मतदान: आपल्याच हाती पुढील पाच वर्षांच्या जीवनाचे फर्मान!
तरचं जिवाची मुंबई आणि मुंबईचा जीव वाचेल. . .?
मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची दुसरी लंका. . पठ्ठे बापूराव यांच्याकडून करण्यात आलेले हे वर्णन सध्या निवडणूकांमध्ये जो खर्चाचा ‘दौलतजादा’ केला जात आहे त्यावरून नकारात्मक अर्थाने समोर आला आहे.गेल्या तीन वर्षापासून लांबविलेल्या या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांतल्या शिवसेना(Shiv Sena) आणि विरोधातल्या सेना विरुध्द असा सामना रंगला आहे,मुंबईच्या मराठीपणावर हा हल्ला आहे का? अन्य भाषिक प्रांतिकाकडून ‘मुंबईची लांडगेतोड’ करण्याचा हा डाव आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे.त्यासाठी पुढील काही दिवस अनेक अंगाने प्रचार केला जाणार आहे. त्याचा साकल्याने ऊहापोह या मालिकेत करूया!

‘बदल्याच्या राजकारणाचा शेवटचा अध्याय?’
अखेर होणार होणार म्हणता म्हणता मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणूकांची घोषणा झाली. २०१९नंतर राज्यात बदललेल्या‘बदल्याच्या राजकारणाचा शेवटचा अध्याय’ त्यामुळे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची महापालिकेची सत्ता २०१७मध्ये साम-दाम-दंड-भेद नितीवापरत भाजपने ३२ वरुन ८४ इतके संख्याबळ मिळवूनही उलथवता आली नव्हती,पुरेसे संख्याबळ मिळवूनही महापालिकेच्या सत्तेवर दावा सांगितला नव्हता. कारण राज्याच्या सत्तेवर शिवसेना भाजप युती होती,भाजपला ‘मुंबई की महाराष्ट्र’? असा पेच होता शिवसेनेच्या संख्याबळाच्या बळावर मुंबईसाठी राज्याची सत्ता त्यांना हातून गमवायची नव्हती त्यामुळेच ते चौकीदारच्या भुमिकेत राहिले होते.त्यानंतर शिवसेना भाजपमध्ये कटुता वाढत राहिली आणि शिवसेनेने २०१९च्या विधानसभेनंतर अनपेक्षीत ‘महाआघाडी’करत भाजपचे जोखड फेकून दिले. मग अडिच वर्ष विरोधात बसलेल्या भाजपने ठाकरेंच्या या ‘बेधडक’ राजकारणाला काटशहदेण्यासाठी आक्रमक विरोधाचे राजकारण केले. इतके की कोविडच्या काळात महापालिकेने केलेल्या कामांची चौकशी यंत्रणामार्फत नंतर करण्यात आली.

‘दिन दहाडे’ ‘रहमान डकैतचा’ कार्यक्रम?
शिवसेनेचा एक गट फोडून त्यांची राज्यातील सत्ता उलथवून जुलै २०२२मध्ये शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देवून सत्ता काबिज केल्यानंतर गेली सुमारे तीन वर्ष मुंबई सारख्या सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीला प्रशासकराजचे ‘वेटोळे’ घालून ‘वाटोळे’ करण्याचा घाट घालताना शिंदे यांच्या हाती मुख्यमंत्री पदासोबतच मुंबईचा कारभार देण्यात आला. मागील तीन वर्षापासून मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील ठेवींवर आणि त्या नंतर मोक्याच्या भुखंडावर डोळा ठेवून जो ‘दिन दहाडे’ ‘रहमान डकैतचा’ कार्यक्रम झाला असे ठाकरे गटाच्या नेत्याने सांगितले. मात्र तो आता निवडणूकानंतर बंद तर होणार नाही ना? या भितीने भाजप आणि सत्तेत असलेल्या त्यांच्या दोन मित्रपक्षांच्या सरकारला कापरे भरले आहे. असे त्यांचे मत आहे!

न्यायालयाच्या आधीन राहून निवडणूकांचा कार्यक्रम
त्यानंतर निवडणूका(Municipal-elections) होणार किंवा नाही असा पेच तीन वर्ष सुरू होता. ठाकरेंनी बदललेल्या प्रभाग रचनांवर कोर्टबाजी झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वेळकाढूपणा करण्यात आला. मात्र न्यायालयांच्या दट्ट्यानंतर आता निवडणूक आयोगाने निवडणूकांचा कार्यक्रम घाईने जाहीर केल्यानंतर बोगस मतदारयाद्यांचा विषय ऐरणीवर आला, हा विषय निवडणुकांचा मुद्दा बनण्याची शक्यता लक्षात घेवून मग घाईने या निवडणूकांची घोषणा केल्यानंतर हा मुद्दा आता मागे पडला आहे, त्यामुळे राज्यातील वोटचोरीची पोलखोल होणार नाही याची काळजी सत्ताधा-यांनी घेतल्याचे मानले जात आहे. तर न्यायालयाच्या आधीन राहून या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे हे यातील ‘ग्यानबाची मेख’ असणारे सत्य आहे! कारण तीन वर्ष लोकनियुक्त प्रतिनीधींची निवडणुकच होवू न देता या सर्वात श्रीमंत महापालिकेसह एकूणच नगरांचा कारभार हाकला जात होता. त्यात नगरविकास विभाग एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे असल्याने एकहाती सत्ता आणि कारभार करण्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष भाजपला अडचणी येत होत्या. त्यामुळे थेट नगराध्यक्षांच्या निवडणूका घेत जास्तीत जास्त नगरांवर आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्याचा वरचष्मा ठेवण्यासाठी निवडणूकांचा घाट घालण्यात आला असे मंत्रालयातील उच्चपदस्थांचे मत आहे. त्यात तथ्य असेल किंवा नसेल पण पहिल्या टप्यात ज्या नगरपालिकाच्या निवडणूका झाल्या त्यात शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुसक्या आवळण्याचा अटोकाट प्रयत्न सत्ताधारी महायुतीमध्ये झाल्याचे स्पष्टच दिसले आहे.

शिंदेनी दिल्लीत जोर लावल्याने भाजपचे ‘अगं अगं म्हशी. .?’
महायुतीच्या घटकपक्षांसोबत युती करायची की नाही? यावरून आधी संभ्रम तयार करण्यात आला त्यानंतर शिंदे यांनी दिल्लीतून जोर लावल्यानंतर नाईलाजाने ‘अगं अगं म्हशी. .’ म्हणतात तसे भाजप प्रदेशाध्यक्ष शिंदेच्या भेटीला शेवटच्या क्षणी गेले, त्यातही त्यांनी स्थानिक नेत्यांच्या पातळीवर युतीबाबत चर्चा करण्यास सहमती असल्याचे सांगत प्रत्यक्षात शिंदे यांच्या सोबत जात असल्याचे भासवले तरी अनेक ठिकाणी भाजप विरुध्द शिंदे सेना असा सामना असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नुकत्याच हाती आलेल्या नगरपालिका निवडणूकांच्या निकालातही भाजपच्या खालोखाल शिंदेंच्या शिवसेनेकडे जास्तीत जास्त नगरपालिकांचा कारभार गेल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे आता मोठ्या नगरामध्ये त्यांना कमीत कमी जागा देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचे कारण भाजपच्या स्थानिक नेत्याची इच्छा नसतानाही शिंदे यांनी त्यांना युतीची बोलणी करण्यासाठी भाग पाडल्याची सल त्यांच्या मनात असावी जाणकार सूत्रांचे मत आहे.

मुंबई(Mumbai) वगळता अन्य महापालिकांमध्ये बहुसदस्य पध्दत असल्याने युतीचे वाटप करणे काही प्रमाणात सोपे आहे, पण मुंबईत शिंदे यांच्या पक्षाला १५० जागांची अपेक्षा असताना शंभर सुध्दा भाजपकडून सोडल्या जाण्याची शक्यता नाही. दुसरीकडे मुंबईत मनसे आणि उध्दव ठाकरे यांची हातमिळवणी झाल्यानंतर भाजपला शिंदे यांच्यासोबत राहण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे राजकीय वास्तव आहे. त्यामुळे शिंदे यांचा मुंबईत ठाकरेब्रँण्डची मते पळविण्यासाठी कसा वापर करता येईल याचा विचार भाजपकडून केला जात आहे. मात्र मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा सोडला तर शिंदे यांचा प्रभाव शिवसेना म्हणून फारसा नाही, याची जाणीव देखील भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे नगास नग उमेदवार देण्यासाठी काही ठिकाणी ठाकरेंच्या समोर शिंदेना जागा देताना आपल्याकडच्या उमेदवारांचा वरचश्मा ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. १२५+७५+२५+२
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेबंधुच्या पक्षांमध्ये १२५+७५ ठाकरेबंधूना दिल्या जाण्याची शक्यता असून +२५+२ महाविकास आघाडीचे शरद पवारांसह अन्य घटकपक्ष असा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्याकडून याबाबत गुप्तता पाळली जात असल्यामुळे शिंदे यांच्यासाठी नेमक्या कोणत्या आणि किती जागा सोडायच्या याचा महायुतीमधील पेंच सुटणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये दोघांच्याही उमेदवारांकडून सुमारे ४० ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आणि अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत त्यावर मार्ग काढून दोघांच्याही काही उमेदवारांना माघारीसाठी तयारी ठेवण्याची अट घालून उमेदवारी दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे बंधूकडून आपले जागावाटप किंवा नेमक्या संख्या आणि कोणत्या जागा कोण लढणार? याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे कारण राज ठाकरे म्हणाले तसे भाजपची ‘मुल पळवणारी टोळी’ नियोजीत संभाव्य उमेदवार, माजी नगरसेवकांच्या मागे पक्षांतरासाठी पाळत ठेवून आहे. अगदी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन सुध्दा विरोधकांचे उमेदवार फुटले नाहीत तर त्यांच्या मागे सत्तेचा दुरूपयोग करत याच काळात जुन्या चौकशा किंवा अन्य त्रांगड्यांचा ससेमिरा लावून देण्याचे तंत्र मागील काही वर्षापासून अनुभवास आल्यानंतर ठाकरेबंधूनी सावध पवित्रा घेतला आहे. अगदी निवडणूक नामांकन अर्ज बाद करण्यापासून संभाव्य उमेदवारांना परावृत्त करण्यासाठी सर्व प्रकारचे राजकीय हतकंडे वापरले जात आहेत मात्र निवडणूक आयोग या सा-या प्रकारांकडे ‘धृतराष्ट्र’ होवून पहात राहणार आहे!

धनदांडग्यांना ‘मुंबई कायमची आंदण’ देण्याचा प्रयत्न?
याची जाणीव असल्याने ठाकरेंच्या युतीने सावध हालचाली सुरू केल्या आहेत असे सूत्रांचे मत आहे. मुंबईत सध्या अदानीला मोकळीवाट करुन देण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी चंग बांधला आहे. महत्वाचे भुखंड अदानीच्या घश्यात घालण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आणि महानगर विकास प्राधिकरणाची हजारो कोटींची कामे निविदा काढुन मार्गी लावण्यात आली आहेत, मुंबईकरांच्या करातून ठेवण्यात आलेल्यां ठेवींवर डाका घालण्याचा प्रयत्नही दिल्लीश्वरांच्या दबावातून करण्यात आला आहे, असा आरोप वारंवार उध्दव ठाकरेंनी केला आहे. आता मुंबईचा अमराठी महापौर आणि स्थायी समितीवर अमराठी अध्यक्ष बसवून धनदांडग्यांना ‘मुंबई कायमची आंदण’ देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांचे केंद्रातील नेते करतील अशी भिती ठाकरेंच्या वतीने दाखवली जात आहे. कदाचित मुंबईला केंद्राच्या अखत्यारीत केंद्रशासित प्रदेश केले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे सांगण्यात येते. त्यात फारसे तथ्य नाही असे समजायचे कारण नाही.(Municipal-elections)

मुंबईकरांसमोर मुंबईच्या नागरी समस्यांचे वाढत्या लोकसंख्या, प्रदुषण आणि वाहतूक कोंडीसह आरोग्य शिक्षणाच्या सोयी सुविधांचे प्रश्न आहेत. नामशेष होणा-या मराठी माणसांच्या वस्त्यांसोबतच मुंबईच्या भविष्याची चिंता आहे. मागील तीन वर्षात सिमेंट रस्त्याची घोषणा करण्यात आली तरी ते झाले नाहीत मात्र मेट्रो आणि अटलसेतू किंवा कोस्टलरोड बुलेट ट्रेन(Bullet train) वाहतुकीसाठी ठाणे मुंबई बोगदा सारख्या पूर्वीपासून ठाकरेंच्या संकल्पनेतील कामे पूर्ण करुन त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येत आहे. मुंबईच्या निवडणुकीला हिंदू – मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी मुद्याला बाजुला करण्यासाठी हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे. आता अन्य भाषिकांच्या अन्य राज्यातील नेत्यांना आणून ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. मुंबईची बजबजपूरी झालीच आहे भविष्यात ती टाळायची असेल तर मतदारांना राजकारण बाजुला ठेवून विचार करावा लागणार आहे. मतदान विकण्याचा धंदा करण्याचा मोह टाळून ‘मतदान म्हणजे आपल्याच हाताने पुढील पाच वर्षांच्या आपल्या जीवनाचे फर्मान’ लिहिण्याचा कार्यक्रम आहे. याची जाणिव प्रत्येक जातीधर्माच्या मुंबईकराने ठेवायला हवी. तरच जीवाची मुंबई आणि मुंबईचा जीव वाचेल. . . नाही का?
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
