एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन.

LPG-gas-price-hike : एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन.

मुंबई : केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईत होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. घरगुती गॅस सिलेंडर(Gas cylinder) ६० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ केली आहे. दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॅाटेल(Hotel) बंद होत आहेत.

ही दरवाढ अन्यायकारक असून तात्काळ मागे घ्यावी तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. (LPG-gas-price-hike)

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे गॅस व इंधन पुरवठ्याचे कोणतेही नियोजन नाही, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत, हॉटेल व्यवसाय, खाणावळी बंद करण्याची वेळ आली आहे. गॅसचा तुटवडा नाही हा सरकारचा दावा चुकीचा असून सर्वसामान्य जनता व हॉटेल व्यावसायीक यांना गॅस उपलब्ध होत नाही.

आधीच महागाई त्यात गॅसचा तुटवडा यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, सेल, विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात उद्या १२ मार्च रोजी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Social Media