… जो जिता वो सिकंदर! भाजप नेते धुरंधर!?
मग लोकशाहीच्या दगा-फटक्याच्या खेळाचे ‘रहेमान डकैत’ कोण?
![]()

अखेर लाख प्रयत्न करुन देखील भाजपला मुंबईची एकहाती सत्ता घेवून शत-प्रतिशत वाटचालीचा श्रीगणेशा करता आला नाहीच. २०१७मध्ये ऐनवेळी उध्दव ठाकरेंना एकाकी पाडून त्यांना सत्ता घेता आली नव्हती. तर आता शिवसेना(Shiv Sena) फोडून शिवसेनाप्रमुखांचे ‘शहा’जोगपणाने नाव चोरूनही त्यांना सत्तेचा सोपान चढण्यासाठी पुन्हा एकदा फोडलेल्या शिवसेनेचा नाईलाजानेच आधार घ्यावा लागला आहे! मराठी माणसाच्या शक्तीला कमी लेखण्यासाठी आणि गुजराती धन्नासेठांना मुंबई ‘आंदण’ देण्यासाठी चाणाक्षपणे गुजराती भाजप हायकमांडच्या शहेनशहा नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना पुढे करत मोरारजी देसाई (की कसाई?) च्या हातून करण्यात आलेली चूक सुधारण्यात आली. पण मराठीच असलेल्या शिंदे-फडणवीस या ऐतिहासिक केवळ नावे असलेल्या मराठी माणसांनी ‘कु-हाडीचा दांडा गोतास काळ’ या म्हणीचा प्रत्यय करून दिला!

इतिहासातील पानीपताच्या पराभवाचा अनुभव
मराठी गडी यशाचा धनी. . . होवू नये म्हणून शिंदे-फडणवीसांची ही जोडगोळी खपली असा नव्याने इतिहास लिहिला गेला आहे. तेही मकरसंक्रातीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७६१मध्ये मराठी माणसांच्या बेकीतून जसे पानीपत झाले होते तो इतिहास मुंबईने पुन्हा अनुभवला असे म्हणायला हवे! मराठ्यांच्या इतिहासातील पानीपताच्या पराभवाचा अनुभव प्रत्यक्ष रणांगणात शिंदे- फडणवीस दोघांनी घेतला होता. ‘बचेंगे तो और लडेंगे’ या दत्ताजी शिंदेच्या नजीबखानाला दिलेल्या उत्तराचा परिचय देत त्यांनी दहाच वर्षात बदला घेत दिल्लीच्या दरबाराची सूत्र हाती घेतली होती हा त्या शिंदे –फडणवीस चा लौकीकही त्यांच्या नामसदृश्य शिंदे फडणवीसांनी सध्या मुंबईत मातीस मिळवला. १०६ हतात्म्याच्या मुंबईला गुजराती धन्नासेठांच्या दावणीला बांधण्यासाठी त्यांचा हा आटापिटा इतिहासात नमूद झाला हे दुर्दैव मराठी माणसांचे आहे.

त्यापूर्वी २०१७मध्ये शिवसेनेला राज्यात सत्तेत सोबत असतानाच पालिकेतून बेदखल करण्यासाठी युतीधर्माला तिलांजली देत भाजपने जोरदार मुसंडी मारत मुंबई महापलिकेत कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ‘शेंडी तुटो वा पारंबी. .‘ या आवेशात मुख्यमंत्र्याकडून आपल्या पद, प्रतिष्ठा सत्ता आणि संघटना यांचा कस लावण्यात आला होता. पण ३२ वरून ८४ पर्यत मजल मारूनही महापौर पद किंवा स्थायी समितीच्या शर्यतीत बाहेर राहून ‘मन मारून’ गप्प बसत चौकीदार होण्यात त्यांना धन्यता मानावी लागली होती. त्याहीवेळी अडचणीत असलेल्या ‘दादूच्या मदतीला राज’ ठाकरेंच्या मनसेचे सात नगरसेवक फुटल्याचे सांगत ठाकरेंनी गड राखला होता! यावेळी देखील शेवटच्या चार तासात सायंकाळी सातपर्यत रखडलेल्या मतमोजणीच्या आडून ‘रात्रीस खेळ चाले’ म्हणत काहीतरी घडल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे, त्यात तथ्य असेल किंवा नाही. पण रखडलेल्या शेवटच्या १२ निकालातील निम्मे निकाल ठाकरे ऍण्ड ठाकरेंच्या विरोधात फिरवण्यात आल्याची कुजबूज ऐकू येत आहे.

‘धृतराष्ट्र’ निवडणूक आयोग ?
या सगळ्या २९ महापालिकांच्या रणसंग्रामात महायुतीच्या दोनही घटकपक्षांपेक्षा सत्ताधारी भाजपची युती झाली होती ती निवडणूक आयोग आणि त्यांचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी असा आरोप विरोधकांनीही वारंवार केला होता. मतदानाच्या तारखा घोषित करण्यापासून मतदार याद्या, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत, आणि नामांकन मागे घेण्यासाठी साम दांम दंड भेद निती वापरत बिनविरोध निवडणूकीचे पेव फुटल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग धृतराष्ट्र निवडणूक आयोग होवून बसला होता? कदाचित त्यांच्या या ‘स्वभाव’ वैशिष्ट्यामुळेच त्यांची निवड या पदावर झाली असावी अशी देखील चर्चा विरोधकांच्या वर्तुळात केली जावू लागली होती. मात्र खरा कहर झाला मतदानाच्या दिवशी जेंव्हा बोटाची शाई पुसल्याच्या आणि दुबार मतदानाच्या घटना घडल्याच्या आरोपांचा गोंधळ झाला तेंव्हा. आयोगाकडून यासाठी मतदारांनाच दोष देण्यात आला, वर शाई पुसणे गुन्हा आहे वगैरे ज्ञान देण्यात आलेच कदाचित ते महाराष्ट्राचे ‘ज्ञानेश कुमार’ असल्याच्या अविर्भावात असावे असे मग काही विरोधकांच्या नेत्यांकडून केलेल्या टिपणीत सांगण्यात आले.एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाने झापडबंद कारभार करत विधानसभा अध्यक्षांपासून वोटचोरांपर्यत सगळ्याच्या मनकी बात ला लोकशाही मनाने पूर्ण वाव दिल्याचे दिसले! पण आयोगालाही दोष देण्यात अर्थ नाही, तीन हजारांपासून दहा हजारांपर्यत मतदार विकले गेल्याचा सर्रास अनुभव वार्डा-प्रभागात चाळी-वस्तीत जागोजागी पहायला मिळत होता. अनेकांना त्यांची इच्छा किंवा मागणी नसतानाही हे पैसे घ्यावे लागले हे वास्तव आहे. आजच्या डिस्काउंट- मोफत एकवर एक फ्रीच्या जमान्यात निवडणूकांची ही ऑफर नाकारून राजा हरिश्चंद्र होणार कोण? हा देखील प्रश्न राहतोच! तर अदानी कमावतोय ना मग आपण तरी काय घोडं मारलय आली गंगा तर हात धुवून घ्या नंतर आपल्याला कोण हिंग लावून विचारायला येणार आहे? असा ‘सुज्ञ’ विचार करत अनेक नव्हे बहुतांश मतदारांनी पवित्र कर्तव्य न बजावताही धन्यता मानली आहे म्हणे!

जल्लोष मध्यरात्रीच्या सुमारास बेहोश होण्याची स्थिती?
या सगळ्यात ‘डॉगी’ माध्यमांतून पूर्ण निकाल घोषित होण्यापूर्वीच अत्र तत्र सर्वत्र महायुतीच आल्याच्या बातम्याचा हैदोस सुरू होता. त्यातून निवडणूक यंत्रणेत काम करणारे कार्यकर्ते, अधिकारी यांच्यासोबत एक माईंडगेम खेळला गेला असे जाणकार सांगतात! प्रत्यक्षात दुपारी तीन नंतर मुख्यमंत्र्याकडून संयत शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती जागवल्या गेल्या आणि महापौर आल्यानंतर जल्लोष करू असे सांगण्यात आले तेंव्हा जरा कुठे हवेतले जल्लोष खाली येत मध्यरात्रीच्या सुमारास बेहोश होण्याच्या स्थितीपर्यंत आल्याचे दिसले. महायुतीला साधे बहुमत मिळवायला त्यावेळी पाच जागा कमी होत्या. ठाकरे हरले ठाकरे सरले मराठी माणसांचा पराभव झाला असा आसूरी विकट हास्यातून समज करून घेणाऱ्यांचा तेंव्हा काही वेळ काळजाचा ठोका चुकला असेल!

मित्रपक्षांचा खात्मा? की भटकती आत्मा?
निवडणूकी पूर्वी तिकीटवाटप जागावाटपाच्या वेळी ज्या एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना सोबत न घेता भाजप निघाली होती, त्यांच्या सोबतच गेल्याशिवाय आता मुंबईत सत्ता काबीज करता येत नाही हे स्पष्ट झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवडात अजितदादांकडून घेतल्या गेलेल्या भुमिकांचा फटका त्यांना बसला. पण शिंदे यावेळी देखील सावध असल्याचे दिसले. साऱ्या राज्यात त्यांच्या शक्तीला चाप लावण्याचा प्रयत्न करण्यात येवूनही त्यांची मुंबईत भाजपला गरज राहिली आहे. तर नवी मुंबईत गणेश नाईकांनी सांगितल्यानुसार त्यांचा ‘टांगा पलटी’ झाला आहे. कल्याण डोंबिवलीत ते बरोबरीत आहेत. तर राज्यात अन्यत्र त्यांना इकडेच अडकवुन ठेवल्याने फारसा प्रभाव दाखवता आला नाही. तरी देखील सच्चा मतदार कार्यकर्ता सगळाकाही विकला जात नसतो हेच शेवटच्या मिनीटापर्यत झालेल्या चुरशीने दिसून आले.

शेवटच्या क्षणी रात्रीस खेळ चाले?
मध्यरात्री शेवटच्या क्षणी भाजप ८४ जागांवर तर शिवसेना शिंदे गट २६ जागांवर आघाडीवर होता. त्यावेळी भाजप शिवसेनेचे मिळून एकूण ११० उमेदवार आघाडीवर होते नबाब मलिक यांच्याकडच्या ३ जणांची मदत घेतल्याशिवाय भाजपला तेंव्हा सत्ता स्थापन करता येत नाही हे चित्र होते.. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे ६४ उमेदवार तर मनसेची ८ जागांवर आघाडी होती. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे मिळून एकूण ७२ उमेदवार आघाडीवर होते. मुंबई महापालिकेमध्ये एकूण २२७ जागा असल्याने बहुमताचा ११४ आकडा कुणाही एका पक्षाकडे नव्हता. त्या स्थितीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट बहुमताच्या जवळ होते तरी देखील त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे मुंबईत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत २३ जागांवर वर्चस्व मिळवल्याने आकडेवारीनुसार मुंबईत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावण्याच्या स्थितीत होती. त्यातच एमआयएम १० जागांवर आघाडीवर होती. काँग्रेससोबतच विजयी अपक्ष ज्यात मोठ्या प्रमाणात उबाठा बंडखोर होते त्यांचा देखील मोठा खेळ होण्याची शक्यता होती. कारण मुंबईत कमीत कमी दहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता होती. जाणकार सूत्रांच्या माहितीनुसार त्यानंतर इविएमच्या मोजणीला पूर्णविराम देवून सुमारे तीन तास निकाल मतमोजणी रखडण्यात आली. याच काळात वरिष्ठ पातळीवर रात्रीस खेळ चाले सुरू झाले म्हणे! एमआयएम (MIM)आणि बंडखोर अपक्षांच्या विजयाच्या शक्यता त्यानंतर सुरू झालेल्या मतमोजणीत मावळल्या आणि बहुमतापेक्षा १ जास्त संख्याबळ महायुतीला गाठता आले! ज्याची खरी बातमी कोणत्याच माध्यमांकडे दाखविण्यात आली नाही! असे जाणाकर सूत्रांकडून सांगण्यात आले. काही असो जो जिता वो सिकंदर! भाजप आणि त्यांच राज्याचे नेते धुरंधर! पण मग या लोकशाहीच्या दगाफटक्याच्या खेळाचे रहेमान डकैत कोण? धृतराष्ट्र झालेलां निवडणूक आयोग? की विकत गेलेले मतदार? की शेवटच्या क्षणी ‘डिल’ करणारे लिडर? असा सवाल अनुत्तरीत राहतो नाही का?

काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष!
या सगळ्यात जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. भाजपाच्या बुलडोझरसमोर काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. मुंबईत भाजपाला मिळालेले यश हे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशिनपर्यंत व शाईचा घोळ हा सर्व फिक्सिंगचा खेळ होता. निवडणूक आयोगाने सावरासावर करणे बंद करावे तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर चालणे बंद केले पाहिजे. भाजपाकडे कसलीही नैतिकता, लाज राहिलेली नाही. लोकशाही खरोखरच संकटात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, पाकिट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी, व निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे सर्व पाहता फ्रि अँड फेअर निवडणुका होत नाहीत हे स्पष्ट दिसले. हुकुमशाही वाढत वाढत जाते पण एका ठिकाणी त्याचा फुगा फुटतो, आता हा फुगा फुटण्याचा क्षण जवळ आला आहे. कालच उत्तरायण सुरु झाले आहे पुढचा काळ भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे असा इशारा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला. भाजपाच्या विजयाचे वर्णन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “करुन घेतलं बोगस मतदान, धाकदपटशाने वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते सत्तेचा फेटा”.. ही प्रतिक्रियाही बरेच काही सांगणारी आहे!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)

हेही वाचा – मंकी बात – ५ लोकशाहीचा पोपट मेला नाही तो जिवंत आहे, हे ही नसे थोडके!