशी बोलताना सांगण्यात आले की, २०१४ मध्ये फडणवीस यांच्या कार्यालयात त्यांचे स्विय सहायक असलेले अभिमन्यू पवार, सुमित वानखेडे, श्रीकांत भारतीय यांची राजकारणात प्रगती झाली. तिघेही आमदार झाले. तर नागपूरात फडणवीसांच्या निकटवर्तुळात असल्यानेच जोशी यांना महापौरपद आणि त्यानंतर लगोलग आमदारकी मिळाली होती. तर विश्वास पाठक यांच्यासारख्यांना देखील फडणवीस यांच्या नेतृत्वात महत्वाची पदे आणि जबाबदारी मिळाल्याचे पहायला मिळत आहे. हा प्रवास अगदी अलिकडेच पक्षात पत्रकारिता सोडून माध्यमप्रमुख म्हणून कार्यरत झालेल्या नवनाथ बन यांच्यापर्यंत सांगता येतो. बन नुकतेच मुंबईत नगरसेवक देखील झाले आहेत मग आता नेमके आ. जोशी यांच्या राजकीय विकासाचे घोडे आडले कुठे आणि कुणामुळे? राजकीय आघाडीवर या साऱ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री दावोस(Davos) वरून आल्यानंतर यामध्ये नव्याने काही घडण्याची शक्यता आहे, पण भारतीय जनता पक्षांत मोठ्या प्रमाणात नाराज असलेल्या सर्वच निष्ठावंतानी असा सविनय बंडाचा झेंडा उभारला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किंवा जिल्हा तालुका महापालिका आणि सर्वत्र असंख्य संदीप जोशींची अगणित संख्या  असल्याचे दिसून येवू शकते. भाजप श्रेष्ठींना याची कल्पना नाही असे म्हणता येणार नाही. मात्र सुरेश भट यांच्याच नागपूरात हा नाराजीचा स्वर उमटला आहे तरी राज्यभर आणि देशातही सध्या ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ म्हणत प्रवाहपतित झालेल्या कार्यकर्त्यांना पक्षादेश आणि पक्षाची शिस्त सर्वोपरी मानली पाहिजे! त्यांच्या मनात मात्र ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ असा विचार येवूनही ते तसे वागणार नाहीत. सध्यातरी भाजपमध्ये तेच सुरू आहे! तुर्तास इतकेच.

 

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

 

हेही वाचा – मंकी बात – ६… जो जिता वो सिकंदर! भाजप नेते धुरंधर!? मग लोकशाहीच्या दगा-फटक्याच्या खेळाचे ‘रहेमान डकैत’ कोण?

Social Media