मंकी बात…

वोटचोरी आणि एसआयआर मुद्यावर देशात रान पेटले! सत्ताधारी एनडीए सरकार संकटात?

Uttamrao-Jankar

देशात सध्या वोटचोरी आणि एसआयआर(SIR)च्या मुद्यावरून विरोधीपक्षनेते राहूल गांधी(Rahul Gandhi) यांनी रान उठवले आहे. महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर(Uttamrao Jankar) यांनी मतदान केंद्रातील बोगस मतदारयाद्या आणि सायंकाळी पाच नंतरच्या वाढीव मतदानाच्या गैरप्रकारांवर वर्षभरापासून आवाज उठवला होता. त्यात आता राहूल गांधी यांच्या चळवळीमुळे नवी जान आली आहे. राज्यात सुमारे ९६ विधानसभा मतदारसंघात चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. ‘योगायोग’ किंवा ‘आश्चर्याची बाब’ म्हणजे या सा-या मतदारसंघात बहुसंख्य ठिकाणी महायुतीच्या पक्षांचा विजय झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि कॉंग्रेसच्या नेत्यांकडूनही राष्ट्रवादी (शप)च्या सूरात सूर मिसळला जात आहे.

Rahul-Gandhi

मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण गोत्यात?

बिहारच्या ६५लाख मतदारांच्या मतदानाचा अधिकार एसआयआर(SIR) मुळे हिरावून गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून आधारपत्राचा पुरावा असलेल्या मात्र यादीत नाव नसलेल्यांना आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या साऱ्या कवायतीला काहीच अर्थ राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण देशात देखील मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा मानस आहे. त्यामध्ये सन २०२४मध्ये देखील मतदानात सहभागी झालेल्या अनेक मतदारांचा मतदानाचा हक्क बिहारच्या ६५लाख अपात्र मतदारांच्या यादीतून काढून घेण्यात आला होता. त्यामध्ये देखील राहूल गांधी(Rahul Gandhi) यांच्या दाव्यानुसार दुबार तिबार नावे असलेले, स्थलांतरित, मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नावांचा समावेश असल्याचा दावा आयोगाकडून करण्यात आला होता. मात्र सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव(Yogendra Yadav) यांनी न्यायालयातच ६५ लाखांमध्ये आयोगाकडून मृत झाल्याने मतदानाचा हक्क हिरावून घेतलेल्या मतदारांना पुराव्यासह हजर केल्यानंतर या नव्या सखोल मतदार  पूर्नपरिक्षणाचा दावा फोल असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच प्रकारची कवायत देशभरात येत्या काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या राज्यात घेण्याचा आयोगाचा मानस सर्वोच्च न्यायालयातील निर्णयाने वादात सापडला आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पक्षाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू(Chandrababu Naidu) यांनी तर आयोगाला पत्र पाठवून आंध्र प्रदेशामध्ये अश्या प्रकारची मतदार याद्यांची सखोल पडताळणी करण्याचा इरादा मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू या येत्या काळात निवडणूका असलेल्या अन्य राज्यातूनही एसआयआर (SIR) ला विरोध केला जात आहे. त्यामुळे मतदार यांद्यावरुन वोटचोरीच्या मुद्याला आता राष्ट्रीय आंदोलनाचे स्वरुप आले आहे.

Thackeray-Bandhu

रंगीत तालिम बेस्ट मतदानात ठाकरे ब्रँण्ड फुस्स?

त्यातच मुंबईत मात्र बेस्ट कर्मचारी क्लबच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि घटकपक्षांच्या बाजूने कौल मिळाला असून मुंबईत सेना मनसेच्या एकत्रित ठाकरे ब्रँण्डला अपेक्षीत प्रतिसाद मिऴाला नसल्याचे समोर आले आहे. गंमत म्हणजे या निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मुंबईमध्ये एकत्रित ठाकरेंच्या ब्रँण्डच्या जादूची हवा नसल्याचे का दिसले याचा शोध घेतला जात आहे. येत्या तीन चार महिन्यानंतर होवू घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सेना मनसे ठाकरे ब्रँण्डचे भविष्य काय असेल याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबईत बेस्ट कामगारांमध्ये शरद राव यांचे सुपूत्र शशांक यांच्या युनीयन सह महायुतीच्या शिंदे सेना आणि भाजपच्या युनियन आहेत. त्यात मनसे आणि सेना ठाकरेंच्या एकत्रित आल्यानंतर अपेक्षीत परिणाम जाणवला नाही कारण ही लढत एकास एक अशी न होता तिरंगी झाल्यामुळे वोट कटवा असलेल्या दोघांत तिसरा असलेल्या गटाला पर्यायी मते मिळाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या या मतदानाच्या जुगलबंदीची रंगीत तालिम म्हणून या बेस्ट मतदानाकडे पाहिले जात आहे.

सरत्या सप्ताहात राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्य सरकारने सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतीच्या नुकसानीचेही तातडीने पंचनामे करावेत आणि एनडीआरएफ(NDRF)च्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
flood

६५ ते ७० टक्के खरिपपिकांना अतिवृष्टी – पूराचा फटका?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीतही राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. राज्यातील सुमारे १२ ते १४ लाख एकरवरील पिकांना फटका बसल्याची माहिती प्रथमदर्शनी हाती आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे खरीप पिकांच्या सुमारे ६५ ते ७० टक्के पिकांना या अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसला आहे. राज्यातील बळीराजासाठी या अतिवृष्टीमुळे अस्मानी सुल्तानी अशी स्थिती आहे. कारण तीन ते चार दिवस पावसाचा जोर ओसरला नाही, पिकविम्याच्या निकषांमध्ये या पूरस्थितीमध्ये मदत नगण्य प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेचे आणि समन्वयाचे निर्देश देण्यात आले. त्या निकषांनुसार केंद्र आणि राज्य सरकारकडूनही काही तुटपूंजी मदत मिळण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना काही मदतीचे पॅकेज जाहीर केली जाण्याची शक्यता असली तरी आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी अशी त्यांची स्थिती असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.

वेधशाळांकडून मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने राज्यातील नागरिकांना पावसाबाबत दर तीन तासांनी सतर्कतेचे (अलर्ट) देण्यात येत होते. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यातील सर्व आपत्ती नियंत्रण कक्षांना दक्ष राहण्याचे आणि माहितीचे अदान-प्रदानाबाबत समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले.

Anna-Hajare
या साऱ्यामध्ये संगमनेर येथे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांच्याकडून वारकरी संप्रदायाच्या संग्राम भांडारे या किर्तनकारांच्या वारकरी किर्तन परंपरेला धाकदपटशा आणि झुंडशाहीने धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या प्रकरणाने नवा वादंग माजला. त्यावर आता थोरात यांच्याकडून पुराव्यासहीत प्रतिवाद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे(Anna Hazare) यांच्यावर सरकारकडून पाळत ठेवली जात असून हजारे भाजपच्या नजरकैदेत असल्याचा खळबळजनक दावा करत शिवराम पाटील या त्यांच्या सहकाऱ्यांकडून आरोप करण्यात आले आहेत. देशात सध्या मतदानचोरी(VoteChori) सारख्या विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सिटिझन फोरमचे आघाडीचे नेते असलेल्या अण्णा हजारे यांचे मौन लोकशाहीच्या रक्षणासाठी चिंताजनक असल्याचा सूर उमटला असताना हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सातत्याने नवनव्या विषयांवर वाद्ंगाचे तरंग उमटताना दिसत आहेत.

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

Social Media