ठाकरेंच्या मधले बाळासाहेब बदलतात; कारण सत्तेचे राजकारण ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी (मविआ) आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राज्य निवडणूक आयोग(State Election Commission) आणि राज्याचे मुख्य निर्वाचन अधिकारी यांच्याशी चर्चा केली. आगामी निवडणुकांच्या मतदारयाद्या सदोष असल्याबाबत मागील वर्षभरापासून या पक्षांनी शंका व्यक्त केल्या आहेत? त्यावर आयोगाकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यानंतर कॉंग्रेसनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी देखील देशभर ‘वोट चोर गद्दी छोड’ अभियान राबवून त्यावर प्रकाश टाकला आहे. वंचित चे प्रकाश आंबेडकरांनी तर न्यायालयात दाद मागण्याचाही प्रयत्न केला, तो असफल झाला आहे. आता राज ठाकरे(Raj Thackeray) देखील महाविकास आघाडीसोबत याच मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. आयोगाशी बैठक झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सर्वच विरोधीनेत्यांनी सदोष याद्या दुरुस्त करण्यावर भर देताना तोपर्यत निवडणूका न घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यात मनसे सर्वात आग्रही असल्याचे पहायला मिळाले आहे!

निवडणुकांबाबत शंकाच शंका…!
मनसे(MNS) आणि महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळानं घेतलेली निवडणूक आयोग आयुक्तांची भेट, त्यांच्यापुढं मांडलेले प्रश्न आणि निवेदनं, यानंतर मविआनं घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात झालेला धक्कादायक खुलासा यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मतदार याद्यांमध्य़े असणारा घोळ समोर येत असल्या कारणाने सातत्याने होणारे हे खुलासे पाहता आता आगामी निवडणूक सरकारला जड जाण्याची जाणीव झाली असून, राज्यात आगामी काळात निवडणुका होतील की नाही? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
याची कारणे अनेक आहेत. राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्याने जानेवारी अखेरपर्यंत प्रक्रिया पुर्ण करण्याची घाई आहे. तर आरक्षण आणि मतदार याद्यांसह कर्मचारी प्रशिक्षण इत्यादींच्या बाबत आयोगाने कामकाज सुरू केले आहे. मात्र राज्यात ओल्या दुष्काळासारखी स्थिती असल्याने महायुती सरकारबद्दल राज्यात प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या निवडणूक टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्याकडून सहा महिने निवडणूक याद्यांच्या मुद्यावर कार्यक्रम पुढे ढकलण्याचे ‘नरेटिव सेट’ केले जात असल्यानेही राजकीय वर्तुळात हा भाजपचा अजेंडा अन्योक्तीने गळी तर उतरवला जात नाही ना? अशी जाणकारांना शंका आहे.

लबाड लांडग ढोंग करतय. . . ?
कारण . . यासाठी भर दिवाळीत ठाकरे यांनी नेस्को(Nesco) येथे पदाधिकारी मेळावा घेतला आणि विरोधकांचे दु:ख मांडतानाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा देखील व्यक्त केला आहे. यावर बोलताना एका जाणकार नेत्याने छान उदाहरण दिले. तो म्हणाला, गरीब शेतकऱ्याला चिंता असते की आपल्या बोकडांच्या कळपातून एक एक बोकड रातोरात कमी कसा होत आहे. पण काही केल्या त्याला ते समजत नसत. मात्र एक लांडगा त्या कळपात येवून अन्य बोकडांसोबत रहात असतो रात्र झाली की तो त्यातील एक एक बोकड फस्त करतो. मात्र दिवसभर बोकडांसोबत बें-बें करत फिरतो. तसेच काहीसे महाविकास आघाडीसोबतच्या मनसेचे आहे असे हा नेता म्हणाला.! वास्तविक मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे विधानसभा निवडणूकीपूर्वीपासूनच कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शप) वंचित शिवसेना (ठाकरे) सारेच सांगत आहेत, तेच आता मनसे सांगत आहे. मात्र कॉंग्रेसचे नेते मनसेच्या सु्रात सूर मिसळून त्यांना सोबत घेण्यास तयार नाहीत. खरेतर मतदारांना फसवून मतदान विधानसभेत घेण्यात आलं आहे. आता मतदार जागरूक झाला तर निवडणुका सरकारला जड जाणारच आहे तरीही विरोधकांनाच निवडणूक आता नको असे का म्हणावेसे वाटले आहे? मनसेचा सूर सर्वात मोठा आहे उबाठा त्यांच्या सोबत (प्रेमात) आहे, शप राष्ट्रवादी चोरी-चोरी चुपके कभी हा कभी ना या भुमिकेत आहे. राहिले कोण ? कॉंग्रेस त्यांचे सर्वोच्च नेते राहुल गांधी अन्य नेते सर्वत्र वोटचोरीचा मुद्दा मांडत आहेत, पण राज्याचे अध्यक्ष संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषदेपासून दूर राहताना दिसत आहेत!

सरकारचं पॅकेज ठिगळासमान
शिवाय अतिवृष्टीत शेतकरी ३५ पैकी ३२ जिल्ह्यात खरीपात पूर्ण उध्वस्त झाला आहे. आभाळच फाटलं आहे त्याला सरकारचं पॅकेज ठिगळासमान होणार आहे. आगामी रब्बीच्या हंगामाला शेतकऱ्याला उभं करायच आहे, त्याची दिवाळी काळी जात असताना त्याच्याकडे मतदानासाठी सत्ताधारी मत मागायला कसे जाणार? त्यामुळे सहा महिने निवडणूका पुढे गेल्या तर खरेतर त्यांना बरेच आहे, याची कल्पना विरोधकांना असल्यामुळे निवडणुका होतील की नाही यावर शंका आहे’. सर्वोच्च न्यायालयाने मात्र निवडणूका जानेवारी२६ अखेर पूर्ण कराच असा तगादा लावला आहे.

मात्र मतदार याद्यांवरून विरोधक साशंक आहेत. त्यात आता राज ठाकरेंना सोबत घेण्यास उध्दव ठाकरे अधीर आहेत. कारण मुंबई महापालिकेत मराठी मतांचा टक्का ६५ टक्के आहे तो एकगठ्ठा मनसे शिवसेनेला मिळालातर ठाकरे ब्रँण्डचे ११५ नगरसेवक येण्याची शक्यता अनेक सर्वेक्षणात दिसून आली आहे. तर गुप्तचरांच्या अहवालातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी म्हणून लढले नाहीतरी ठाकरेंना फायदाच असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत जोडण्याचा उध्दवसेनेचा प्रयत्न आहे. मात्र बिहारच्या निवडणूकीपूर्वी मनसे सोबत गेल्यास बिहारच्या सत्तेचा खेळ बिघडू नये म्हणून कॉंग्रेस सध्या मनसे सोबत न जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गंमत म्हणजे कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या वोटचोरीचा मुद्दाच राज ठाकरेंनी राज्यात पळविला आहे. म्हणजे तंबूत शिरलेल्या उंटासारखे राज ठाकरे विरोधकांसोबत राहून कॉंग्रेसचा अजेंडा हातात घेतात आणि भाषा सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची बोलत राहतात असा हा तिकडम राजकीय फंदा आहे की नाही! मात्र राज ठाकरेंनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळं जर तेव्हा स्वतःचा पक्ष असतानाही काँग्रेसचा प्रचार करायला राज ठाकरे चालले तर आता का चालणार नाहीत? असा सवाल उबाठाचे नेते उपस्थित करत आहेत ही त्याहून मोठी गंमत नाही का? त्यातही गंमत अशी उध्दव आणि राज यांच्या छायाचित्रात मधले बाळासाहेब फक्त बदलले पूर्वी बाळासाहेब ठाकरे असायचे आता त्याजागी बाळासाहेब थोरात दिसू लागले आहेत अशी मार्मिक प्रतिक्रिया आता येवू लागली आहे!

सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत
दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता दिल्याचे सांगत मुख्यमंत्र्याकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा आटापिटा केला जात आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या मते सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत देण्यात आली तर खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत वाटण्यात आली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी तपशील देत सांगितले की, नागपूर विभागातील तीन लाख ७६ हजार ९६८ शेतकऱ्यांच्या तीन लाख ४४ हजार ६२९.३४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३४० कोटी ९० लाख ८ हजार निधीचा समावेश आहे. तर अमरावती विभागातील चार लाख ७८ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या पाच लाख २६ हजार ३८१.३६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४६३ कोटी ८ लाख ३० हजार निधीचा समावेश आहे. पुणे विभागातील आठ लाख २५ हजार १८९ शेतकऱ्यांच्या सात लाख नऊ हजार २०९.१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९५१ कोटी ६३ लाख ३७ हजार निधीचा समावेश आहे. नाशिक विभागातील १५ लाख ७९ हजार २३९ शेतकऱ्यांच्या ११ लाख ५० हजार ३०१.७६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४७४ कोटी ८४ लाख ९ हजार निधीचा समावेश आहे. कोकण विभागातील एक लाख पाच हजार २३९ शेतकऱ्यांच्या २९ हजार २३३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २८ कोटी १० लाख ६३ हजार निधीचा समावेश आहे.
एकूण काय? राज्यात राजकारणाचा लपंडाव सुरूच आहे. सामान्य जनता शेतकरी मात्र ऐन दिवाळीत संकटाचा सामना करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झाल्या की तीन वर्ष राज्यात मोठ्या निवडणूका नाहीत त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते नेत्यांना सत्तेच्या वळचणीला जाण्याचा पक्षांतराचा खेळ सध्या जोरात सुरू आहे, निवडणूका लांबल्या तर त्यात वाढ होणार आहे. त्यामुळे मग सागरा प्राण तळमळला! म्हणत सत्ताधारी भाजपकडे ओघ वाढत राहणार आहे! असे आहे सत्तेचे राज कारण आणि सध्याच्या विरोधकांच्या स्थितीला कारण ठरतील ते देखील ‘राज’ कारण! असा जाणकारांचा मानस आहे! तुर्तास इतकेच!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
