मंकी बात…

फडणवीस, शिंदे-पवार, भुजबळ. . . साऱ्यांचाच ‘अंदाज’ अपना अपना!

अंदाज-अपना-अपना
Fadnavis-Shinde-Pawar-Bhujbal : निर्माता राजकुमार संतोषीचा ‘अंदाज अपना अपना’ या नावाचा बॉलीवूड हिंदी सिनेमा २००८मध्ये आला होता. कॉमेडी, मनोरंजनात्मक या सिनेमा सारखेच, अगदी तसेच काहिसे पण खूपच गंभीरपणे सध्या सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत सुरू आहे. कसे तर हेच पहा ना. . . . अखेर घडू नये ते घडलेच! महाराष्ट्र विधानमंडळाच्या ‘अंदाज समिती’च्या प्रमुखांच्या स्विय सहायकाच्या धुळे(Dhule) शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोलीतून पावणेदोन लाखांची रोकड पकडण्यात आली. त्यासाठी स्थानिक लढवय्या नेते माजी आमदार अनिल गोटे(Anil Gote) यांनी साहस दाखवलेच. पण हाच किशोर पाटील (Kishore Patil)मागील कार्यकाळापासून अर्जून खोतकर(Arjun Khotkar) राज्यमंत्री असतानाही त्यांचा स्विय सहायक राहिला आहे.

हा केवळ योगायोग कसा असू शकेल? पाटील याने समितीच्या बैठकी आधीच दोनतीन दिवस पोहचून संबंधितांच्या भेटीगाठी घेतल्या आणि वेगवेगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांकडून वसुली करण्याचे आपले कसब दाखवून दिले म्हणे. त्यांच्या या कौशल्यामुळेच तर वारंवार खोतकर यांच्याकडे त्याला स्विय सहायक म्हणून नेमण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्यावर अंतिम निर्णय प्रलंबित होता म्हणे! म्हणजे चार महिन्यापूर्वी मंत्र्याना स्विय सहायक खाजगी सचिव नेमताना देवाभाऊने जी खबरदारी घेतली होती त्यावर या पाटील महोदयांच्या कारनाम्याने पाणी फेरले म्हणायचे? म्हणजे देवाभाऊनी मंत्रिमंडळातील काही भाजप मंत्र्याच्या  खासकरुन शिंदेच्या पक्षामधील मंत्र्याचे कारनामे थांबविण्यासाठी आपला ‘अंदाज’ वापरून स्विय सहायक आपल्या चाचपणीतून नेमले, पण शेवटी जे व्हायचे ते झालेच शिंदेच्या जालन्याच्या शिलेदाराने आपल्या अंदाजाने आपल्या पक्षाचा आणि नेत्यांचा जलवा दाखवून दिलाच नाही का? यालाच म्हणायचे अंदाज अपना अपना!

Fadnavis-Shinde-Pawar-Bhujbal

भुजबळांचा की देवाभाऊंचा ‘अंदाज अपना अपना’?

थांबा की राव अजून गंमत बघा ! बीड मध्ये धनुभाऊंच्या आणि त्यांच्या चेलाचपाट्यांच्या ‘अंदाज अपना अपना’ कारनाम्यामुळे घायकुतीस आलेल्या मुख्यमंत्र्याना कसेबसे कराडला जेलमध्ये पाठवून धनुभाऊंना विश्रांती द्यायला दोन महिने लागले. पण ‘एकाला लपवला तर दुसरा तयार’ म्हणातात ना? तसे छगन भुजबळांचे पात्र उभे राहिलेच! त्यांना पुष्पगुच्छ देवून म्हणे मुख्यमंत्र्यानीच मंत्रिमंडळात घेतले आहे. त्या अंजलीताई दमानिया(Anjali Damaniya) तर कपाळावर हात मारून घेत कसेकसे प्रतिभाशाली नमूने आहेत यांच्याकडे असे म्हणताना दिसत आहेत. पण ज्या भुजबळ यांच्यावर नाशिकमध्ये जावून यथेच्छ तोंडसुख घेत ज्या फडणवीस साहेबांनी भ्रष्टाचारी असल्याचे प्रमाणपत्र त्यांना भर सभेत भुजबळांना दिले होते त्यांचाच त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश करुन घ्यावा लागला आहे. याला देखील भुजबळाचा की देवाभाऊंचा ‘अंदाज अपना अपना’ म्हणायचे?

Anjali-Damaniya

सुशासनपर्वाचा पुरता रायता होतोय की राव?!

इतकेच कश्याला कोयता गँगपासून, पुण्यातील सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारापर्यत भाजपचे स्थानिक नेते राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षांतून भाजपात आलेल्यांवर टिका आरोप करताना दिसत आहेत. पण त्याच पुण्यात हगवणे (Hagawane)नावाच्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेच्या आत्महत्या की हत्या प्रकरणात जालींदर सुपेकर या महानिरिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या कथित सहभागावरून गृहविभागाचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाचे पुण्यातील कार्यकर्ते नेते आता हे थांबवा म्हणू लागले आहेत. म्हणजे सत्तेसाठी देवाभाऊने ‘सोन्याची सरी’ म्हणून गळ्यात बांधून घेतलेल्या राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या नेत्यांच्या ‘अंदाज अपना अपना’ वाल्या प्रतापांमुळे त्यांच्या सरकारचा सुशासनपर्वाचा पुरता रायता होतोय की राव?!

Fadnavis-Shinde-Pawar-Bhujbal

त्यातच आता तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अगदी गणेशोत्सव ते दिवाळीच्या दरम्यान त्या होवू घातल्या आहेत. पण जागावाटपामध्ये आता स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांना कितपत जागा देता येतील? याची रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर संभाजीनगर, अमरावती या महापालिकांशिवाय पिंपरी चिंचवड, नवीमुंबई, पनवेल, कल्याण डोंबिबली, भिवंडी, उल्हासनगर, लातूर, नांदेड, वसई विरार, मिरा भाईंदर, सारख्या ब आणि क वर्गाच्या महापालिकांमध्येही या तीनही घटकपक्षांच्या महत्वाकांक्षांमुळे जागावाटपाचा मोठा पेच होणार आहे. तीच गोष्ट जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये होणार आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांना आता नाराज करुन चालणार नाही. पण शिंदे आणि पवारांच्या पक्षांच्या वाट्यालाही जास्तीच्या जागा हव्याच आहेत. याची रस्सीखेच आता तिघात सुरू झाली आहे. भाजपला थेट नगराध्यक्ष, नगरसेवक जिल्हापरिषद अध्यक्ष आपल्याच पक्षाचे सर्वाधिक करायचे असतील तर जास्तीच्या जागा घ्याव्या लागतील, पण सहकारी महायुतीच्या घटकांशी ताळमेळ कसा बसवायचा? हे तर कठीण काम आहे. पण देवाभाऊच ते महाहिकमती, त्यांनी आधीच जाहीर करुन टाकले आहे की, जेथे महायुती होणे शक्य नाही तेथे घटकपक्ष वेगळे लढून निकालानंतर एकत्र सत्तास्थापन करतील! आहे की नाही गंमत? यालाच म्हणतात अंदाज अपना अपना. पण त्याच्या या स्वयंघोषणेने शांत बसतील ते शिंदे आणि पवार कसले? त्यांनी त्यांचे ‘पक्षपिता’ देशाचे गृहमंत्री अमित शहांना गाऱ्हाणे घातले, साद घातलीच आणि लागलीच शहासाहेबांनी देखील दोन दिवसांचा नागपूर, नांदेड, मुंबई असा प्रदिर्घ दौरा करत जागावाटपाच्या चर्चा करण्यासाठी शिंदे पवारांना वेळ दिला आहे म्हणे! यालाही अंदाज अपना अपना म्हणायचे नाही का?

Amit-Shah

भाजपच्या कार्यकर्ते आणि मतदारांना काय वाटले असेल?

मनसे नेते राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी यावर नुकतीच अगदी छान मुलाखत दिली. सत्ताधारी पक्षांवर टिकाटिपणी करतानाच त्यांनी महाराष्ट्र धर्म जपण्याची गरज असल्याचे अधोरेखीत केले. या मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रकाराच्या नजरेतून एका छायाचित्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की मागच्या चार सहा वर्षात फडणवीस यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर सत्तेवर आल्यावर कठोर कारवाईच्या घोषणा वल्गना केल्या होत्या ते सारे नेते फडणवीस यांना मध्ये बसवून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे या छायाचित्रात दिसत आहेत.  त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ असे सारेच फडणवीसांसोबत दिसत आहेत. राज ठाकरे यांनी मुलाखतकारालाच मिश्कील सवाल केला की, हे चित्र पाहून आमचे जावू द्या हो, त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय वाटले असेल? ज्यांनी या साऱ्या कथित भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात, फडणवीसांच्या घोषणा वल्गना आवेश पाहून भाजपला मागील पाच वर्षात वेळोवेळी मतदान केले असेल? फारच मार्मिक प्रश्न आहे. पण ‘सत्तांतुराणांम न भयं न लज्जा’ म्हणतात त्यामुळे असे काही नसते म्हणून ते दुर्लक्षच करणार. पण याला देखील त्यांचा ‘अंदाज अपना अपनाच’ म्हणायल हवे की नाही सांगा बरे!?

Sanjay-Raut

ठाकरे ब्रँण्डचे तर ब्रँण्ड अँम्बेसडर राऊतच!

बाकी शिवसेना ठाकरे गटाचे (प्रवक्ता) की प्रवक्ता खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या फलंदाजीला सध्या बहर आला आहे. ते एकाच वेळी शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) अश्या दोन पक्षाचे प्रवक्ते असल्याचा भास नेहमीच निर्माण करतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून तसे जाणवते पण आता त्यांना मनसेच्या राज ठाकरे यांनी मराठीपण आणि महाराष्ट्र धर्मासाठी शिवसेनेसोबत येण्यास हरकत नसल्याचे म्हटल्याने आणखी काम मिळाले आहे.

म्हणजे मनसेचे प्रवक्ता की प्रदेशाध्यक्ष संदिप देशपांडे माध्यमांना सामोरे जात असतात. पण मनसे पक्षाकडून ते बोलत असावेत. राज ठाकरे आणि ठाकरे ब्रँण्डचे तर ब्रँण्ड अँम्बेसडर राऊतच होवू शकतात नाही का़? मग ते राज ठाकरे जे काही त्या मुलाखतीत म्हणाले त्यावर त्यांच्या वतीनेही अनेकदा बोलताना दिसत असतात. महायुती, इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी केल्यानंतरही कोणत्याही आघाडीला असा संयुक्त प्रवक्ता लाभला नसेल नाही का? पण ती कसर राऊत साहेब भरुन काढताना दिसतात, आता याला देखील त्यांचा अंदाज अपना अपनाच म्हणायचे नाही का?

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे


मंकी बात…

Social Media