राज्यपाल राष्ट्रीय राजकारणात घटनात्मक पदाच्या शर्यतीत!; मुख्यमंत्री देखील राष्ट्रीय राजकारणाच्या पटावर जाणार?

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन(C.P. Radhakrishnan) यांची निवड उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार म्हणून झाली आहे. त्यानंतर राज्यपाल महोदयांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. नुकतेच सीपी राधाकृष्णन नवी दिल्लीकडे रवाना झाले. देशाच्या सर्वोच्च क्रमांकाच्या घटनात्मक पदापैकी दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर यापूर्वी राज्याचे माजी राज्यपाल शंकरदयाळ शर्मा देखील निर्वाचीत झाले होते. त्यानंतर ते देशाचे राष्ट्रपती देखील झाले होते. मात्र सीपी राधाकृष्णन हे पहिलेच बिगर कॉंग्रेसेतर पक्षाचे नेते आहेत ज्यांची निवड राज्याच्या राज्यपाल पदावरून उपराष्ट्रपती पदासाठी झाली आहे.
एनडीए घटकपक्षांची दक्षिणेत शक्तीपरीक्षा?
येत्या काही महिन्यानंतर होवू घातलेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एनडीएच्या घटकपक्षांची शक्ती दक्षिणेत वाढविण्यासाठी ही निवडणूक उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. कारण सध्या दक्षिणेत तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचे तर कर्नाटकात कॉंग्रेसचे आणि केरळात कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरकार आहे. तेलंगणातही कॉंग्रेस सत्तेवर आहे. आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू(Chandrababu Naidu) हे एकमेव एनडीएचे घटकपक्ष आहेत. दक्षिणेच्या राज्यात भाजपला सध्या ओरीसामध्ये चांगला परिणाम मिळाला असून तेथे त्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आहे.

मात्र उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला दक्षिण दिग्विजय करण्याची संधी मिळणार आहे. सी पी राधाकृष्णन यांना तामिळनाडूचे ‘मोदी’ मानले जाते. रा स्व. संघ आणि भाजपच्या विचारांचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सुमारे चाळीस वर्षापासून दक्षीणेच्या राज्यांचे प्रतिनीधीत्व केले आहे. राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्व मनमिळावू, शांत आणि मृदू स्वभावाचे असल्याने त्यांच्या नावाला विरोधीपक्षांचा फारसा विरोध होणार नाही आणि सर्वसहमतीने बिनविरोध त्यांची निवड उपराष्ट्रपतीपदावर व्हावी अशी अपेक्षा त्यांच्या नावाची घोषणा करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda)यांनी व्यक्त केली आहे.

राधाकृष्णन यांची निवड देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील निवडणूकीसाठी झाली आहे त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत काही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून मागील वर्षी जुलै२०२४मध्ये निवड झाली. त्यांच्याकडे तेलंगणा आणि पुद्दूचेरी या दोन राज्यांचा अतिरिक्त कार्यभार देखील होता. त्यापूर्वी झारखंडमध्ये ते राज्यपाल म्हणून कार्यरत होते. राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी संपूर्ण राज्यात जनसंपर्कावर भर दिला होता आणि सर्व २४ जिल्ह्यातील अधिकारी आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यापूर्वी ते कोईंबतूर येथून दोनवेळा लोकसभेवर सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते. त्यांनी तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात सन २० ०४ आणि २००७ मध्ये त्यांनी तामिळनाडू मध्ये ९३ दिवसांची रथयात्रा काढली होती. त्यामध्ये देशातील नदीजोड प्रकल्प, दहशतवादाविरोधातील लढा, समान नागरी कायदा, अस्पृश्यता निवारण, आणि नशामुक्ती जनजागरण या विषयावर त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. या शिवाय त्यांनी आणखी दोन वेळा वेग वेगळ्या विषयांवर राज्यात पदयात्रा केल्या होत्या. त्यामुळे चार दशकांचा प्रदिर्घ राजकीय अनुभव गाठीशी असणारे राधाकृष्णन यांना तामिळनाडूच्या राजकारणात सन्मान आणि आदराचे स्थान आहे.
१९५७मध्ये त्यांचा जन्म तामिळनाडूच्या त्रिचूर(Trichur) येथे झाला आहे. तर त्यांचे शिक्षण बीबीए पदवीपर्यंत कोइंबतूरच्या चिदंबरम महाविद्यालयातून झाले आहे. क्रीडा विषयाची त्यांना आवड आहे, त्यांच्या महाविद्यालयीन जिवनात त्यांची टेबल टेनिस, धावपटू व्हॉलीबॉल आणि क्रिकेट यामध्ये चँम्पीयन अशी ओळख होती.

माजी उपराष्ट्रपती जगदिप धनखड(Jagdeep Dhankhar) यांच्या तब्येतीच्या कारणांमुळे अचानक झालेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात येत असल्याने या जागेवर भाजपकडून संघ परिवाराशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती केली जावी तसेच दक्षिणेच्या राज्यातून येणारी ही व्यक्ती असावी या दोन्ही महत्वाच्या बाबींची पूर्तता सीपी राधाकृष्णन यांच्याकडून होत असल्यानेच त्यांच्या नावाला भाजप आणि एनडीएमध्ये पहिली पंसती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या नावाला सर्व राजकीय पक्षांकडून सर्वसहमतीने बिनविरोध मान्यता मिळावी असा सत्ताधारी एनडीएच्या घटकपक्षांचा आणि भाजपाचा देखील आग्रह आहे. त्यामुळे महाराष्ट्राला येत्या महिनाभरात नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राधाकृष्णन यांची उमेदवारी सत्वपरिक्षाच?
महाराष्ट्रात विद्यासागर राव(Vidya Sagar Rao) यांच्यानंतर आलेल्या भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) या राज्यपालांच्या काळात झालेल्या कटू प्रसंगाची आठवण आजही कायम राहिली आहे. त्यानंतर रमेश बैस(Ramesh Bais) आणि सीपी राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan)या राज्यपालांकडून मात्र त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठा आणि गौरवाला आच यावी अशी कोणतीही राजकीय घटना सुदैवाने झाली नाही. त्यामुळे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांची वर्षभराची कारकिर्द यशस्वी ठरली असे म्हणता येते. त्यांच्या झारखंड येथील कार्यकाळाबाबत मात्र वादंग झाल्याचे पहायला मिळाले आहे. सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडी कारवाईनंतर राजीनामा देण्याच्या प्रकरणात चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची अनेक दिवस शपथ देण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका राज्यपाल राधाकृष्णन यांच्यावर विरोधकांकडून ठेवण्यात आला होता. त्यामुळे एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला इंडिया आघाडीकडून झारखंडचे हेमंत सोरेम किंवा तामिळनाडूचे द्रमुक पक्षाचे स्टालिन यांचा विरोध असण्याची शक्यता आहे. शिवाय ममता बँनर्जी यांचा तृणमूल पक्ष आणि कॉंग्रेसच्या सदस्यांचा देखील त्यांच्या नावाला विरोध असण्याची शक्यता लक्षात घेता राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

बिहार मधील एस आय आर प्रकरणामुळे एकवटलेल्या इंडिया आघाडीकडे लोकसभेत ३०० सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. तर लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांकडून सर्वसहमतीने राधाकृष्णन यांना विजयी करण्यासाठी आंध्रप्रदेशातील चंद्राबाबू नायडूंच्या भुमिकेला देखील महत्व आले आहे. नायडू सध्या त्यांचे शिष्य तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दक्षिणेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी दक्षिणच्या बिगर भाजप खासदारांची काय भुमिका असेल ते पहावे लागणार आहे.

सध्या लोकसभा मतदारसंघ फे्ररचनेच्या तसेच एस आय आरच्या मुद्यावरून तेलगू देसम सह सर्वच दक्षिणेच्या राज्यांचा विरोध आहे. त्यातच भाजपला येत्या २०२९च्या निवडणुकांच्या नियोजनात दक्षिणेवर भर देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दक्षिणेच्या या भाजप संघ स्वयंसेवकाला या निवडणूकीत दक्षिणेचे संसद सदस्य कसा प्रतिसाद देतात त्यावर भाजपच्या भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने ही सत्वपरिक्षाच ठरणार आहे, असे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री राष्ट्रीय राजकारणाच्या पटावर?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी देखील या निवडणूकीच्या समिकरणांचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या नेत्यांना दक्षिणेच्या विशेषत: तामिळनाडूच्या राज्यात सरकार स्थापन करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी देखील या उमेदवारीच्या निमित्ताने वातावरण निर्मिती होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल आता राष्ट्रीय राजकारणात घटनात्मक पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देखील राष्ट्रीय राजकारणाच्या पटावर महत्वाच्या पदाच्या जबाबदारीसाठी जाण्याची शक्यता आहे असे आता सांगण्यात येवू लागले आहे. सी पी राधाकृष्णन यांची निवड होण्याच्या मागे भविष्यातील या राजकीय घडामोडींची शक्यताही लक्षात घेतली पाहिजे. येत्या तीन महिन्यात त्यामुळेच राज्य आणि देशाच्या राजकारणात महत्वाच्या घडामोडी होणार आहेत.
तुर्तास इतकेच!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)

