दीपावली : परंपरा, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रकाशोत्सव

Diwali : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसून मूल्यसंवर्धनाची एक प्रक्रिया आहे.
अशा सणांमधून समाजातील संवेदना, सृजनशीलता आणि एकात्मतेचा दीप प्रज्वलित होतो.
त्यातील सर्वात तेजस्वी सण म्हणजे — दीपावली.(Diwali)

हा सण केवळ आनंदाचा नव्हे, तर अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करणारा आहे.
संस्कारांचा प्रकाश देणारा हा सण. दिवाळीचा आरंभ घरातील स्वच्छतेने आणि दीपप्रज्वलनाने होतो.
ही स्वच्छता केवळ भिंतींची नाही, तर मन आणि नात्यांचीही असते.
घरातली पहिली आरती म्हणजे एकतेचा आणि सुसंस्काराचा दीप.
वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि लहानांवर प्रेमाचा वर्षाव — हीच खरी ‘लक्ष्मीपूजा’.
ज्या घरात नात्यांचा उजेड आहे, त्या घरातूनच उजळतो समाजाचा मार्ग.
निसर्गाशी सुसंवाद साधणारा हा सण आहे.

आधुनिक युगात सणांमुळे निसर्गावर ताण वाढत चालला आहे.
फटाक्यांचा धूर, आवाज, आणि प्रदूषणाने निसर्ग गुदमरतो आहे.
या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे, पर्यावरणपूरक दीपावलीची नवी संकल्पना.
मातीचे दिवे, स्थानिक उत्पादने, आणि पुनर्वापरयोग्य सजावट यांमधून आपण पृथ्वीशी नातं जपतो.
हा सण निसर्गाशी वैर न करता, सहजीवन आणि संवर्धन शिकवतो.
सर्वांच्या सहभागाची दिवाळी.
दिवाळीचा (Diwali)प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे.

आपल्यासोबत काम करणारे कामगार, गरजू, भटके, वंचित बांधव — त्यांच्यापर्यंत सणाचा आनंद पोहोचवणं हीच खरी मानवतेची पूजा.
एक दिवा दुसऱ्याला लावल्याशिवाय उजेड वाढत नाही;
तसंच, सहानुभूती आणि वाटचालीचा भाव नसल्यास समाज उजळणार नाही.
जबाबदार नागरिकतेचा दीप प्रज्वलित करणारा हा दिवाळीचा सण.
स्वच्छता ही फक्त घरापुरती न ठेवता सार्वजनिक जबाबदारी म्हणून स्वीकारावी.
सार्वजनिक ठिकाणांची निगा राखणे, वाहतुकीचे नियम पाळणे, आणि एकमेकांविषयी आदर राखणे
हीच खरी नागरी पूजाअर्चा.

प्रत्येकाने आपले नागरी कर्तव्य ओळखले, तर समाजात प्रकाशाचा दीप तेजोमय होईल.
अंतर्मनातील सद्भावनांची ज्योत प्रज्वलित करणारा दीपोत्सव.
दीपावलीचा सर्वात अर्थगर्भ पैलू म्हणजे स्व-जागृती.
आपल्या जीवनातील अंधार कोणता? — राग, मत्सर, लोभ, अहंकार की उदासीनता?
हे प्रश्न विचारायला दीपावली भाग पाडते.

मनातल्या अंधारावर विजय मिळवणं म्हणजेच खरी दिवाळी.
बाहेरील दिव्यांपेक्षा अंतर्मनातील दीप उजळवणं अधिक महत्त्वाचं आहे.
दिवाळी हा केवळ परंपरेचा नव्हे, तर परिवर्तनाचा उत्सव आहे.
कुटुंबातील स्नेह, निसर्गप्रेम, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य आणि आत्मजागृती —
या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे सर्वसमावेशक मंगलमय दीपावली.
या वर्षी फक्त घर नाही,

मन उजळवू या, संस्कार करू या, सद्भावना साजरी करू या!
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६

Social Media