मंकी बात…

. . . . अजुनही व्यवस्थेतील कुंभकर्णी धुरिणांना जाग येत नाही? हेच दुर्दैव !

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९च्या निवडणूकी नंतर राजकीय नेत्यांनी जे पेरलं त्याची कटूफळ सध्या जागोजागी अनुभवास येताना दिसत आहेत. राज्यात बदलापूरच्या अक्षय शिंदेच्या एनकाऊंटर नंतर शिक्षण विभागाशी संबंधित दुसरं एनकाऊंटर पवई मुंबईत पहायला मिळालं आहे. तर फलटणमध्ये महिला डॉक्टर संपदा मुंडे(Sampada Munde) हिची आत्महत्या नसून हत्या असल्याच्या पुरावे, वस्तुस्थिती आणि संशयापर्यंत आता प्रकरण पोहोचले आहे. साखर कारखान्यावर बीड(Beed) जिल्ह्यातून येणारे मजूर मुकादम यांचा छळ करण्यासाठी सत्तेचा वापर कसा केला जात होता याच्या कहाण्या समोर येवूनही अजुनही व्यवस्थेतील कुंभकर्णी धुरिणांना जाग येत नाही हेच दुर्दैव म्हणायला हवे.(Dr-Sampada-Munde-suicide)

चौकशी करण्याआधीच जाहिर क्लिन चिट का?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी यावेळी पीडित मुलीची आई व मुंडे कुटुंबातील लोकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव आणेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल गांधी यांनी संपाच्या कुटुंबियांकडून प्रकरणाची संपूर्ण माहितीही घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चुकीचे कामे करण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता, त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. नाईक निंबाळकर यांच्या गुंडगिरीच्या अनेक घटना प्रकाशात आल्या आहेत. या घटनेतील कळस म्हणजे चौकशी करण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहिर क्लिन चिट देऊन टाकली हे संताप आणणारे आहे. या प्रकरणाची चौकशी फलटण बाहेर करावी, उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी करत डॉ. संपदा मुंडेला न्याय मिळवूण देण्यासाठी दिल्लीत कालच युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. महिला काँग्रेसही याप्रकरणी राज्यभर आंदोलन करेल.

सिलेक्टिव्ह कलेक्टिव्ह आणि एक्टिव्ह-इनॅक्टिव्ह असा खेळ का सुरू आहे?

या प्रकरणी महिला आयोगाची भूमिकाही संताप आणणारी असून पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्याकडून माहिती न घेता त्यांनी आधी पोलीसांची भेट घेऊन सारवासारव करणारी वक्तव्ये का केली हा देखील प्रश्नच आहे. महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे पण त्यांनी तसे न करता आरोपींची वकिली केल्याचे समोर आले आहे. डॉ. संपदा मुंडे ज्या समाजाची आहे त्या समाजातील एकही लोकप्रतिनिधी का बोलत नाही? बीड जिल्ह्यात मध्यंतरी काही घटना झाल्या त्यावेळी येथील सत्ताधारी पक्षाचे एक आमदार दररोज प्रसार माध्यमासमोर येऊन भूमिका मांडत होते, आज ते गप्प का आहेत.? संपदाच्या समाजाच्या मंत्री पंकजा मुंडे गप्प आहेत,  मुंबईतील एक सामाजिक कार्यकर्त्या अनेक विषयावर आक्रमक भूमिका घेत असतात त्यांनीही या विषयावर सोयीस्कर मौन का बाळगले आहे?. मात्र शिवसेनेच्या सुषमा अंधारे किंवा राष्ट्रवादी शप चे मेहबूब शेख हे दोघे रोज नवे नवे पुरावे समोर आणून यंत्रणेला सवाल करताना दिसत आहेत. सारे काही सिलेक्टिव कलेक्टिव आणि एक्टिव-इनॅक्टिव असा खेळ का सुरू आहे?

Dr-Sampada-Munde-suicide

राज्यातील कंत्राटदारांचे सुमारे एक लाख कोटी रूपये थकले?

दुसरे प्रकरण मुंबईच्या पवईचे आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना ज्या कंत्राटदाराकडून चालविण्यात आली असा हा माणूस त्याला त्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने चुकीच्या पध्दतीने कृती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा एनकाऊंटर करुन त्याला संपविण्यात आले. त्याला जिवंत पकडून चौकशी केली असतीतर मागच्या काळातील शिक्षण विभागातील घोळ भ्रष्ट्राचार समोर आले असते? अशी भिती कुणाला वाटली का? कारण राज्यातील कंत्राटदारांचे सुमारे एक लाख कोटी रूपये थकले आहेत त्यांना त्यांचे पैसे सरकारकडून मिळत नसल्याने त्यांच्यावर अनावस्था प्रसंग ओढवले आहेत, हे भयानक वास्तव मात्र दुर्लक्षीत केले जात आहे. एक शिक्षण विभागाचा कंत्राटदार एका प्रकल्पासाठी व्याजाने पैसे काढून खर्च करतो, मात्र योजना सरकारने गुंडाळली पण मागच्या तीन वर्षापासून कंत्राटदारांचे पैसेच दिले नाहीत, रोहित आर्याचे बील निघत नसल्याने त्यांने सनदशीर सारे मार्ग वापरले अर्ज विनंती भेटीगाठी, विनवण्या, उपोषण सारे करून झाले. मात्र त्याच्या मागे कर्जदारांचा तगादा लागला असताना त्याचे बील निघत नव्हते, हे वास्तव काय दर्शवते.

समूह माध्यमांवर त्यावरून आता ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यात ही बोलकी प्रतिक्रिया पहा

मंत्री दीपक केसरकर, स्वच्छ प्रतिमेचे आयुक्त (ज्यांच्यावर कृषी खात्यातील बदल्यामध्ये 150 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे)  सुरज मांढरे यांना तो भेटतो त्यांचे प्रोटोकॉल पण पूर्ण करतो..पण त्याला हे लोक दाद देत नाहीत.. त्यामुळे या लोकांच्या नावाने हा आंदोलन करतो उपोषण करतो.. याला हे सगळ करून त्याचे बिल निघत नाही..शेवटी हा १७ मुलांना बंधक बनवून साऊथ स्टाईल हिरो व्हायला जातो.. त्याला वाटतं त्याचं बिल निघेल.. पण प्रशासनाच्या दृष्टीने हा मनोरुग्ण…त्याला गोळ्या घातल्या आणि मुलांना सुरक्षित वाचवले.. आता मंत्री आणि अधिकाऱ्यांनी फसवलेला कोणी कॉन्ट्रॅक्टर असा वेडेपणा नाही करणार… माजी मंत्री दीपक केसरकर आणि आयुक्त सुरज मांढरे यांना आज शांत झोप लागेल एक मनोरुग्ण त्यांना कधीच बिल मागणार नाही..

हे सारे प्रकार ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले ते सरकारच पळवापळवी करुन स्थापन करण्यात आलेले सरकार होते. यापूर्वी याच सरकारमध्ये बदलापूरमध्ये एका शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाले त्यात एक संशयित आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात नेतानाच संपविण्यात आले होते. त्या प्रकरणात शिंदे हा बळीचा बकरा होता आणि बड्या धेंडाना वाचविण्यासाठीच त्याला संपविण्यात आले का? तो सत्य न्यायालयात सांगेल म्हणून त्याला चकमकीत मारण्यात आले का? अश्या शंका घेण्यात आल्या होत्या. मात्र आता तो विषय मागे पडला. सरकारच्या चुकीच्या आर्थिक नियोजनाचे बळी राज्यातील कंत्राटदार होत आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी काही करायचे सोडून आर्या सारखा माणूस जो खोटी गन घेवून मला फक्त उघडपणे काही नेत्यांशी संवाद साधायचा आहे असे म्हणत होता. त्याला त्याने काही नेत्यांना एकस्पोज करू नये म्हणून संपवले असेल का?अश्या शंका आता विचारल्या जात आहेत. मात्र आणखी कुणी असे कृत्य करु नये म्हणून तर त्याचा एनकाऊंटर केला नाही ना? असेही आता विचारले जावू लागले आहे.

राज ठाकरेचे आवाहन निवडणूकीच्या दिवशी धमाल निर्माण करू शकते?

या सगळ्या घडामोडीत निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि मतदार यादीतील गोंधळ दुरुस्त झालेच पाहिजेत याबद्दल आग्रही असणाऱ्या राजकीय पक्षांनी मुंबईत, १ नोव्हेंबर २०२५ रोजी,‘सत्याचा मोर्चा‘ काढला होता. त्यावेळेस शरद पवारांपासुन ठाकरेबंधू राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससह सर्वच भाजपविरोधी पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी जमलेल्या नागरिकांना संबोधित केले. या मोर्चानंतरही या साऱ्या नेत्यांपैकी कुणीच प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांच्या विहित हरकती-सूचनांच्या कार्यक्रमात हरकती दाखलच केल्या नसल्याचा दावा सत्ताधारी भाजप करत आहे. त्यामुळे मोर्चा किंवा पुढे जावून या नेत्यांकडून मतदानावर बहिष्कारासारखे पाऊल टाकण्यात आले तरी फारसे काही हासील होणार नाही. राज्यात मतदारयाद्या दुरुस्त करुन मगच निवडणूका घ्या या आवाहनानंतर काही महापालिकांमध्ये आता दुबार नावे मृत किंवा जागा सोडून गेलेल्या मतदारांना शोधण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र त्यातून नेमके काय हाती लागणार आहे ते आताच सांगता येणार नाही. कारण राज ठाकरे म्हणाले तसे कल्याण, मुरबाडचे साडेचार हजार मतदार तिकडेही मतदान करतात आणि मलबार हिलमध्येही मतदान करतात. असे महाराष्ट्रात लाखो लोकं असतील. हा फार मोठा विषय नाही, साधी गोष्ट आहे,

raj_uddhav_thackeray

त्याशिवाय राज ठाकरेंनी पुन्हा EVM मध्ये गडबड असल्याचं मी २०१७ पासून सांगतोय. २३० जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता, कारण विधानसभेला निवडून येणाऱ्यांची सोय आधीच झाली होती असे सांगत मतदार याद्यांशिवाय हा मुद्दा जुन्या मार्गावर देखील नेण्याचा प्रयत्न केला आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थाच्या गेली पाच वर्षे निवडणूक घेतलेली नसताना मतदारयादी दुरुस्तीसाठी अजून काही दिवस गेले तर असं काय नुकसान होणार आहे? पण जी माणसं मतदारयादीत घुसवली आहेत त्यांचं काय? मात्र जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा दुबार तिबार मतदान करायला आलेल्या लोकांचा चांगला समाचार घेऊन मग त्यांना पोलिसांच्या हवाली करा. हे राज ठाकरे यांचे आवाहन ऐन निवडणूकीच्या दिवशी धमाल निर्माण करू शकते नाही का?

Election

लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह

या मोर्चानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण करण्याचे डाव हाणून पाडण्यासाठी,मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी शनिवारी गिरगाव चौपाटी येथे करण्यात आलेल्या मूक आंदोलनावेळी चव्हाण म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती सरकार झोकून काम करत असताना महाविकास आघाडी राज्यात अराजक माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी शक्ती आणि फंडिंगच्या मदतीने पोसणाऱ्या सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या आंदोलन करणाऱ्यांमध्ये एखादा सचिन वाझे देखील असू शकतो, असा सावधानतेचा इशारा देत जनतेने डोळसपणे यांचा कुटिल उद्देश, डाव समजावा असे आवाहन त्यांनी केले.

ठाकरे बंधूंवर निशाणा साधत चव्हाण म्हणाले की  हे बंधू वक्त्तृत्वशैलीच्या बळावर जनतेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरून भावनिक आवाहनांमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल करत आले आहेत. महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूंनी दाखवले. राज्यात महायुती सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्यासाठी होत असलेले प्रकल्प, योजना याकडे डोळे उघडे ठेवून पहा असे आवाहन चव्हाण यांनी केले. प्रत्येक गरीबाला हक्काचे घर मिळायला हवे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या प्रयत्नांतून साकार होत आहे. असेही चव्हाण म्हणाले .

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गाधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर संपूर्ण देशभर एस आय आर करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. गंमत म्हणजे सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. हा मूक मोर्चा मात्र कुणाच्या विरोधात होता असा सवाल नंतर उपस्थित करण्यात येत होता. कारण सत्ताधारी पक्षाच्याही अनेक विद्यमान नेते आमदारांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत त्या का याचाही विचार करायला हवा नाही का ?

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

Social Media