महाराष्ट्रात राजकीय वारे बदलण्याची चिन्ह? ‘नवी विटी नवा दांडू’ होण्याची शक्यता?!

राज्य विधीमंडळाचे तीन आठवड्यांचे अधिवेशन ‘नको त्या विषयांमुळे’ चर्चेत राहिले. या अधिवेशनात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या हिताच्या चर्चा आणि प्रश्नाना न्याय मिळाला का? असा प्रश्न पडला असतानाच राज्य सरकारच्या वतीने मात्र १६ विधेयकांसह अनेक महत्वाचे निर्णय झाल्याच्या प्रशस्तीची थाप मुख्यमंत्र्यानीच आपल्या सरकारच्या पाठीवर मारल्याचे पहायला मिळाले. राज्यात महायुतीचे पाशवी बहुमताचे सरकार सत्तेवर आल्यापासूनचे हे तिसरे पूर्णकालिक अधिवेशन होते. मात्र सत्ताधारी सदस्यांपासून विरोधकांपर्यत सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनीधींकडून विकासाच्या कामांना निधीच मिळाला नसल्याची ओरड सातत्याने कायमच राहिली आहे. आता तर केवळ आठ महिन्यातच सरकारच्या मंत्र्यांच्या अपयशी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे मंत्रिमंडळ खांदेपालटाच्या चर्चाना जोर चढला असून १५ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन नव्या कोऱ्या मंत्रिमंडळासह साजरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता
महायुती सरकारमधील जाणकार सूत्रांनी अनेक गोष्टींचा खुलासा करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुतांश महत्वाच्या जिल्ह्यातील निवडणूका भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील शक्य नसेल तेथे तीनही पक्षांकडून वेगळे लढण्याचे सूत्र निश्चित केले जात असल्याचे सूतोवाच माध्यमांशी बोलताना केले आहे. त्यामुळे मुंबई ठाणे पुणे नागपूर सारखे काही अपवाद वगळता राज्यात महायुतीचे घटकपक्ष वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे.

याचाच परिपाक असा झाला आहे की शिवसेना शिंदेगटाने नुकतेच आनंदाराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षासोबत युती केल्याचे जाहीर केले आहे. तर भारतीय जनता पक्षाने देखील अनेक जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते कार्यकर्ते यांना गळाला लावत आपल्या पक्षांत घेण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात देखील दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत शिवसेना उबाठा आणि मनसेकडून युती करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. अश्यावेळी महाविकास आघाडीतील कॉंग्रेसपक्ष एकाकी राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महामंडळ वाटपाची शक्यता
याचे कारण शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय राठोड, दादाजी भुसे यांच्याबाबत माध्यमांतून भ्रष्टाचाराच्या तसेच हनीट्रँप-मनीट्रँपच्या चर्चाना उधाण आले आहे. भारतीय जनता पक्षाचे मंत्री जयकुमार गोरे, नितेश राणे, आणि गिरिश महाजन यांच्या मंत्रीपदावर गंडातर येणार असल्याच्या चर्चा माध्यमांतून आणि समूह माध्यमांतून वेगाने होताना दिसत असून राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील गदा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील वाद जाहीरपणे पत्रांच्या माध्यमातून समोर आला असून मुख्यमंत्र्याच्या निंयत्रणाबाहेर मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या खात्यात परस्पर बदल करण्याची जुनी परंपरा उपमुख्यमंत्र्याकडून सुरूच राहिली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होण्याची शक्यता असून विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर मंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या रिक्त जागी ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता असून शिवसेनेतून मनिषा कायंदे किंवा निलम गो-हे यांना मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर महाराष्ट्रातून किशोर पाटील, तर हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महामंडळाच्या वाटपाची घोषणा होण्याची शक्यता असून भाजपला ४५ शिंदे गटाला ३५ तर अजित पवार गटाला २८ महामंडळे शासकीय समित्यांच्या अध्यक्षपदांचा ‘फॉर्म्युला’ ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकार ‘रम-रमा-रमी’ मध्ये ‘रममाण’ झाल्याचे चित्र?
हे सारे जरी होत असले तरी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे(Manik Rao Kokate) यांचा उर्मटपणा आणि रमीचा डाव, गृहराज्यमंत्री कदम यांच्या कुंटूंबियाच्या मालकीच्या लेडीज डान्सबारवर पोलीसांच्या छाप्यात आक्षेपार्ह गोष्टी सापडल्याने परवाना रद्द झाल्याचे प्रकरण किंवा राज्याच्या महसूल वाढावा या उदात्त भावनेने राज्य सरकारने तीनही घटकपक्षांच्या नेत्यांशी संबधितांना नव्याने सव्वा दोनशे दारू दुकानांचे परवाने देताना दाखवलेली तत्परता आणि महेरनजर यामुळे हे सरकार ‘रम-रमा-रमी’ मध्ये ‘रममाण’ झाल्याचे चित्र विरोधकांकडून रंगवले जात आहे.

महाराष्ट्रात ‘हनी नाही आणि ट्रॅप नाही’ अशी स्पष्टोक्ती अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्यानंतरही राज्यातील भाजपच्या एका मंत्र्याशी संबंधित लोढा नावाच्या व्यक्तीला मुंबईत पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचे भाजपसह राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी संबंध असल्याची छायाचित्रही माध्यमात झळकत आहेत. तर या अटक केलेल्या लोढाचे जुने व्हिडीयो व्हायरल झाले असून त्यात त्याने भाजपच्या एका नेत्याला ‘एक बटन दाबून धडा शिकवण्याच्या धमक्या’ दिल्याचे दिसत आहे.
तर अश्या वादळी घडामोंडीमध्ये महाराष्ट्रात सध्या सामान्य जनतेच्या जगण्याचे प्रश्न बाजुलाच पडले असून राजकीय नेते सत्ताधारी आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या बरबटलेल्या कारनाम्यांनी माध्यमांमध्ये माहितीचा पाऊस पडताना दिसत आहे. त्यातून महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात कश्याप्रकारे राजकीय लांडगेतोड आणि सत्तेची साठमारी करताना घोटाळे हेराफेरी आणि भ्रष्टाचार करण्यात आला आहे हेच समोर येताना दिसत आहे.
छत्तीसगड मध्ये माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला केंद्रीय तपासयंत्रणानी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सुमित साळुंखे नावाच्या कंत्राटदाराला देखील अटक करण्यात आली असून या व्यक्तीमार्फत राज्यात सहा हजार कोटींचा रूग्णवाहिका घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या व्यास प्रकरणात त्यांचा राजीनामा घेणारे पुण्याचे सामजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणासह मागील सरकारच्या काळातील सहा प्रकरणांबाबत तक्रार दाखल केल्या असून त्यावर आता चौकश्या सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या रूग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या काही बड्या नेत्यांचा संबंध असल्याच्या चर्चाना देखील माध्यमातून उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात ब-याच राजकीय उलाथापालथी देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) पंचावनवा वाढदिवस साजरा करून दोन दिवस दिल्ली मुक्कामी जावून आले आहेत. त्यांच्या या दिल्लीभेटीत त्यांच्याकडून सर्वच महत्वाच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा झाल्या असून शासकीय कामकाजा व्यतिरिक्त राजकीय घडामोडींबाबत फडणवीस यांनी वरिष्ठांशी सल्लामसलत केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यात आता चर्चा केलेल्या महामंडळ वाटप हनीट्रॅप मनीट्रॅप आणि भ्रष्टाचार प्रकरणांच्या चौकश्यापासून मंत्रिमंडळ खांदेपालटापर्यंतच्या साऱ्या मुद्यांवर त्यांनी मार्गदर्शन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात येवू घातलेल्या महत्वाच्या प्रकल्पांतील गुंतवणूकीसह केंद्र सरकारकडून मिळावयाच्या वित्तीय सहाय्य आणि निधीबाबतही पाठपुरावा मुख्यमंत्र्याकडून या दौ-यात करण्यात आला असून येत्या काही दिवसांत फडणवीस पु्न्हा एकदा दिल्लीत जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

‘नवी विटी नवा दांडू आता खेळ नव्याने मांडू’
मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या सत्तेतील आमदार आणि मंत्र्याच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होताना दिसत असून आता नगरविकास विभागाच्या सर्व नस्ती मुख्यमंत्र्याच्या नजरेखालून गेल्याशिवाय त्यावर अंतिम निर्णय न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुशासन पर्वाच्या शंभर दिवसांनंतर राज्यातील सरकारचे नकारात्मक चित्र उभे राहिल्याने प्रचंड बहुमताच्या या सरकारची लोकाभिमुख प्रगतीशील कल्याणकारी अशी प्रतिमा निर्माण होवू शकली नाही. त्यामुळे देवाभाऊंना आता आठच महिन्यात नव्याने सत्तेचा सारीपाट मांडण्याची गरज असल्याचे लक्षात आले आहे. त्यासाठी त्यांच्याकडून आता मंत्रिमंडळाचा खांदेपालट केला जाण्याची शक्यता असून ‘नवी विटी नवा दांडू आता खेळ नव्याने मांडू’ असेच ते दिल्लीत जावून वरिष्ठांकडे सांगत असावेत असे मानले जात आहे. त्यांच्या या नव्या राजकीय सारीपाटाची बहुदा कल्पना आल्यामुळेच की काय त्यांच्या वाढ दिवसांच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्यातील दिग्गज नेते शरद पवार(Sharad Pawar) यांनी त्यांच्या स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे, इतकेच नव्हे एरव्ही ‘अरे-तुरे च्या सामन्यात’ रंगणा-या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी देखील फडणवीस यांचे तोंडभरून कौतूक केल्याचे पहायला मिळाले आहे. थोडक्यात काय? महाराष्ट्रात राजकीय वारे बदलण्याची चिन्ह आहेत. देशात राजकीय उलथापालथ होत असतानाच राज्यात देखील नवी विटी नवा दांडू होण्याची शक्यता दृढ झाली आहे. तुर्तास इतकेच!
किशोर आपटे,
(लेखक व राजकीय विश्लेषक)
