मंकी बात…

‘आले देवाजीच्या मना’. . . ! न्याय संपला की, राज्यकर्तेच नाकर्ते झालेत?

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीपुर्वी दिवाळीच्या फटाक्यांना जोर आला आहे. अगदी दिवाळीत बळीराजा उध्वस्त झाला असताना आणि त्याला सरकारी मदतीचे पॅकेज म्हणजे ‘वाटाण्याच्या अक्षता’ असल्याचा अनुभव आला तरी आणि लक्ष्मीपूजनाला पाऊस पडला तरी लोकांचा फटाके फोडण्याचा उत्साह काही कमी झाल्याचे दिसले नाही. त्यातच आता राजकीय पक्षांकडुनही निवडणूक तयारीचे फटाके फोडण्याचा धडाकाच सुरू झाल्याचे पहायला मिळाले आहे.

Devendra-Fadnavis-shinde-pawar

यशाची खात्री नसल्याने फेक नरेटिव?

फटाके फोडण्याचा हा उद्योग सर्वत्र सुरूच आहे, त्यात महाविकास आघाडी मध्ये सध्या निवडणूक मतदार याद्यांवरून निषेध मोर्चाची तयारी सुरू आहे. तर त्यांच्या या विरोधीसूराला सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्र्याकडून चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू आहे. दिवाळीनंतर भाजपकडूनही पूर्वीच्या मतदार याद्यांमध्ये कश्या गमतीजमती घोळ होते आणि त्याचा त्यावेळच्या सत्ताधारी पक्षांनी कसा फायदा घेतला याची पोलखोल केली जाणार आहे म्हणे!

DevendraFadnavis

दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि त्यांच्या कुटूंबियानी वर्षा निवासस्थानी निवडक माध्यमकर्मीना स्नेहभोजनाला आमंत्रित केले होते. त्यावेळी अर्थातच अवांतर चर्चा होणे अपेक्षित असताना राजकीय गप्पाटप्पा आणि बातम्यांमागच्या बातम्या शोधण्याचा पत्रकारितेचा आवडता कार्यक्रम झालाच! यावेळी मुख्यमंत्र्याच्या या अनौपचारिक चर्चेमध्ये स्वत: फडणवीस यांनी दहा बारा वर्षापूर्वी भाजपने देखील मतदार याद्यांमध्ये दुबार तिबार नावे आणि गोंधळावर आक्षेप घेतल्याचे सांगितले. इतकेच नाही तर त्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली ती आजही सुनावणीसाठी प्रलंबित आहे असे फडणवीस म्हणाले. मात्र राज्याच्या मुख्य निर्वाचन अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग या दोन स्वतंत्र यंत्रणा असून त्यांचे कार्य जवळपास समान असलेतरी त्यांच्या कार्यान्वयनासाठी वेगळ्या कायद्यांचा वापर केला जातो, याचे प्राथमिक भान किंवा ज्ञान विरोधकांना नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की वास्तविक मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्यानेच आपल्याकडे मतदानाची टक्केवारी देखील नेहमीच अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. या मतदारयाद्यांमध्ये भाजप सत्तेवर नसतानाही गोंधळ होता आणि काही प्रमाणात तो अजूनही आहे मात्र त्याचा ‘बाऊ’ करून विरोधक एक नकारात्मक वातावरण निर्मिती करताना दिसत आहेत. कारण त्यांच्या यशाची त्यांना खात्री वाटत नसावी असे फडणवीस यांनी अनौपचारीक चर्चामध्ये बोलताना सांगितले. राज्याचे विद्यमान मुख्य निर्वाचन अधिकार एस चोकलिंगम यांच्या कार्यपध्दतीबाबत सध्या सत्ताधारी आणि विरोधक सारेच नाखूश असल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे. इतकेच नव्हे तर प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणा या ‘बिनडोक’ अधिका-याला कंटाळली असल्याचे मत एका अतिवरिष्ठ उच्च पदस्थ नेत्याने व्यक्त केले आहे.

दुसरिकडे ज्या बिहारमध्ये एसआयआर बद्दल विरोधकांनी वातावरण तापवले होते त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्यात आली त्यांनी आता ऐन प्रचारयात्रामध्ये हा मुद्दाच सोडून दिला आहे, कारण त्याने मतदारांमध्ये जो नकारात्मक जोश भरण्याचा त्यांचा मानस होता तो पुर्णत्वास जाताना दिसत नाही असेही ते म्हणाले. गंमत म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप सत्ताधारी पक्षांच्या अनेक विद्यमान आमदारांकडूनही करण्यात येत आहेत. थोडक्यात ऐन पावसात विरोधकांचे फटाके भिजलेले असल्याने ते फुसके ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्याकडून व्यक्त करण्यात आला.

त्यांच्यामते विरोधकांमध्ये सध्या निवडणूक बहिष्कारापर्यंतचा टोकाचा विरोध करण्याची कुणाची मानसिकता नाही, फार तर मनसेच्या नेत्यांचा उत्साह यात जास्त दिसत असलातरी निवडणूका नकोत असे खालच्या पातळीवर कोणत्याच राजकीय पक्ष कार्यकर्त्याला वाटणार नाही, कारण चार चार वर्ष अनेक ठिकाणी लोक स्थानिक निवडणूकांच्या प्रतिक्षेत आहेत. आता त्यांना थांबवले तर लोक चिडून मारतील असेही फडणवीस यांचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना’. . !

महायुतीमध्ये जेथे तीनही पक्षांपैकी दोन मजबुत असतील तेथे मैत्रिपुर्ण लढून नंतर महायुति सत्ता स्थापन करू शकेल त्यामुळे महायुतीच्या विरोधकांना स्पेस मिळणार नाही. तर जेथे आवश्यक असेल तेथे निवडणुक पूर्व जागावाटप करुन निवडणूका लढवू असा फॉर्म्युला असल्याचे मुख्यमंत्रीच म्हटले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात ‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना’ ही म्हण प्रत्यक्षात येत असल्याने फारसे काही बदल होण्याची शक्यता नाही. अगदी २०२९पर्यंत मी स्थीर आहे, मंत्रिमंडळातही सध्याच काही बदल करण्याची गरज नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यानंतर कुजबूज आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्या काही दिवसांपूर्वी ते असेच आत्मविश्वासाने बोलत होते नंतर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून अडिच वर्ष काम करावे लागले होते याची आठवण दिली! काही असो देवाभाऊंचे ठरले आहे.

सध्यातरी भारतीय जनता पक्षात तेच नंबर वनचे नेते आहेत  दुसऱ्या पक्षातून आणून सत्तेच्या मलईत डुबविलेल्यांचे ते  नेते आहेत. विरोधी पक्ष तर सध्या राज्यात अस्तित्वहिन असल्याने त्यांना मित्रपक्षांसोबतच विरोधकांसारखे वागावे लागतअसावे नाही का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाना ते स्वत:च्या अस्तित्वासाठी लढायला भाग पाडतील आणि राजकारणातील जुने हिशेब चुकते करत काटा काढतील हे लक्षात आल्यानेच मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सातत्याने दिल्लीत जात आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Ajit-Pawar

शतकमहोत्सवात स्वयंसेवक मुख्यमंत्री – पंतप्रधानांचे शत-प्रतिशत?

मात्र देशात जेथे ट्रिपल इंजिन सरकार आहेत तेथे सर्व काही आलबेल आहे असे नाही. भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही प्रचंड वाद आहेत, तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरु राहणार आहे. स्थानिक निवडणूकांनंतर तर पुढील तीन वर्ष हे सरकार कसे चालणार हा सध्या कुतुहलाचा प्रश्न आहे. भाजपाचा मित्रपक्षांबद्दलचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते पवार शिंदे दाद न देता २०२९च्या आधीच जाहीर केलेल्या रणनितीप्रमाणे संघाच्या शंभराव्या वर्षात स्वयंसेवक मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असताना शत-प्रतिशतच्या दिशेने वाटचाल करतील हे उघडच आहे.

Election

शंकाचे मोहोळ की भविष्याची पेरणी?

स्थानिक निवडणूका वगळता राज्यात सध्या पुण्यात दोन भाजपचे खासदार आणि सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार धंगेकर यांचा दंगा सुरूअसल्याचे दिसत आहे.  मुरलीअण्णा मोहोळ यांच्याबद्दल शंकाचे मोहोळ तयार करून त्यांच्या भविष्याच्या वाटचालीला कुणीतरी पायबंद तर घालायचा प्रयत्न करत नाहि ना?असे आता राजकीय वर्तुळात विचारले जावू लागलेआहे. राज्यात ओबीसी विरूध्द मराठा संघर्ष सुरू असताना सत्ताधारी पक्षात भविष्याच्या राजकारणाची पेरणी करण्यासाठी नवे पँटर्न वापरले जात आहेत. त्यात मुंबईत कबुतरखान्याच्या निमित्ताने जैन समाजाचे आंदोलन तर पुण्यात गोखले बिल्डरच्या प्रकरणाच्या निमित्ताने जैन समाजाचे राजकारण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा भविष्यातील सत्ताधारी राजकारणाच्या महत्वाच्या खुर्चीसाठीच्या राजकारणाचा संबधअसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात उठलेले जैन समाजाचे कथित भ्रष्टाचाराचे मोहोळ, किंवा शनिवार वाड्यातील हिंदू – मुस्लिम राजकारणाचे प्रयोग हे भविष्याच्या राजकारणचे सूत्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता मेल्यानंतरही न्याय नसल्याची खूणगाठ

आता मेल्यानंतरही न्याय नसल्याची खूणगाठ

त्यातच आता फलटणमधील महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण त्यात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर विचारले जाणारे प्रश्न यावर अर्धवेळ गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्याकडून कारवाईचे संकेत असले तरी, मात्र प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न हे सारेच भयावह आहे. सामान्यपणे एक महिला डॉक्टर सुसाइड नोट हातावर लिहून जिवन संपवते त्यातही जेंव्हा राजकारण केले जाते त्यावेळी या राज्यात आता मेल्यानंतरहि न्याय मिळणार नसल्याची खूणगाठ जनसामान्य, महिला मतदारांना बांधायला हरकत नसावी. बीडचे प्रकरण अजूनही मार्गी लागले नसताना बीडच्याच संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने या राज्यात पोलीस, प्रशासन, सरकार नक्की कुणाकडे न्याय मिळेल असा प्रश्न सतावत राहतो. दुसरीकडे उध्वस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे जाहीर आश्वासन देणारे वित्तमंत्री अजित पवार यांनी आम्ही असे म्हटलेच नव्हते असे सांगणे म्हणजे न्याय या राज्यात संपला आहे किंवा राज्यकर्ते नाकर्ते झाले आहेत नक्की काय समजायचे?

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

Social Media